आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र; दोन दिवसांची कांदा काढणी ३ तासांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : भाव वाढले तर सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा दर गडगडताच उत्पादकांचा जीव टांगणीला लावतो. लागवड ते उत्पादन या चक्रात कांदा उत्पादकांना काढणीवर जास्त वेळ व पैसा खर्चावा लागतो. त्यांची ही अडचण सोडवण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई मेकॅनिकलच्या २५ विद्यार्थ्यांनी कांदा, अद्रक, लसूण, बटाटा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे ३ तासांत एक एकर कांदा काढणी शक्य असून काढणी खर्चातही सुमारे ५.५ हजारांची बचत होईल, असा दाआ संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे. 


यंत्राच्या सह्याने काढणी, साठवणूक करणे सोप होणार असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गव्हासाठी हार्वेस्टिंग यंत्र विकसित झाले आहे. मात्र, कांदा पिकासाठी असे यंत्र नव्हते. ही बाब लक्षात घेत या विद्यार्थ्यांनी नाशिक, निफाड, लासलगाव येथील कांदा उत्पादकांशी संवाद साधला. लागवड ते काढणी हे चक्र जाणून घेतले. महाराष्ट्रात तीन हंगामांत कांदा पिकवला जातो. 

 

उत्पादक पारंपरिक पद्धतीने हार्वेस्टिंग (काढणी) करतात. एकरी साडेसात हजारांची मजुरी लागते. तसेच सर्व कामे किचकट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गहू काढणी यंत्राच्या धर्तीवर त्यापेक्षा कमी वजन व कमी किमतीचे यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. यात आणखी पुढे जात कांदा, अद्रक, लसूण, बटाटा काढणे शक्य व्हावे, याचीही काळजी घेतली, असे संशोधक विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या प्रतीक श्रीवास्तव याने सांगितले. 


अशी आहे टीम :

मार्गदर्शक प्रो. एस. एम. अग्रवाल, प्रो. एच. डी. शर्मा, विशेष साह्य प्रो. व्ही. एस. पाटील, डॉ. उल्हास शिऊरकर यांच्या नेतृत्वात प्रतीक श्रीवास्तव, देवेंद्र सोनुले, शशांक काळे, किशोर बनसोडे, हेमंत मोरे, प्रशांत चौधरी, उमर मोहंमद, मंगेश शेवाळे, रोहन पाटील, गजेंद्र सरान्से, संतोष सूर्यवंशी, भाग्यश्री जाधव, आकाश पोटे, विठ्ठल फड, विजय राऊत, रोहित सावंत, सृष्टी सराफ, अण्णा चव्हाण, संदीप सोनवणे, विश्वेश जोशी, ओंकार घिके, दिनेश सोनवणे, शुभम पवार, द्वीप कोईल, विपुल पाटील या विद्यार्थ्यांनी भूमिपुत्र टीम तयार करून कांदा, बटाटे, लसूण, अद्रक काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. 


विक्री व्यवस्थापनाचेही कौशल्य हवे :

जगात सर्वात महत्त्वाचे कंदवर्गीय भाजीपाला पीक म्हणून कांदा ओळखला जातो. नगदी पीक म्हणून खरीप, रब्बी आणि हिवाळी व उन्हाळा अर्धा असे तीन हंगामांत ९० ते १२० दिवसांत येणारे पीक असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने याकडे वळाले आहेत. महाराष्ट्रात नासिक, खान्देश, मध्य व पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांत कांद्याची लागवड केली जाते. कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत असल्याने एकूण उत्पादनापैकी ३० टक्के महाराष्ट्रात कांदा पिकवला जातो. मात्र, लागवडीबरोबरच काढणी व विक्री व्यवस्थापन केले जात नसल्याने उत्पादकांना त्याचे नफ्यात रूपांतर करता येत नाही. हे कौशल्य शेतकऱ्यांना आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढणी यंत्राची निर्मिती केली ही अभिमानास्पद बाब असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी सांगितले. 
 


काही उत्पादकांचा कांदा मोफत काढणार 
या यंत्राला अंतिम रूप दिले जात असून १७ फेब्रुवारीनंतर ते काढणीसाठी सज्ज होईल. त्याबाबत उत्पादकांना माहिती व्हावी, त्यांनी व शेतकरी गटांनी, बेरोजगारांनी या यंत्राद्वारे रोजगार सुरू करावा, या उद्देशाने काही उत्पादकांचा कांदा, बटाटे, आद्रक, लसूण मोफत काढला जाणार आहे. 


असे आहे काढणी यंत्र 
३.२ मीटर लांबी 
१.४ मीटर रुंदी 
१.६ मीटर उंच 
२८० किलो वजन 

किंमत : १,८५,५०० रुपये 
  
२० वर्षे आयुष्यमान 
देखभाल, दुरुस्तीवर खर्च अत्यल्प 


राज्यातील चित्र असे 
४,६८,००० हेक्टर-एकूण कांदा लागवड 
५,८६,७००० मेट्रिक टन - एकूण उत्पादन 
(देशातील कांदा उत्पादनापैकी ३० टक्के) अशी होते लागवड 

७० %  खरीप लागवड 
५ % अर्ध उन्हाळी 
२५ % रब्बी 

 

बातम्या आणखी आहेत...