आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरांची वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांनी चिकूवर भागविली भूक; दोन तास दिला ठिय्या ....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - एसटी बस बंद केली म्हणून शाळा बंद झाली ही कैफियत घेऊन ७० ते ८० किलोमीटरवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट कलेक्टोरेटमध्ये धडक दिली. जिल्हाधिकारी येतील म्हणून तब्बल दोन तास वाट पाहिली तिथेच ताटकळले. अखेर भूक लागली म्हणून चिकू खाऊन भूक भागविली.तरीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही म्हणून विद्यार्थी हिरमुसले. 

अखेर दोन तासांनंतर दोंडाईचा ते साहूर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायचा निर्णय झाला तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सकाळी ९ वाजेपासून घरून निघालेल्या विद्यार्थ्यांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास केवळ एकेका चिकूवर भूक भागवावी लागली. दोंडाईचा आगारातून निघणारी साहुर-दोंडाईचा ही एसटी बस बंद केली. त्यामुळे या मार्गावरील पाच गावांमधील विद्यार्थ्यांची शाळाही बंद झाली. एसटीअभावी शाळेत जायला अडचण येते. खासगी वाहनाचे भाडे परवडत नाही म्हणून पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे त्यांच्यासह पालकांनीही शिंदखेडा तहसीलदार, स्थानिक एस.टी. आगाराच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलन केले. 

 

यापूर्वीही रस्ता खराब असल्याचे कारण सांगून बससेवा बंद, सुरू केली जात होत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शिवसेनेचे शाना सोनवणे, बळीराजा संघटनेचे रमाकांत पाटील यांनी साहूर, शेंदवाडे, झोतवाडे, दाऊळ, मंदाणे येथील ५० ते ६० विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. बससेवा सुरू करावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे धरले. मात्र, लहान मुले असल्याने रस्त्यावर न बसता जिल्हाधिकाऱ्यांच्या आवारात बसावे, असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, जिल्हाधिकारी कामानिमित्त बाहेरगावी होते. आंदोलनाची प्रारंभी कोणीही दाखल घेतली नाही. मात्र, या वेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. एक तासानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांतर्फे चिटणीसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शानाभाऊ सोनवणे यांना चर्चेसाठी बोलविले. मात्र, त्यांनी चर्चेसाठी जायला नकार दिला. अधिकाऱ्यांनी खाली येेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, असा आग्रह धरला. या काळात विद्यार्थ्यांना केवळ एका चिकूवर भूक भागवावी लागली. आंदोलन करणाऱ्यांनी त्यांना चिकू दिले. 

 

आंदोलन संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्वत:चे पैसे खर्च करीत चुरमुऱ्यांचे पाकिटे विकत घेत भूक भागविली. या वेळी काजल कोळी, सोनाली कोळी, ज्ञानेश्वरी कोळी, जागृती कोळी, तनुप्रिया सोनवणे, भूमिका कोळी, नंदिनी कोळी, रूपाली कोळी, अक्षदा कोळी, हिमाली मालचे, ममता साळवे, विवेक देसले, नीलेश कोळी, हेमंत शिरसाठ, नीलेश निकम, हंसराज कोळी,क्रिष्णा सूर्यवंशी, योगेश कुवर, अजय कोळी, प्रितम सोनवणे सहभागी झाले होते. 

 

एसटी बस नसल्यामुळे शाळेत जाता येईना; खासगी वाहनाचे भाडे परवडत नसल्याने पालकांचेही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष 

एसटी बससाठी जिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहत त्यांच्याच दालनासमोर ताटकळत बसलेले विद्यार्थी. 


प्रांताधिकाऱ्यांनी केली मध्यस्थी… 
दीड वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी गणेश मिसाळ हे कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांना आंदोलन करणारे विद्यार्थी दिसले. त्यांनी चौकशी केली. तसेच चर्चेसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या, असे सांगितले. तसेच एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी खाली येऊन चर्चा करावी, असा आग्रह धरला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याप्रकरणात मध्यस्थी केली. 


तर मंत्रालयावर काढणार मोर्चा.. 
सहा महिन्यांपासून विद्यार्थी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहे. विविध कारणे सुरू करून कोणाच्या तरी दबावाखाली बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतरही बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना नेऊन मंत्रालयावर आंदोलन केले जाईल. त्याची जबाबदारी प्रशासनासह एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांवर असेल. -शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना 


रस्ता पाहणीचा निर्णय, आंदोलन स्थगित 
निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी चर्चानुसार एस.टी.महामंडळाचे वाहतूक अधिकारी के.व्ही.महाजन यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आले. त्यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार शानाभाऊ सोनवणे व सर्व विद्यार्थी आरडीसीच्या कार्यालयात चर्चेसाठी गेले. त्याठिकाणी एस.टी.महामंडळ व आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधींकडून आजच संबंधित रस्त्याची संयुक्त पाहणी करावी. गाडी जाण्यासाठी रस्ता योग्य असल्यास तत्काळ बससेवा सुरू केली जाईल, असा निर्णयं घेण्यात आला. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 


रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले तेव्हा अशी चिकू खायची वेळ आली. 


पोषण आहार ठेकेदार बदलण्याची मागणी… 
बसप्रमाणेच शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणारा पोषण आहार पुरवठादाराकडून निकृष्ट पुरवठा केला जात असल्याची तक्रार करण्यात आली. निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे निकृष्ट पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलण्यात यावा, अशी मागणीही या वेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय इतर मागण्याबाबतही चर्चा करून रस्त्यात काही ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी या वेळी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात दिली धडक; रस्त्याची पाहणी करून होईल बसचा निर्णय 

बातम्या आणखी आहेत...