माझं कोल्हापुरी प्रकरण / माझं कोल्हापुरी प्रकरण

Dec 14,2018 12:49:00 PM IST

कलावंताची कला निर्वात पोकळीत नव्हे, समकालीन समाज, संस्कृती, स्थापत्य, व्यापार, तंत्र अशा प्रभावातून आकारास येते. हे घटक कलेस पोषक वातावरण निर्माण करतात. ८० च्या दशकातल्या मी अनुभवलेल्या कोल्हापूरने प्रेमाने हे सारं मला दिलं. तिथल्या मनमोहक वाडे-वेशी-मंदिरांनी, रांगड्या भाषेचा सांभाळ करणाऱ्या दिलखेचक गल्ल्यांनी, गच्च हिरव्यागार शेता-कुरणांनी, संस्कृतीशी घट्ट नातं टिकवून असलेल्या सुंदर स्त्रियांनी माझ्यातल्या कलाविषयक जाणिवा समृद्ध केल्या. तंद्री लागलेल्या चित्रकार, लेखक-दिग्दर्शक,गायक-संगीतकार, नट-नट्यांनी साकारलेल्या निरागस जगाने मला जीवनदृष्टी दिली. परंतु या निरागस जगाला समृद्धीचं वचन देणाऱ्या कोल्हापूरलाच एकाएकी अवकळा आली आणि माझ्यातला कलावंत आतल्या आतल्या आक्रंदत राहिला...

पुण्यातल्या लोकमान्य नगरातलं आमचं छोटंसं घर. या घरात थोरला भाऊ अनिल अवचट शिल्पकलेच्या छंदाने पछाडलेला. एक दिवस तर त्याने थेट अल्बर्ट आइनस्टाइनचाच पुतळा करायला घेतला. घरभर ही पांढरी माती झालेली. पण त्याच्या छंदापुढे कुणी काय बोलणार. माती थापणे, ती कोरत बसणे असं तो दिवसभर करत राहायचा. संध्याकाळी त्याचे मित्र त्यावर चर्चा करायला घरी जमायचे. मी त्या वेळी शाळेत वरच्या वर्गाला असेन. मला त्या मातीचं फार आकर्षण वाटे. पण मलाच काय कुणाही लहान मुलाला मातीशी खेळायला आवडतं.माती हातात आली की मुलांना विलक्षण आनंद होतो. नैसर्गिक प्रक्रियाच असते ही. माझ्याबाबतीतही तेव्हा असंच काहीसं घडलं. त्यात अनिलने छंदामुळे काही शिल्पकलेवरची पुस्तकं घरी आणलेली. त्या पुस्तकांमुळे मला त्या वयात मायकल एन्जलोपासून आपल्याकडच्या शिल्पकार नानासाहेब करमरकरांपर्यंतच्या दिग्गजांची नावं कळली. एक दिवस बऱ्याच मेहनतीनंतर अनिलचा पुतळा पूर्ण झाला. पण गंमत अशी ही रात्रीच्या वेळी आमच्या त्या छोट्याशा घरात पांढऱ्या मातीचा तो पुतळा एखाद्या भूतासारखा दिसायचा. आजीला त्याची जाम भीती वाटायची. मग ती त्यावर टॉवेल टाकून झोपायची. मला मोठी मजा वाटायची त्या सगळ्या प्रकाराची.


एरवी, घरात शिल्पकलेचा नाद फुलत असला तरीही बाहेरच्या जगात म्हणजे त्या काळच्या पुण्यात आमच्यासाठी पुतळे म्हणजे एक झाशीच्या राणीचा आणि दुसरा शिवाजी मिल्ट्री स्कूलमधला शिवाजी महाराजांचा. मला आठवतंय, आम्ही मित्रमित्र शाळेच्या मधल्या सुट्टीत तो पुतळा पहायला जायचो. कधी कधी त्या बागेतला माळी आम्हाला पुतळ्याच्या रोमहर्षक गोष्टी सांगायचा. त्यात, ब्रिटिशांच्या काळात हा पुतळा मुंबई-पुणे असा खास ट्रॅक टाकून आणल्याची गोष्ट आम्हाला थरारक अनुभव द्यायची. अर्थात, पुतळ्यांबद्दल आकर्षण वाढत असलं तरीही गणपतीच्या मूर्तींनी मात्र मला कधी खेचून घेतलं नाही. मी पुतळ्यांमध्येच आनंद शोधत राहिलो.


त्याच दरम्यान नव्या पुलाजवळच्या कुंभारवाड्यातला एक जण माझा मित्र बनला. त्याच्या घरातले सगळे पहाटेपासून माती तुडवायचे. मला ते खूप आवडायचं. सोबतची इतर मुलं इथेतिथे उंडारत असताना मी या कुंभार मित्राच्या घरी जायचो. हाताने माती मळायचो. मडकी बनवायला शिकायचो. हा माझा कुंभार मित्र सकाळी भुईनळे बनवायचा. दुपारी बारा नंतर बनवलेले सगळे भुईनळे हातगाडीवर टाकून बोहरी आळीत जावून तिथल्या बोहरी दुकानदारांना विकायचा. मला त्याचं भलतं आकर्षण वाटायचं. कारण, हा भुईनाळे विकून घरी परतला की, स्वच्छ अंघोळ करायचा. त्यानंतर जेवण झालं की, घराबाहेरच्या झाडाखाली बसून निवांतपणे बाबूराव अर्नाळकर वाचत बसायचा. आम्ही त्याला गमतीत "हिजकॉक कुंभार' म्हणायचो. कारण त्याला हिचकॉक हा शब्द नीटसा उच्चारता यायचा नाही. कधी मूड असला की, हा मित्र म्हणायचा, चला जाऊया "अलका टॉकीज'ला, की मग आम्ही हिचकॉकचा सिनेमा बघायला जायचो. त्याला इंग्रजी अजिबात कळायचं नाही. आम्ही सिनेमा संपल्यानंतर इराण्याच्या हॉटेलात जायचो, तिथे गेलो की, त्याला सिनेमाची गोष्ट सांगायचो. थोडक्यात, मातीत काम करतानाचा तो आणि बाहेर आला की सोफिस्टिकेटेड वागणारा तो माझ्यात नकळत शिल्पकलेचं वेड पेरून गेला.
आता अडचण अशी होती, की शिल्पकला येण्यासाठी इंजिनिअरिंग शिकायला हवे. म्हणजे, सांगाडा कसा बनवायचा, काथ्या कसा करायचा, हत्यारं कशा प्रकारची घ्यायची यासाठी तंत्राचं प्राथमिक ज्ञान आवश्यक. पण त्या काळी पुरेशा सोयी नसल्यानं शिल्पकलेशी निगडित तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराचं प्रात्यक्षिक मला काही अनुभवायला मिळालं नाही. मग कधी तरी आम्ही मुंबईत आलो. चेंबूरला करमरकरांचा स्टुडिओ होता. तो पाहायचा योग आला.

करमरकरांकडे रोजच्या जगण्याचा एक भाग बनलेला कुत्रा, म्हैस, मासे डोक्यावर वाहून नेणारी कोळिण, असे रिअल लाइफ पुतळे बघायला मिळाले आणि मी तर थक्क झालो. म्हणजे, इतर जण साचेबद्ध काम करताहेत आणि करमरकर मात्र जगण्यातून शिल्प कोरताहेत. मला हा शिल्पकार फार म्हणजे फार भावला. पण, नंतर काही कारणांनी त्यांनी आपला हा स्टुडिओ अलिबागजवळ सासवण्याला शिफ्ट केला. शिल्पकलेसाठी अनुकूल वातावरण नसल्याने नाईलाजास्तव मी चित्रकलेकडे वळलो.


यथावकाश किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या मासिकांच्या कव्हरची कामं मला मिळू लागली. त्यासाठी मुकुंदराव किर्लोस्करांच्या ऑफिसमध्ये फेऱ्या होऊ लागल्या. तिथे गेलो की, भिंतीवर लावलेली पोट्रेट्स माझं लक्ष वेधायची, यातली बरीचशी "स्त्री'च्या अंकावरही झळकायची. मी एक दिवस मुकुंदरावांपाशी विचारणा केली. कळलं, रवींद्र मिस्त्री नावाचा कोल्हापूरचा मोठा शिल्पकार-चित्रकार आहे. तो ही पोट्रेट्स करतो. तो पुण्यात आला की, स्वारगेटला नटराज हॉटेलात उतरतो. दोन-तीन दिवस पोट्रेट करतो. परत जातो. रवींद्र शिल्पकारही आहे, कळल्यावर माझ्यातली अधुरी इच्छा एकाएकी उफाळून आली. मी मुकुंदरावांच्या मागेच लागलो. म्हटलं, मला रवींद्रला भेटायचंय. तसा एक दिवस रवींद्र भेटला. पहिल्या भेटीत केवळ हसला. रवींद्र दिसायचा थेट जिझस ख्राइस्टसारखा. गमतीत म्हणायचाही, तो सुतार मीही सुतार! अशा देखण्या रवींद्रचं मुकुंदरावांकडे पोट्रेट रंगवून झालं की, मी त्याला हॉटेलवर भेटायला जावू लागलो. छान गप्पा मारू लागलो. अशाच गप्पागप्पात मी त्याला माझा पुतळे करण्याचा मनसुबा बोलून दाखवला. रवींद्र म्हणाला, त्यात काय मोठंसं, कोल्हापूरला ये. रवींद्रने हे असं ये म्हटल्यानंतर वर्ष गेलं. पुढल्या वर्षी त्याने मला हॉटेलवर बोलवून घेतलं. म्हणाला, गाडी आणलीय, चल कोल्हापूरला. मी एका पायावर तयारच होतो.


ते माझं कोल्हापूरचं पहिलं दर्शन. मी तर पहिल्या नजरेतच गावाच्या प्रेमात पडलो. नंतर रवींद्रच्या स्टुडिओने मला झपाटून टाकलं. स्टुडिओत भिंतीला लागून हा १०-१२ फुटांचा मातीचा ढीग. पुतळा करण्यासाठीची सात-आठ फिरकी टेबलं. रवींद्र म्हणाला, हे बघ तुझ्यापुढ्यात सगळं काही आहे, काय करणारंय? मी म्हटलं, स्वत:चा पुतळा करणार. मोठ्या उत्साहात पुतळा करायलाही घेतला, पण फिरकीच कलंडली. माती थापायला घेतली, तर रवींद्र म्हणाला, अरे, माती कसली थापतोय, माती कोरायला शिक. तेव्हा कळलं, आपण माती किंवा दगड आणतो त्यातच शिल्प दडलेलं असतं. आपण त्या दगडातला अनावश्यक भाग तेवढा काढायचा असतो. रवींद्रने नंतर वेगवेगळ्या प्रकारची माती कशी वाळवायची, पुतळ्याचे डोळे कसे कोरायचे, केस कसे आकारास आणायचे, टेक्श्चर ठेवायचं हे सारं प्रेमानं शिकवलं. माझा हात साफ होत गेला. त्यातूनच कोल्हापूरला जाणं वाढत गेलं, तसे कोल्हापूरचे अनेकविध रंग उलगडत गेले. रवींद्रच्या ढेंगण्या-उंच, काळ्या-पांढऱ्या फक्कड मिशा असलेल्या एकापेक्षा एक विलक्षण मित्रांची ओळख होत गेली. कोल्हापूरचा थाट उलगडत गेला. नैसर्गिक श्रीमंती नजरेस येत गेली. भाषा, जेवणाच्या पद्धती, हिरवेगार डोंगर, पाऊसवारा, आंबेघाट, राधानगरी असं सारं माझ्यात भिनत गेलं. कोल्हापूरमध्ये रमत गेलो.


मी मुळात खेड्यातला. कलादृष्टी विस्तारणारी ऐश्वर्यसंपन्न खेडी मला मनापासून आवडतात. ८०च्या दशकात अनुभवलेलं कोल्हापूर हे असंच एक वैभवी खेडं होतं, माझ्यासाठी. इथली हवा प्रेमळ, इथली माती कलागंधाने घमघमणारी, इथलं पाणी मधाळ-मंजुळ. अशा या श्रींमत-समृद्ध कोल्हापुरातला रवींद्र हा कलामहर्षी बाबूराव पेंटरांचा मुलगा. बाबूराव ही तर एक अद््भूत असामी. लोहारकाम, सुतारकाम, चित्रकला, शिल्पकला या साऱ्या कलांत ते पारंगत. त्यांना सिनेमा बनवायचा होता. पण कुणी कॅमेराच देईनात. बाबूरावांनी काय करावं, तंत्रावर स्वार होत स्वत:चं कॅमेरा बनवला. त्याच ऐतिहासिक कॅमेऱ्याची प्रतिकृती बाबूरावांच्या शिल्पापुढ्यात ठेवलीय, आता. अर्थात, बाबूराव हे नुसतेच चित्रकार-शिल्पकार किंवा दिग्दर्शक नव्हते. नावीन्यपूर्ण तंत्र शोधून काढण्याची हौससुद्धा बेहद्द होती, त्यांना. युरोपीयन शैली फिकी पडावी, अशी रचना असलेला एकेकाळी त्यांचा स्टुडिओ होता. त्यातला मनमोहक वक्राकार जिना, प्रकाश खेळता रहावा यासाठी विशिष्ट कोनात लावलेल्या तिरप्या काचा, दहा-बारा फुटांचं मोठालं पेंटिंग करताना विशेषत: वरच्या अंगाला रंग-रेषा आणि आकाराचं गणित बिघडू नये, यासाठी पुलीचा वापर करून कॅनव्हास सोयीनुसार वर-खाली करण्याचं त्यांनी वापरात आणलेलं तंत्र हे सारं बघणाऱ्याला वेड लावायचं. चित्र रंगवताना रंग बदल करायचा, तर ब्रश आधी एका टरपेंण्टाइनमध्ये बुडवणे, मग तो स्वच्छ करणे, स्वच्छ झालेला ब्रश प्लेटवरच्या रंगात बुडवून रंगवायला घेणे, ही चित्रकारांची सर्वसाधारण पद्धत. पण असं करावं लागू नये, बाबूरावांनी एक पत्र्याचा डबा तयार केला. त्याला मधोमध नाजूक बार लावला. त्यात एका बाजूला टरपेण्टाइन, दुसरीकडे रंगांचे खाचे तयार केले. त्यामुळे एक रंग वापरून झाल्यानंतर ब्रश डब्यातल्या टरपेण्टाइनमध्ये बुडवायचा. मागून-पुढून मधल्या बारला पुसायचा. लगेच तिथल्या तिथे दुसऱ्या बाजूला रंगाच्या खाच्यात बुडवायचा. यात वेळ वाचायचा. एकाग्रता भंग व्हायची नाही.
जसे कलंदर बाबूराव तसाच मनस्वी रवींद्रही. सगळे त्याला दादा म्हणायचे. रवींद्र जितका देखणा तितकीच त्याची बहीण विजयमालादेखील गोरीपान, सुंदर. मला आठवतंय, रवींद्रकडे एक छानसं पाडस होतं. या पाडसाच्या गळ्यात घुंगरं होती. ते तरतरीत पाडस दिवसभर विजयमालाच्या मागेमागे घरभर फिरायचं. पाडसाचं हुंदडणं, हुंदडण्यासोबत कानी पडणारा घुंगरांचा किणकिण नाद, विजयमालाचं तरल वावरणं सगळं कसं नजरेत साठून राहायचं.


रवींद्रच्या वाड्याचं नाव कानाला सुखावणारं-‘अनाहत’. या वाड्याला भलामोठा दिंडी दरवाजा होता. तो पार करून आत गेलं की, स्टुडिओ. हा स्टुडिओ खरं तर एक अजबखानाच होता.स्टडिओत एकाच वेळी कलाकारांचा, कामगार-मदतनीसांचा, विद्यार्थ्यांचा आणि फक्कड मिशीधारी-फेटेधारी मित्रमंडळींचा वावर असायचा. या स्टुडिओच्या एका अंगाला चौक होता, जिथे चिकण माती जमा करून ठेवलेली असायची. तिथेच कितीतरी पुतळे, पुतळ्यांचे कमी अधिक उंचीचे साचे(Moulds) मांडले असायचे. हे साचेसुद्धा अजबच होते. म्हणजे, जॅकेट घातलेला साचा, टाय-कोट घातलेला साचा, कुर्ता घातलेला साचा, धोतर, चप्पल किंवा बूट घातलेला किंवा हाताची घडी असलेला साचा, घोड्यावर स्वार असलेला किंवा हाती तलवार धरलेला साचा,वगैरे. पण यातल्या एकाही साच्याला शीर नसायचे. मला प्रश्न पडायचा. पण, कुणाला मोठ्याने विचारायची सोय नसायची. रवींद्रच्या त्या स्टुडिओत कलाकार, कामगार, मदतनीस असे सगळे बऱ्याचदा न बोलता आपापलं काम करत असायचे. कुणी काय करायचं, कसं करायचं जणू ठरलेलं असायचं. नजरेनेच सारे व्यवहार पार पडायचे. नि:शब्दता जणू इथली खासियत असायची. माझी मात्र कोंडी व्हायची. पण एकदा शोध लावलाच. तेव्हा कळलं, जशी ऑर्डर येईल, त्याप्रमाणे साचा निवडायचा. त्यासाठीची ही पूर्वतयारी. म्हणजे, यशवंतराव चव्हाण किंवा इतर कुणा पुढाऱ्यांच्या पुतळ्यांची ऑर्डर आली, की कुर्ता-धोतर-चप्पलवाला साचा घ्यायचा, डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यांची ऑर्डर आली की, सुटाबुटातला साचा घ्यायचा, कुणाला विवेकानंद हवे असतील, हाताची घडी असलेला साचा वापरायचा. शिवाजी किंवा संभाजीची ऑर्डर आली की, घोड्यावर स्वार असलेला साचा वापरायचा. एक दिवस रवींद्रकडे ‘किलवर एक्क्या’ची ऑर्डर आली. किलवर एक्का? मी बुचकाळ्यात. रवींद्रसोबत काम करणारा सुतार नावाचा त्याचा मदतनीस म्हणाला. किलवर एक्का म्हणजे, शिवाजीचा अर्धपुतळा हो! एेकून मला गंमत वाटली. थोडं आश्चर्य वाटलं.


स्टुडिओ पाहून झाल्यावर एका क्षणी रवींद्र मला म्हणाला, कर तुला काय कराचचं ते. मी संभाजीचा पुतळा करायला घेतला. डोळे नसलेला. ऐतिहासिक घटनेचा लागलेला अर्थ मला शिल्पकलेतून मांडायचा होता. म्हणूनच प्रतिमेपलीकडचा, आयुष्याच्या अखेरीस पराकोटीची व्यथा भोगलेला संभाजी मी साकारायला घेतला. त्यानंतर विद्यार्थी मुलींसोबतचे महात्मा जोतिबा फुले असे काही आशयकेंद्री पुतळे मी करायला घेतले.


पुतळा करणं मनाप्रमाणे चाललं असलं तरीही एकीकडे स्टुडिओतली साचापद्धती काही स्वस्थ बसू देत नव्हती. वाटायचं, रवींद्र एवढा मोठा क्रिएटिव्ह आर्टिस्ट, बाबूराव पेंटरांचा वारसा सांगणारं त्याचं मोठं नाव, त्या नावाचा एवढा मोठा दबदबा, त्याच्या कलेला थोरा-मोठ्यांकडून मिळणारा मान-सन्मान, असं सगळं असताना साच्यातून पुतळे काढण्याचं कसलं भंकस काम करत बसलाय? रवींद्रने माझं म्हणणं ऐकून घेतलं. शांतपणे म्हणाला, आम्ही वेश्या आहोत, सुभाष वेश्या. तुला नाही कळायचं.


कळायचं नाही म्हणजे? मी थोडंच सोडून देणार होतो. परत एकदा कधी तरी त्याला टोचलं. तेव्हा अनिच्छेनेच त्याने तोंड उघडलं. म्हणाला, काय करणार होतो मी? वडील वारले होते. डोक्यावर कर्ज होतं. कसं फेडणार होतो? नाईलाजाने पडावं लागलं, मला या धंद्यात. रवींद्रचं, "पडावं लागलं मला या धंद्यात' हे वाक्य माझ्या डोक्यात राहिलं. पण तरीही रवींद्रसारख्या मोठ्या आर्टिस्टने साचेबद्ध काम करावंच कशाला? हा माझा प्रश्न. त्यावर रवींद्रचं म्हणणं-थोडं थांब, उद्या सकाळी सांगतो.


दुसऱ्या दिवशीची दुपार. स्टुडिओतलं काम बघत बसलो होतो. स्टुडिओच्या एका कोपऱ्यात ओल्या मातीतला पुतळा मोठ्या फडक्यात गुंडाळून ठेवलेला होता. तेवढ्यात वाड्याच्या दाराशी अॅम्बेसेडॉर गाडी येऊन थांबली. गाडीतून एक म्हातारे गृहस्थ उतरले. डोळ्यांना काळा गॉगल होता. बहुदा त्यांना स्पष्ट दिसत नसावं. सोबतच्या नेता-कार्यकर्त्यांनी त्यांना हाताला धरून आत आणलं. दिंडी दरवाज्यात गलबला झाला. गलका बाजूला सारत ते म्हातारं गृहस्थ फडक्यात गुंडाळलेल्या पुतळ्याजवळ गेले. पुतळा शिवाजीचा होता. आधी जिरेटोप, मग डोळे असं करत त्यांनी तो पुतळा दोन्ही हातांनी चाचपला. नाकाजवळ जसा त्यांचा हात गेला, तसे ते मोठ्याने म्हणाले. नाक लांब पोपटासारखं कर की. त्यावर, ‘थांबा दादा' म्हणत रवींद्रचा सहकारी सुतार पुढे आला. त्याने तार घातली. चिमटीत पकडून सराईतपणे नाक पोपटासारखं बाकदार केलं. म्हातार गृहस्थांचं समाधान झालं. म्हणाले - ओता आता पुतळा! आणि पाठोपाठ लवाजमा आला तसा निघून गेला.


मी आपला दिग्मुढ. "पडावं लागलं मला या धंद्यात' हे रवींद्रचं वाक्य डोक्यात इको झालं. स्टुडिओतला गलका ओसरला, तशी चौकशी केली. म्हटलं कोण ते? अवो, ते भालजी पेंढारकर! मी अवाक.
आबालाल रहेमान, दत्तोबा दळवी, वडणगेकर अशा अव्वल पेंटरांचा सांभाळ केलेल्या करवीर नगरीचा मला भलताच लळा लागला होता. रवींद्रच्या संसर्गजन्य संगतीचा भाग होताच. त्यामुळे मध्येच कधीतरी मी महिना-महिना कोल्हापुरात रवींद्रचा पाहुणा म्हणून राहू लागलो. हळूहळू कोल्हापूरच्या भाषेतलं, जगण्यातलं रांगडेपण आकळू लागलं. मी त्यांच्यातलाच एक होत गेलो. रवींद्र आणि त्याचे मित्र मला प्रेमाने "वाघरू' नावाने हाक मारू लागले. दिसलो की, म्हणायचे,आलं वाघरू पुण्याहून!


एव्हाना एक गोष्ट मी शिकलो होतो. ती म्हणजे,शहरी आततायीपणाला इथे जराही थारा नाही. कोल्हापूरची स्लो मोशनमधली स्वत:ची अशी चाल आहे, तिचा थाट बिघडवायचा आगाऊपणा आपण चुकूनही करायचा नाही. स्लो मोशनचं हे वैशिष्ट्य रवींद्रच्या स्टुडिओतही ओतप्रोत भरलेलं असे. दिंडी दरवाज्याकडे नजर टाकताच, हा संथगती कारभार नजरेस पडे. सकाळपासून शांतपणे लोक येत रहात. त्यात कधी पार्वती थिएटरचे शेळके असायचे, कधी गोखले कॉलेजचे प्रिन्सिपॉल असायचे. कधी चित्रकलेचे विद्यार्थी रवींद्रकडे आपापली चित्रं घेऊन यायचे. वातावरणाची अदब न बिघडवता त्यांच्यात चर्चा रंगायच्या. दुपारी १२ पर्यंत पुतळ्याची, पेंटिंगची कामं चालायची. एकदाचे बारा वाजले की, आलेले सगळे जण निघून जायचे. रवींद्र मातीत मळलेले हात धुवायचा. धुवून झाले की मला "चल रे'... असं म्हणायचा. इथून पुढे साउंड नाही. कुणी कुणाशी बोलायचं नाही. सारं नजरेनं आणि इशाऱ्याने घडत राहायचं. एखाद्या सायलेंट मुव्हीसारखं! रवींद्रने चल म्हटल्याच्या काही मिनिटांच्या आत चौकातल्या बाबूराव पेंटरांच्या स्मारकाला ‌वळसा घालून आलेली रिक्षा गिरकी घेऊन स्टुडिओच्या दाराशी उभी राहायची. रवींद्र रिक्षात. मी त्याचे मागे. रिक्षावाल्यालाही काही बोलायचं-सांगायचं नाही. तो न बोलता रिक्षा हाणायचा. ट्रॅट्रॅट्रॅ करत रिक्षा सरळ एका पानपट्टीपुढे उभी करायचा. या पानपट्टीतला छोटा फ्रीज रिक्षात बसल्याबसल्याही लक्ष वेधून घ्यायचा. रिक्षा थांबली की, दादा हात बाहेर काढायचे की, लगेच त्यांच्या हातावर "विल्स' सिगरेटचं पाकीट यायचं. तिथून पुढचा मुक्काम एका वाड्यातलं दारुचं दुकान. वाटेत कुणी कुणाशी बोलायचं नाही. दादा मात्र न चुकता आकाशाकडे बघायचे. ढग आहेत की नाही, यावरून व्होडका घ्यायची की रम, हे ठरायचं. दुकानदार हातात क्वार्टर टिकवायचा.


तिथून आमची रिक्षा पुन्हा ट्रॅट्रॅट्रॅ करत उद्यम नगरात पोहोचायची. इथे सगळाच सन्नाटा. म्हणजे बंद पडलेले कारखाने, गंजत चाललेली मशिनरी, गर्डर, पत्रे, ओकीबोकी खोकी असं सगळं. ते पाहून कधीकाळच्या इथल्या समृद्ध कारखानदारीचा अंदाज यायचा. हा सन्नाटा मला फारच अर्थगर्भ वाटायचा. त्यातून चित्रमालिका डोक्यात आकार घेऊ लागायची. इथल्याच दोन-तीन गाळ्यात मिळून एखादं रेस्टॉरंट सुरु असायचं. हॉटेलात एक मोठालं डायनिंग टेबल आणि या टेबलाभोवती सकाळी स्टुडिओत येवून गेलेले फेटेधारी, मिशीधारी लोक बसलेले असायचे. यातल्या प्रत्येकाकडे कागदात गुंडाळलेली बाटली असायची आणि सगळ्यांकडचा ब्रँड एकच असायचा. मग सारे न बोलता बसायचे. रवींद्रचा सहकारी सुतार बसल्या बसल्या टेबलावर बोटांनी टकटक करत राहायचा. नव्हे, रम की व्होडका याचा अंदाज देत राहायचा. मग पटापट चिवड्याचे पुडे सुटायचे. निवांतपणे पिणं आणि खाणं चालायचं. पुढचे दोन-अडीच तास एकच क्वार्टर एकेका घोटासह रिकामी होत राहायची. कुणीच कुणाशी बोलायचं नाही. पण न बोलताही बरंच काही सांगितलं - एेकलं जायचं. माझी अडचण व्हायची. एक तर मी दुपारी पीत नसे आणि पिताना नि:शब्द राहणे मला सहन होत नसे. पण हे असंच घडायचं अनेकदा.


अडीच-तीनच्या सुमारास परत रिक्षा यायची. त्या रिक्षाने आम्ही रवींद्रच्या वाड्यावर परतायचो. घरी जेवण तयार असायचं. मटण-रश्यांचं फर्मास जेवण झालं की, स्टुडिओतच ताणून द्यायचो. झोप झाल्यानंतर चहा तयार असायचा. रवींद्रची बहीण आम्हाला आवाज द्यायची.
संध्याकाळी सहा-साडेसहा वाजले की, परत रिक्षा स्टुडिओच्या दाराशी आलेली असायची. आम्ही न बोलताच रिक्षात बसायचो. आता स्थळ वेगळं. ते कुठेही असायचं. कुणाचा वाडा, घर किंवा हॉटेलही. अगदी हॉटेलात गेलो, तरी मालकाची बायको खास घरून मटणाची ताटं पाठवायची. हा रवींद्रदादांना दिलेला मान असायचा. एका पॉइंटनंतर रवींद्रची तार लागायची. जे. कृष्णमूर्तींच्या फिलॉसॉफीवर हा धीरगंभीर आवाजात तासनतास बोलत राहायचा. इथे नि:संग, साऱ्यापासून अलिप्त होऊ पाहणारा असा वेगळाच रवींद्र गावायचा. साधारण रात्री १२ पर्यंत हा कार्यक्रम चालायचा. त्याचं ते रुप पाहून, माझी मात्र तडफड वाढायची.


कोल्हापुरात असताना असं अनेकदा घडायचं. कधी तरी कुणाचं दुपारचं निमंत्रण यायचं. कधी रवींद्रच्या वाड्यावर एकाच वेळी १५-१६ लोक जेवायला असायचे. जेवणात नाना तऱ्हेचे झणझणीत मसाले, तिखटजाळ रश्शे. ते ओरपताना माझी दमछाक व्हायची. सटासट शिंक येत राहायची. डोळ्यातून पाणी यायचं. पित्ताचा त्रास व्हायचा. रक्तसुद्धा पडायचं. पण त्यातून सुटका नसायची. खाल्लं नाहीतर प्रेमाचा मार पडायचा. यावरचा उपाय म्हणून अनेकदा मी पांढरा कागद गुपचूप सोबत ठेवायचो. मटणाच्या तुकड्यांना लावलेला मसाला अनेकांच्या नकळत कागदाने काढून टाकायचो. माझी ती दयनीय अवस्था पाहून रवींद्रची बहीण कधीमधी दही-भात करून द्यायची. किती तरी वेळा हे असंच घडायचं. मात्र प्रत्येक वेळी नवी माणसं, म्हणजे अगदी कथाकार शंकर पाटील, फडणीस असेही गपीष्ट लोक आणि त्यांच्या नव्या तऱ्हा बघायला मिळायच्या. माझी तर खासच बडदास्त राखली जायची. रवींद्रचा चाहता वर्ग खूप मोठा, त्यामुळे काही कमी पडू दिलं जायचं नाही. अगदी दमलो-भागलो असताना हातपाय दाबायलासुद्धा पैलवान मंडळी स्वत:हून पुढे यायची. म्हणजे,आपण दमून-भागून झोपलोय. जाग आल्यावर पाहतो तर काय पैलवान आपल्या पायांना मालिश करत असायचे. हा पाहुणचाराचा अक्षरश: कळस असायचा. कोल्हापुरी प्रेमात मी अक्षरश: चिंब होऊन जायचो.


एके दिवशी बाहेर तुफान पाऊस पडत होता. मी आळसावलो होतो. म्हटलं, दादा चला फिरायला. काय चमत्कार, काही वेळातच वाड्याच्या दाराशी दोन-तीन जीपा आल्या. भर पावसात आम्ही सुसाट निघालो,राधानगरीकडून आंबेघाटाकडे. सभोवार दाट धुकं पसरलेलं. अवघड वळणं पार करत एका स्पॉटला खाडकन जिपा थांबल्या. सगळे खाली उतरलो. प्रत्येकाने हातात ग्लास घेतला. त्यात एकेक करत रम ओतली. मी म्हटलं, दादा पाणी? तर समोर एक धबधबा कोसळत होता. म्हणाले, बसा कट्ट्यावर आणि भरा पाणी!


या क्षणी आम्ही एका वाड्यात बसलोय. रस्त्यावर वाहतूक तूरळक आहे. दादा भूक लागलीय... असं मी म्हणायचा अवकाश. अर्ध्या तासात एक टेम्पो वाड्याशी दाराशी. गाद्या घातलेला. चौरंग लावलेला. आम्ही निघालो. बाहेर जोरदार पाऊस सुरु. एका ठिकाणी येऊन थांबलो. सगळीकडे धुकं दाटलेलं. त्या धुंदफुंद वातावरणात टेम्पोमध्ये बसलेले आम्ही मस्तपैकी मटणाचं जेवण जेवतोय. वर्तमान क्षण सुंदर करण्याच्या रवींद्रच्या या तऱ्हा मन जिंकून टाकायच्या...
एकदा म्हणे असेच सगळे एकत्र बसले होते. मध्येच कुणीतरी प्रश्न केला. दादा त्रिवेंद्रम कुठेय हो? झालं. दादांनी ऐन पावसाळ्यात समद्यास्नी त्रिवेंद्रमला नेलं. मस्त महिना-पंधरा दिवस सगळे त्रिवेंद्रम राहिले. मनसोक्त प्यायले. नवा प्रदेश, तिथली हवा, तिथली माणसं, तिथले जीवनरंग टिपत राहिले. मला याची काहीच कल्पना नाही. मी आपला पुण्यातल्या माझ्या स्टुडिओत मग्न असताना, एक दिवस रवींद्रसह अनेक जण येऊन धडकले. म्हटलं कुठून आलात एवढे सगळे? तर म्हणाले त्रिवेंद्रम! मी पुन्हा एकदा चकित. माणसानं मनस्वी, मनस्वी म्हणजे किती असावं? मला प्रश्न पडायचा, व्यवसायाने लादलेल्या कोंडलेपणातून बाहेर पडण्यासाठी रवींद्र असा स्वच्छंदी तर होत नसेल?

एका मुक्कामात अशीच मला पन्हाळ्याला जाण्याची हुक्की आली. पन्हाळा ही माझी भयंकर आवडती जागा. माझा विक पॉइंट. माझी इच्छा म्हणजे, रवींद्रचं आद्यकर्तव्यच जणू. मग काय संध्याकाळी जीपा आल्या. आम्ही जिपांमध्ये बसलो. वाटेत कुणी कुणाशी काहाही बोललं नाही. न बोलताच आम्ही थेट व्हेस्पा स्कूटरवाल्या लोहियांच्या बंगल्यावर पोहोचलो. लोहिया आणि रवींद्रचा खासा दोस्ताना होता. त्यामुळे तेव्हाच काय इतरवेळीसुद्धा सगळं साग्रसंगीत पार पडायचं. पांढरा-तांबडा रस्सा, मटणाचे असंख्य प्रकार. एका मुक्कामात रवींद्रचं कृष्णमूर्तींवरचं निरुपण सुरू असताना नर्गिस बानू आतल्या खोलीत बाहेर आली. लावणीचा रीतसर कार्यक्रम झाला. पान, विडे, दारू आणि नंतर जेवण मग तबकातून बिदागी असा खासा थाट रंगला. नर्गिस बानूची काय ती नजाकत, काय ती अदा. मी तर तृप्त-समृद्ध झालो. चित्रकाराच्या नजरेतून हे नवं जग अधाशासारखं टिपत राहिलो.


एखादी गोष्ट मनात आली आणि ती केली नाही, असं रवींद्रच्या बाबतीत कधीही घडलं नाही. ही दिलदारी जशी त्याची आगतस्वागतात झळकायची, तशी त्याची शिल्पकलेतली पॅशनही कधी लपून राहायची नाही. रवींद्र पुतळा करायचा म्हणजे, पुतळा करायचा. भव्यदिव्यता त्यात उतरायची. त्याचं डिटेलिंग भल्या भल्यांना चक्रावून टाकायचं. कोल्हापुरातला हाती तळपती तलवार उंच धरलेला फेमस ताराबाई पुतळा ही रवींद्रचीच एक भव्यदिव्य कलाकृती. पण हा पुतळा करतानाच्याही अनेक गमतीजमती. म्हणजे, स्केलेटन, मोल्ड, व्हॅक्स मोल्ड अशा क्रमाने पुतळ्याची तयारी होते. पण हा पुतळा करताना अनेक अडचणी आल्या. एक दोनदा पुतळ्याचे धूड कोळसले. पण, एकदाचा पुतळा तयार झाला. तो उभारण्याची वेळ येऊन ठेपली. रीतसर उंचसा चौथरा उभारला गेला. क्रेन आली. क्रेनच्या मदतीने घोड्यांच्या चार पायांवर पुतळा चौथऱ्यावर ठेवणे एवढंच काय ते उरलं. पण एक-दोनदा असं घडलं की, क्रेनने खाली आणताना पुतळ्याची मागची बाजू झुकली आणि चार पायांऐवजी तो घोड्याच्या शेपटीवर आकाशाकडे तोंड करून टेकवला गेला. रवींद्र म्हणाला, काम झालं! एक अख्खा शेपटीवर तोललेला पुतळा. म्हटलं तर हा तांत्रिक घोटाळा. पण रवींद्रच्या कलादृष्टीने त्या घोटाळ्यालाही अर्थ दिला. अश्वारुढ ताराबाईंच्या जिगरीचं अस्सल दर्शन त्या गगनभेदी रुपामध्ये लोकांना घडलं.


रवींद्र हा जात्याच कलंदर. पण निळू फुले, अरुण सरनाईक असे सगळे दिग्गज एकत्र यायचे तेव्हा कळस व्हायचा. मैफली उजळायच्या. हे सगळेच जीवश्चकंठश्च यारदोस्त. वरचेवर एकमेकांकडे येत -जात राहायचे. माझी निळूभाऊंशी ओळख पुण्यापासूनची. एक दिवस स्टुडिओत पडिक असताना निळूभाऊंची निळी अॅम्बेसेडॉर गाडी ही अशी रवींद्रच्या दाराशी उभी. सोबत अरुण सरनाईकही होते. दादांचा आदेश निघाला. आम्ही सगळे एका शेताकडे निघालो. शेतात आंब्याची असंख्य झाडं आणि ती झाडं पार करून एक भलं मोठालं दगडी चिऱ्यांचं घर. आम्ही तिथे गेलो. पाहतो तर घराबाहेर हा चपलांचा ढिग जमलेला. आत सगळे मिशाधारी- फेटेधारी बसलेले. दादाचं सगळं काम सायलेंट मुव्हीतल्यासारखं असल्याने आपण कुठे चाललोय, कुणाकडे चाललोय काहीही विचारायची सोय नव्हती. मला संशय. कुणीतरी गेलंय बहुदा. घराच्या शेताच्या बाजूकडे चौथरा आणि तिथल्या खिडकीत एक गृहस्थ शून्यात बसलेले . धीरगंभीर मुद्रेने. पश्चिमेकडे नजर लावून. मी न राहवून निळूभाऊंना कानात विचारलं. म्हणाले, शांत बस.


पुढचे क्षण नि:शब्दतेत गेले. शून्यात बसलेले ते गृहस्थ एकाएकी अस्वस्थ चित्ताने उठले. येरझरा घालू लागले. माझा आपलं पुन्हा अंदाज बांधणं सुरू झालं. काही तरी सिरियस घडतंय बहुदा, असं समजून मी गप्प राहिलो. आणि एक क्षण येरझरा घालणारे घराचे मालक थांबले. पश्चिमेला बघत मोठ्याने ओरडले-बुडाला!!! त्यांनी बुडाला म्हटलं आणि जमलेल्यांनी लोकांनी पटापट बाटल्या काढल्या. ग्लासं भरली. मी पुन्हा चक्रावलो. रवींद्र म्हणाला, घे की रे वाघऱ्या. मग निळूभाऊंच्या भन्नाट नकला झाल्या. अरुण सरनाईकचं मस्त गाणं रंगलं. काय गायचा गडी. त्याचं गाणं ऐेकून ऐकणारा हवेत तरंगलाच म्हणून समजा.


कोल्हापूरच्या एका वास्तव्यात परत एकदा नि‌ळूभाऊंची गाठ पडली. आता निळूभाऊ गावात यायचे कळल्यावर त्यांना बघायला पाच-सहा हजार सहज गोळा व्हायचे. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरातल्या एका गल्लीत गेलो, परिस्थिती काही वेगळी नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा निळूभाऊंचे चाहते माणसं उभे होते. त्यांच्यातून वाट काढत, मी आणि नि‌ळूभाऊ तीन मजली घरात शिरलो. घराचा मालक ठेंगणा-ठुसका. गुटगुटीत म्हणावा असा. अंगात सफारी सूट घातलेला. या गृहस्थांना आम्ही एस.पी. कॉलेजजवळच्या जीवन हॉटेलाच्या बाल्कनीत अनेकदा बघितलेलं. लोक त्यांना प्रिन्सिपॉल म्हणायचे. हे प्रिन्सिपॉल दोन चार दिवस नव्हे चांगले महिनाभर हॉटेलात मुक्काम ठोकून असायचे. आम्हाला प्रश्न पडायचा. कोण हे प्रिन्सिपॉल? त्यांना प्रिन्सिपॉल का म्हणतात? महिनाभर कसे राहतात इथे? तर तेच गूढ भासणारे प्रिन्सिपॉल आता आमच्या समोर उभे. आधी त्यांनी आम्हाला थेट वरच्या मजल्यावर नेलं. तिथे त्यांची बायको नटून-थटून हजर होती. नमस्कार, रामराम झाले. निळुभाऊंसह आमचं दणक्यात स्वागत झालं. खाण्या-पिण्याचा कार्यक्रम सुरु झाला. तोवर ती नटून-थटून असलेली बायको हसता चेहरा ठेवून आज्ञाधारकपणे उभी. काही वेळाने कार्यक्रम आटोपला. आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. इथे दुसरी एक नटून-थटून असलेली बाई समोर आली. निळूभाऊंच्या थोड्याफार गप्पाटप्पा झाल्या. आम्ही तळमजल्यावर आलो. तर इथे आणखी तिसरी एक बाई तशीच टापटीप, आमच्यासमोर उभी. सगळा कार्यक्रम आटोपल्यावर नि‌ळूभाऊंकडे चौकशी केली. कळलं, सफारीधारी गृहस्थाच्याच या तीन बायका. तिघींचे तीन स्वतंत्र्य मजले. ही कोल्हापुरी जिगर पाहून मी हैराण. तरीही मनात संशयी विचार - या तिघींपासून काही काळ सुटका करवून घेण्यासाठीच प्रिन्सिपॉल पुण्यात येत असावेत कदाचित.


हा म्हटला तर एकप्रकारचा अतरंगीपणाच. पण मोठ्या थाटात केलेला. असाच आणखी एक अतंरगीपणाचा अनुभव मी कोल्हापुरात त्या काळी घेतला. म्हणजे, झालं असं की, आमचे एक संस्थानिक मित्र होते निंबाळकर नावाचे. ताराबाई पार्कला राहायचे. त्यांच्या आमंत्रणावरून पुण्याहून डॉ. भिंगारे, वेलणकर असे काही मित्र कोल्हापुरात गेलो. गाडी लांबवर उभी केली, वेलणकर म्हटलं, अरे जाऊन निंबाळकरांना आम्ही आलोय असा निरोप तर दे. वेलणकर उठला. तोऱ्यात गेला आणि काही सेकंदात तंतरल्यासारखा तसाच भरधाव परतला. म्हटलं, काय रे झालं काय? घाबऱ्याघुबऱ्या आवाजात म्हणाला, पुण्याला परत जाऊया. मला कळेना. म्हणून सगळे उतरलो आणि निंबाळकरांच्या बंगल्यात शिरतो, तोच गेटवर "वाघापासून सावध रहा' अशी पाटी दिसली. गेटच्या आत डोकावलो तर कबुतरांसाठी असावा अशा एका यथातथा पिंजऱ्यात चक्क हट्टाकट्टा वाघ! थोडं भीतभीतच आत गेलो, तर उघड्या अंगाने बंगल्याचा मालक हातात विड्यांचं तबक घेऊन आमच्या स्वागतासाठी उभा. म्हणाले, अरे घाबरताय काय प्योरांनो, काही नाही करणार तो. बंड्याय तो आमचा... अरे प्येढा खातो तो... बंड्या? पेढा खातो? कुणी कुत्र्याबद्दल बोलावं, तसं निंबाळकर वाघाबद्दल बोलत होते. आम्ही सारे बधीर झालो होतो. निंबाळकरांची ही तऱ्हा कापरं भरवणारी होती. पण, तेव्हा कोल्हापुरात अनेकांकडे हरण, मोर, पाडस, बिबळ्या असं कायकाय पाळलेलं असायचं, अनेकांना शिकारीचा लई नाद होता. अनेकांच्या घरात बंदुका टांगलेल्या होत्या. शिकारीचे ऐटदार फोटो टांगलेले होते.


फोटोवरून आठवलं. एकदा असंच कुणाबरोबर तरी एका भल्यामोठ्या वाड्यावर गेलो होतो. ज्यांना भेटायला जायचं होते, ते छत्रपतींचे वंशज होते. म्हणून आम्ही आपले जरा सावधच होतो. वाड्यावर गेलो, बघतो तर चट्टेरीपट्टेरी अंडरवेअर घातलेला एक टक्कल पडलेला माणूस झाडांना पाणी घालत होता. त्याला विचारलं छत्रपती आहेत का? म्हणाले, मीच छत्रपती! या छत्रपतींनी आम्हाला घरात नेलं. घरातल्या भिंतीवर भारदस्त पूर्वजांची मोठमोठी चित्तवेधक तैलचित्रं आणि त्याच रांगेत या छत्रपतींचा नजरेला खुपणारा भला मोठा कृत्रिम भासवा असा फोटो. त्याखाली लिहिलेलं-छत्रपती अमूकतमूक बी.ए. एलएलबी! मला थोडी गंमत वाटली. हसू आलं. पण त्याही पेक्षा एकप्रकारचं विषण्णपण आलं. तैलचित्राच्या जागी लागलेल्या फोटो आणि फोटो खालच्या ओळीत मला शाहू महाराजांच्या कलासंपन्न नि प्रागतिक कोल्हापूरची पडझड जाणवली.


ती पडझडीची सुरुवात होती की पडझडीनंतरची भग्नावस्था होती? मला ठरवता येत नव्हतं. कारण, सबंध हिंदुस्थानात नव्हे जगातही चित्र आणि शिल्प कलेसाठी बडोदा, बॉम्बेइतकंच कोल्हापूरही मोठं नावलौकिक राखून होतं. केवळ कलाच कशाला? कुस्ती, आरोग्य, सामाजिक चळवळी, सिनेमा, नाटक, शास्त्रीय गानन-वादन, तमाशा यात कोल्हापूरला तोड नव्हती. त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजांचं कोल्हापुरात येणं झालं नाही, असं कधी घडत नव्हतं. राज कपूर, देवआनंद झालंच तर दिलीपकुमारसारखा नट भालजी पेंढारकरांना भेटायला म्हणून कितीदा तरी कोल्हापुरात जायचा. तिथे गेला की, बॅडमिंटनचं कोर्ट तयार करून त्यावर मनसोक्त खेळायचा. हे तर मला खुद्द त्यानेच सांगितलेलं. म्हणूनच मन मानायला तयार नव्हतं.


पण एकाएकी सगळे रसातळाला गेलं. उद्योग संपले. स्टुडिओ नामशेष झाले, कलावंत अस्तंगत झाले. शिल्पकला अधुरी राहिली. चित्रकला गोठली. एकाच पिढीत कोल्हापूरला अवकळा आली. शाहू महाराजांनी स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात अवतरलं आणि पुढच्या काही क्षणांत पावसाच्या सरीसह वाहूनही गेलं. पण असं युद्ध न होता कोल्हापूर कसं संपलं? कलासमृद्ध करवीर नगरीवर काळा ढगाने वस्ती कशी केली? कोल्हापूरची कला तांबड्या-पांढऱ्या रश्श्यात बुडाली की काय, कोल्हापूरचं वैभव दारूत वाहून गेलं की काय? हा आरोप नाही, माझा संशय आहे. यावर संशोधन व्हायला हवंय.


माझ्यासाठी रवींद्र गेला, तेव्हाच कोल्हापूरच्या नात्याला विराम मिळाला. पण आजही जेव्हा कधी कोणतं तरी काम आटोपून कोल्हापूरहून परततो,घाटावर येतो, तेव्हा सारखं वाटत राहातं, कोल्हापूर पुन्हा एकदा कलेनं भरभरून जावं, देशोदेशीचे प्रतिभावंत इथे पुन्हा स्थायीक व्हावेत. जसं सासवण्याला शिल्पकार करमरकरांचा वारसा आहे, तसंच कोल्हापुरातही घडावं. उमेदीच्या काळात ज्या कोल्हापूरने माझ्यातलं कलाभान विस्तारलं. रवींद्रसारखी आभाळाएवढ्या उंचीची आणि विशाल हृदयाची माणसं मला भेटवली, त्या कोल्हापूरला ही संधी पुन्हा मिळावी...

X