Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Subhash Vare is ready for free discussion on constitution with mohan bhagwat

संविधानाबाबत सरसंघचालकांशी कोठेही मुक्तचर्चा करण्याची तयारी : सुभाष वारे

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 12:16 PM IST

दिल्लीत जंतरमंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्या जातात. त्याचा व्हिडीओही व्हायरल केला जातो ही गंभीर बाब आहे, पण शासनकर्ते

 • Subhash Vare is ready for free discussion on constitution with mohan bhagwat

  अकोले- दिल्लीत जंतरमंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्या जातात. त्याचा व्हिडीओही व्हायरल केला जातो ही गंभीर बाब आहे, पण शासनकर्ते त्याकडे डोळेझाक करत आहेत. मंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यास आम्ही मज्जाव केला, म्हणून आम्हाला देशद्रोही ठरवणारे हे सरकार, संविधान जाळणाऱ्यांना देशद्रोही का ठरवत नाही? त्यांच्यावर तसा गुन्हा का दाखल केला जात नाही? खरेतर या लोकांना संविधान का नको आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्या संविधानात भारतीयत्व दिसत नाही, असे विधान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी आपली कोठेही व केव्हाही मुक्त चर्चा करण्याची तयारी आहे, असे जाहीर आव्हान राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वारे यांनी मंगळवारी दिले.


  येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या विवेकवाहिनी व वादविवाद मंडळाचे उद्््घाटन वारे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे होते. मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागाचे निमंत्रक डॉ. संदीप कडलग, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, सचिव यशवंत आभाळे, सहसचिव अँड. भाऊसाहेब गोडसे, सदस्य आरिफ तांबोळी, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके या वेळी उपस्थित होते.


  वारे म्हणाले, संविधानाने आपल्याला शिक्षणाचा, मालमत्ता धारण करण्याचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, यामुळे मूठभर लोकांच्या हाती असलेले अधिकार त्यांच्या हातातून गेल्यानेच संविधान जाळण्यासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. संविधान जाळणारे देशद्रोही नाहीत का? संविधानाने माणसाला माणूसपण दिले हे समजून घेण्याची गरज आहे. संविधान तुमच्या-आमच्या जगण्यावर भाष्य करणारे आहे. संविधान हे शिक्षण घेऊ न शकलेल्या, दारिद्र्यात खितपत पडलेल्या, घरातही अत्याचार सहन करत असलेल्या लोकांसाठी आहे. संविधान केवळ संसदेसाठी नसून ते घरांसाठीही आहे. घरात वागताना परंपरेचा कायदा चालणार नाही हे संविधान सांगते. संविधान धर्माला किंवा कुटुंबाला नसून व्यक्तीला आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. संविधानाचा सखोल अभ्यास करणारे फार कमी लोक असून अनेकजण केवळ अल्प माहितीच्या आधारे संविधान व संविधानाने दिलेल्या अधिकारावर बोलत असतात.


  संविधान नसताना या देशात एकलव्याचा अंगठा घेतला जात होता, कारण त्याला शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातीमाबी शेख यांनाही बहुजनांना शिक्षण मिळावे म्हणून घराबाहेर पडून लढावे लागले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध, शाहू महाराजांच्या काळातील वेदोक्त प्रकरण ही याचीच उदाहरणे आहेत. घरातील पूजाअर्चा करून आम्हाला शुद्र म्हणून मालमत्ता धारण करण्याचा अधिकार नाही हेच आमच्याकडून वदवून घेतले जात आहे. त्याचमुळे लाच घेतल्याशिवाय काम न करणारा अधिकारी, मिशांवर पीळ मारून शोषण करणारा, जातीजातींमध्ये तेढ वाढवणारा, कार्यालयात व घरातही महिलेशी नीट न वागणारा व परीक्षेत कॉपी करून पास होणारा अशा पाच गटांतील नागरिक कधीच देशप्रेमी होऊ शकत नाहीत, असे वारे म्हणाले.


  अध्यक्ष आंबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय भगत यांनी केले. स्वागत यशवंत आभाळे यांनी केले. परिचय विवेक वाहिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. किरण जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रिती पांडे हिने केले. वादविवाद मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब मेहेत्रे यांनी आभार मानले.

Trending