आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, गुन्हा दाखल, आरोपी फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीस कंटाळून  विष प्राशन केलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा रुग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ही घटना केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे घडली.  छेड काढणाऱ्या तरुणावर अगोदर गुन्हा दाखल करा, नंतरच मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा मुलीच्या मामाने घेताच पोलिसांनी  तरुणाविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र आराेपी  फरार आहे . 


तालुक्यातील मुंडेवाडी येथील स्वाती बालासाहेब घोळवे (वय १६ ) हीस तिच्या आईवडिलांनी आजोळी गप्पेवाडी येथे मामा हनुमंत आश्रुबा केदार यांच्याकडे पहिलीपासूनच शिक्षणासाठी ठेवले होते.  स्वाती यंदा दहावीला होती. गप्पेवाडी येथून दोन किमीवरील शिंदी येथील बुआसाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ती शिकत होती.  शाळा आणि शिकवणीला जाताना अशोक रामदास केदार हा तिचा  पाठलाग करून छेड काढत होता. हा प्रकार तिने १३ जुलै रोजी  मामाला सांगितला होता. भावकीतील लोकांसाेबत मामाने अशोकच्या वडिलांकडे तक्रारही केली.  मात्र माझ्या मुलाची काही चूक नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. तुमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करेन, असा उलट दम त्याने भरला होता. दरम्यान २५ जुलै रोजी हनुमंत केदार हे शेतात कोळपणीसाठी गेले असता घरी स्वाती आणि तिची आजी किसनाबाई केदार ह्या होत्या. संध्याकाळी सहा वाजता स्वातीने अशोकच्या त्रासाला कंटाळून  कीटकनाशक प्राशन केले. ती बेशुद्ध पडल्याने  आजीने  मामाला फोन करून घडलेला प्रकार सांगितल. मामाने स्वातीला  केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  प्रथमोपचारानंतर तिला अंबाजोगाईला स्वाराती रुग्णालयात हलवले.  पाच दिवसांनंतरही  ती शुद्धीवर आली नाही. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास स्वातीचा मृत्यू झाला. 
 

गुन्हा दाखल; आरोपी फरार 
मुलीचे मामा हनुमंत केदार यांच्या तक्रारीवरून  छेड काढणारा तरुण अशोक रामदास केदार याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  परंतु आरोपी गुन्हा दाखल हाेताच फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे पुढील तपास करत आहेत. 

 

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 
मंगळवारी सकाळी स्वातीच्या मामाने तिचा मृतदेह ताब्यात घेण्याअगोदर केज पोलिस ठाणे गाठले.  केज पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु केज पोलिसांनी मुलीच्या आईला तक्रार देण्यासाठी बोलावून घ्या, असे सांगितले. शेवटी गुन्हा दाखल झाल्यावरच आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा मामाने घेतल्यानंतर पोलिसांनी शेवटी मामाचीच तक्रार दाखल करून घेत अाराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.