आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती नाही - विनोद तावडे; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी एसईबीसी कोट्यातून अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. परंतु विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने प्रवेशाच्या वेळी अडचण होत आहे. जातवैधतेसाठी अर्ज केल्याचे टोकन जमा करून घेतले जात नसल्याने त्यांना प्रवेश घेता येत नसल्याने अडचणीत भर पडली होती. याची दखल घेत, आता प्रवेशाच्या वेळी सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची सक्ती नसेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत केली.


मराठा समाजातील विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत, या विद्यार्थ्यांना ३० जून ही जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून जात पडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. विद्यार्थ्यांना वर्षभराचा कालावधी देऊन त्यांच्याकडून प्रमाणपत्र दाखल करून घ्यावे, असे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. याला उत्तर देताना विनोद तावडे यांनी सांगितले, राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जात पडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना जाहीर करण्यात आली होती. परंतु त्याबाबत होत असलेली अडचण पाहून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, मी आणि मंत्री संजय कुटे, विभागांचे सचिव यांची बैठक  झाली. तीत हा निर्णय झाला. 

 

यंत्रणा नसल्याने प्रमाणपत्रास अडचण  
२०१८ च्या अधिनियमानुसार मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तूर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यास प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता करण्यात येणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
 

इतर प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा 
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्चित करेल अशा दिनांकापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.