आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नियमामुळे तब्बल 788 विद्यार्थी एमपीएससी परीक्षेपासून राहिले वंचित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बायोमेट्रिक पंचींगची अट आणि वेळेपूर्वी परीक्षा केंद्र न गाठल्यामुळे तब्बल ७८८ विद्यार्थ्यांना रविवारी एमपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. अकोल्यात २ हजार २२७ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु सदर अटीमुळे ३५.३८ टक्के विद्यार्थ्यांच्या नावासमोर अनुपस्थित अशी नोंद केली गेली. 

 

याबाबत काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर आपला राग व्यक्त केला. परंतु परीक्षा नियंत्रकांची भेट घेण्याबाबत त्यांचे एकमत होऊ शकले नाही. दरम्यान बायोमेट्रिक पंचिंग आणि आयोगाने नेमून दिलेल्या इतर अटींचे पालन करण्यास आम्ही बंधनकारक होतो. परिणामी उशिरा पोहोचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला बसू देता आले नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

 

अधिकारी दर्जाच्या नोकरीसाठी आज, रविवारी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्राथमिक परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १२ ही या परीक्षेची वेळ होती. त्यासाठी अकोल्यात आठ केंद्रं होती. परीक्षेपूर्वी किमान तासाभरापूर्वी विद्यार्थ्यांनी या केंद्रांवर पोहोचावे, हा या पूर्वीचाच नियम या वेळीही होता. परंतु विद्यार्थ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. एक नवी अट म्हणून या वेळी परीक्षार्थ्यांचे बायोमेट्रिक पंचिंग घेण्यात आले. त्यात काही ठिकाणी वेळ गेला, हे खरे आहे. परंतु त्यासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच सर्व केंद्रांवर प्रवेश देणे सुरु केले होते आणि तशी पूर्वसूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आली होती, असेही प्रशासनाने म्हटले आहे. 

 

तरीही अनेक केंद्रांवर दिली गेली मुभा : 
परीक्षा सुरु होण्यापूर्वी तासाभराआधीच केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन आयोगाने प्रवेशपत्रावरच केले होते. परंतु थंडीचा कडाका आणि बाहेरगावाहून शहराकडे होणाऱ्या दळणवळणातील अडथळे लक्षात घेता अनेक केंद्रांवर १०.३० वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आला. मुळात बायोमेट्रिक पंचिंग करताना वेळेची नोंदही आपोआपच होत होती, त्यामुळे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश देणे हे कुणालाही शक्य नव्हते. 

 

काय होते बायोमेट्रिक पंचिंग 
नव्या नियमानुसार आयोगाने प्रत्येक केंद्रांवर बायोमेट्रिक रिडर तैनात केले होते. हे रिडर म्हणजे बोटांचे ठसे ओळखणारी यंत्रे सांभाळणाऱ्या व्यक्ती होत्या. परीक्षार्थीला वर्गात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारावरच या यंत्रणेतून जावे लागत होते. आधार कार्ड तयार करताना घेतलेले बोटांचे ठसे या यंत्रांमध्ये आधीच रजिस्टर्ड होते. त्यामुळे प्रवेशपत्रधारक विद्यार्थी हा तोच आहे, याची खात्री पटवून घेतली जात होती. 

 

मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर राज्यभरात नियम झाला लागू 
परीक्षेसाठी बायोमेट्रिक पंचींगची अट ही अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी नवी असली तरी तिची ट्रायल यापूर्वी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील केंद्रांवर घेण्यात आल्याची माहिती आहे. बनावट परीक्षार्थी टाळणे यासाठी आयोगाने ही पद्धत लागू केली आहे. त्यामुळे परीक्षेतील पारदर्शकताही कायम राहते आणि इतर गोंधळही टळतात, असा आयोगाचा तर्क आहे. दरम्यान मोबाइल जॅमर आणि ओळखपत्राची सक्ती या अटी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच लागू केल्या आहेत.

 

ओळख न पटल्यास पर्यायही दिला होता 
बायोमेट्रिक पंचींगमध्ये एखाद्याच्या बोटाच्या ठशांची ओळख न पटल्यास पर्यायी व्यवस्थाही आखून देण्यात आली होती. बोटांवरील रेषा मिटल्यास किंवा सदर बोटाला इजा झाल्यास बरेचदा बायोमेट्रिक पंचींगध्ये बोटांचे ठसे ओळखले जात नाहीत. नेमकी अशी स्थिती उद्भवल्यास सदर परीक्षार्थींची छायाचित्रे घेऊन त्यांना परीक्षेला बसू दिले जावे, असा पर्याय आयोगाने पुढे केला आहे. या पर्यायाचा वापरही काही केंद्रांवर करण्यात आला. 

 

न्यू इंग्लिशमध्ये हजरच्या तुलनेत गैरहजरच अधिक 
या परीक्षेचे एक केंद्र न्यू इंग्लिश हायस्कुलमध्येही होते. या केंद्रावर २४० विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली होती. परंतु नियोजित वेळेत ८५ विद्यार्थीच पोहोचले. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली. याउलट १५५ विद्यार्थी 'लेट' मार्क झाल्याने परीक्षेपासून वंचित राहिले. इतर केंद्रांच्या तुलनेत ही विक्रमी अनुपस्थिती ठरली. 

 

आता पुढे काय होणार ? 
अकोल्यात सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांचे मोठे जाळे आहे.या शिवाय या स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश गाठण्यासाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा म्हणूनही याकडे पाहिले जाते. अशा स्थितीत स्थानिक विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षेेचे नवे नियम माहित होणेही गरजेच आहे. मात्र आज झालेल्या या परीक्षेमुळे त्यांच्या पुढ्यात एक चांगला वस्तुपाठ घालून दिला आहे. दरम्यान भविष्यात या बाबीचा त्यांना निश्चितच लाभ होईल. 
 

बातम्या आणखी आहेत...