आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान साेहळ्यात ब्रिटिशकालीन पोशाख बदलून पुणेरी पगडीचा समावेश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी ब्रिटिशकालीन पोशाख बदलला आहे. या पोशाखात असणाऱ्या पुणेरी पगडीवरून काही राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. त्यामुळे पदवी प्रदान सोहळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विद्यार्थ्यांना पगडी महत्त्वाची वाटत नसून शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची वाटत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी गोंधळाकडे दुर्लक्ष करत पदवी प्रदान सोहळ्याचा आनंद घेतला. काही विद्यार्थी प्रतिनिधींनी अति उत्साहात विरोध करण्यासाठी गाढवाऐवजी घोडे आणून त्याला पुणेरी पगडी घातली. घोडा हा शौर्याचे प्रतीक असल्याने स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेतूच निष्फळ ठरल्याची चर्चा त्यानंतर रंगल्या होत्या. 

 

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विविध विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते. 

 

पदवी प्रदान सोहळ्यासाठी विद्यापीठाने यंदा लाल, काळा घोळदार गाऊन आणि टोपी हा पदवी प्रदान साेहळ्याचा पारंपरिक पाेशाख बदलून पांढऱ्या रंगाचा कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या पोशाखात असणाऱ्या पगडीला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. शिक्षणमंत्री तावडे यांनीदेखील विद्यापीठाने पगडीच्या वादात न पडता फक्त शिक्षण देण्याचे कार्य करण्याचा सूचक सल्लादेखील दिला होता. मात्र, विद्यार्थी संघटनांचा विरोध डावलून सोहळ्यात उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांनी कुर्ता-पायजमा असा पारंपरिक पाेशाखासह पुणेरी पगडी घातल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना बदलण्यात आलेला पाेशाख घालावा अथवा पुणेरी पगडी घालून यावे असे काेणतेही बंधन घालण्यात आले नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले हाेते. मात्र, सोहळा सुरू असतानाच काही विद्यार्थी संघटनांच्या कुलदीप आंबेकर, दयानंद शिंदे आणि शर्मिला येवले यांनी व्यासपीठाच्या दिशेने जात पुणेरी पगडीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यांना ताबडतोब सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेऊन चतुःशृंगी पोलिस स्टेशनला हलवले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता विद्यापीठातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे पाटील आणि कार्यकर्त्यांनी विरोधाच्या नादात घोड्यालाच पुणेरी पगडी घातली. दरम्यान, १ लाख ३ हजार १२४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, तर ४३९ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रमाणपत्र पदवी प्रदान सोहळ्यात देण्यात आले. यामध्ये पदवी स्तरावरील ८० हजार ६१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे, तर विविध विद्याशाखांच्या पदव्युत्तर स्तरावरील २१ हजार ३६६ विद्यार्थी, पीएचडी पदवीधारक ४४१ विद्यार्थी आणि सुवर्णपदक विजेते ७० विद्यार्थी यांना प्रमाणपत्रांचे कार्यक्रमादरम्यान वाटप करण्यात आले.या वेळी विद्यापीठात क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थी म्हणतात- टाेपी, पगडीपेक्षा शिक्षण महत्त्वाचे 


अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगाेंदा येथील रहिवासी असलेल्या नीलेश भापकर याने एमएस्सी मॅथेमेटिक्समध्ये तीन सुवर्णपदके प्राप्त केली. भापकर याने भावना व्यक्त करताना सांगितले, नवीन पाेशाख चांगला असून पदवी प्रदान करताना काेणती अडचण जाणवली नाही. पुणेरी पगडीला ज्यांचा विराेध हाेता त्यांच्यासाेबत विद्यापीठाने चर्चा करून वादावर ताेडगा काढणे आवश्यक हाेते. काेणत्याही टाेपी, पगडीपेक्षा शिक्षण महत्त्वाचे असून त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष्य देणे गरजेचे आहे. पुण्यातील आझम काॅलेजमधून एमएडची पदवी प्राप्त करत दाेन सुवर्णपदके विजेती राेगुनवर अल्ताफ म्हणाली, ब्रिटिशकालीन पाेशाखापेक्षा नवीन पाेशाख चांगला असून ताे भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचे दिसते. सुरुवातीला मीसुद्धा लाल रंगाचा घाेळदार गाऊन आणि टाेपी घालून पदवी घेईल, असे स्वप्न पाहिले हाेते. मात्र, काेणत्याही पाेशाखापेक्षा पदवी मिळणे महत्त्वपूर्ण आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...