आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठलाची धूपारती पाहून मी नेहमीप्रमाणे घराकडे निघालो होतो. मागून एक हाक ऐकू आली, ‘ओ सर! ’ मी आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. तो एका कुंकवाच्या दुकानातून पंचविशीतला तरुण मला हाक मारत होता. ओळखीचा वाटणा-या तरुणाने दुकानातून खाली येऊन अत्यंत नम्रपणाने मला दहा रुपयांची नोट देऊ केली. तो म्हणाला, ‘सर, माझे नाव सलीम तांबोळी. 10 वर्षांपूर्वी लोकमान्य विद्यालयात मी तुमच्या वर्गात शिकण्यास होतो. त्या वेळी तुम्ही चालवत असलेल्या विद्यार्थी भांडारातून परीक्षेकरिता उत्तरपत्रिका विकत घेतल्या होत्या. गर्दीमध्ये उरलेले पैसे परत करताना तुम्ही मला चुकून दहा रुपये जास्त दिले. त्या वेळी ते माझ्या लक्षातही आले होते, पण मित्रांनी मला पैसे परत न करण्याबद्दल दबाव टाकला. माझा नाइलाज झाला. पुढे ते पैसे मी मित्रात खर्च केले. नंतर पुढे काही वर्षांनी मी येथे कुंकवाचे दुकान टाकले.

शाळेतील ती घटना मी पूर्णपणे विसरून गेलो होतो, पण रोज सायंकाळी तुम्हाला दुकानासमोरून जाताना पाहत होतो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सरांचे आपण 10 रुपये देणे लागतो. ते पैसे आपण परत द्यावयास पाहिजे होते. असे सारखे वाटू लागले. आज मी धाडस केले. हे पैसे घ्याच सर! आणि मला माफ करा. तरच माझ्या मनाला समाधान वाटेल.’ असे बोलून त्याने खाली मान घातली. त्याचा प्रामाणिकपणा आणि आताचे बोलणे पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्याच्या प्रामाणिक वर्तनाचा मला अभिमान वाटला. अशा संस्कारित पिढीमुळेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होते. माझे अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्यांच्या जडणघडणीत माझा वाटा होता. एका शिक्षकाला याहून मोठी अभिमानाची कोणती गोष्ट असू शकते. आपण गेल्या 31 वर्षांत जी संस्काराची बीजे पेरली होती, त्याचे अंकुर आजही माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात उगवले आहेत. या विद्यार्थ्याने वेगळा आदर्श घालून दिला. चांगले संस्कार वाया जात नाहीत, हे सलीमने दाखवून दिले.