आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Students From Himayatnagar Taluka On The Banks Of The River Painganga Have To Make Their Way Through The Water.

पैनगंगा नदीच्या काठावरील हिमायतनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत गाठावी लागते शाळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावांतील नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना तराफातून जीवघेणा प्रवास करत शाळा गाठावी लागत आहे. तीरावरून ये-जा करणाऱ्यांसाठी पूल-कम-बंधारा उभारून दळणवळणाची समस्या सोडवावी, अशी मागणी ३० वर्षांपासून केली जात आहे. या समस्येकडे कोणीच लक्ष देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, संबंधित कार्यालये आणि राजकीय पुढाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
 त्यामुळे दिघीसह इतर गावांच्या लोकांनी या ठिकाणी पैनगंगा नदीवर पूल-कम-बंधारा उभारण्यात यावा, अशी मागणी ३० वर्षांपासून लावून धरली आहे. यासाठी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले. आश्वासनांची खैरात नेत्यांनी दिली. परंतु आत्तापर्यंत कोणीच या रस्त्याचा किंवा पुलाचा प्रश्न मार्गी लावला नसल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली. ही बाब लक्षात घेता दिघीजवळ नदीवर बंधारा-पूल उभारल्यास याचा फायदा आजूबाजूच्या गावांना होणार असल्याने या ठिकाणी बंधारा उभारून गावकऱ्यांसह  विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी, अशा मागणीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये सूचक संतोष गायकवाड यांनी मांडला, तर अनुमोदन माणकू कदम यांनी दिल्याने ठराव एकमताने मंजूर करून घेऊन या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले.
 

जवळचा मार्ग
हिमायतनगर तालुक्यातील दिघी हे गाव पैनगंगा नदीकाठावर आहे. या गावच्या आजूबाजूला विरसनी, वाघी, टेंभुर्णी, घारापूर, खडकी बा., जवळगाव आदींसह अन्य गावे आहेत. या गावातील शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना विदर्भातील गावात येण्या-जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. 
 

पाण्यातून ये-जा जिकिरीचे
नदीवर पूल नसल्याने शिक्षणासाठी  ये-जा करणे जिकिरीचे आहे. विद्यार्थ्यांना नदीचे पाणी ओसरेपर्यंत पाण्यातून किंवा रुखावरून जीवघेणा प्रवास करत पैलतीर गाठावा लागत आहे. या भागातील गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी पाठवण्याची कुवत नसल्यामुळे १.५ किमी जवळ असलेल्या विदर्भातील चातारी येथील शाळांमध्ये १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे सोपे आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षणासाठी पायी ये-जा करतात.
 
 

कच्चा रस्ता
उन्हाळ्यात कच्चा रस्ता आणि पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळा गाठणे नित्याचेच झाल्याने या गैरसोईमुळे विद्यार्थीसुद्धा वैतागलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...