International news, / झाकीर नाईकला साेपवा; माेदींची मलेशियन पंतप्रधानांकडे मागणी

नाईकच्या मुद्द्यावर दाेन्ही देशांचे अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील : महाथीर 
 

Sep 06,2019 09:54:00 AM IST

व्लादाेवाेस्ताेक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी मलेशियाचे समकक्ष महाथीर माेहंमद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. बैठकीत झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरही चर्चा झाली. नाईकला भारताला साेपवण्यात यावे, अशी मागणी माेदींनी केली. त्यावर महाथिर यांनी उच्चस्तरीय अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील, असे आश्वासन दिले. ईस्टर्न इकाॅनाॅमिक फाेरमच्या (ईईएफ) पाचव्या संमेलनाच्या निमित्ताने उभय नेत्यांत भेट झाली.


माेहंमद यांच्याशी चांगली बैठक झाली. विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याच्या दिशेने दाेन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे माेदींनी ट्विट करून स्पष्ट केले. नाईकच्या मुद्द्यावर दाेन्ही देशांचे अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दाेन्ही देशांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे दाेन्ही नेत्यांनी म्हटले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गाेखले यांनी दिली. ५३ वर्षीय नाईकने २०१६ मध्ये भारत साेडून पलायन केले हाेते. त्यानंतर ताे मलेशियात आश्रयाला गेला. तेथे त्यास आश्रय देण्यात आला. भारतात हवा असलेला नाईक सातत्याने विखारी भाषणे देत आला आहे. त्यामुळे मलेशियातदेखील त्याच्यावर बंदी आली. ८ आॅगस्ट राेजी मलेशियातील हिंदूबहुल समुदायाच्या विराेधात नाईकने वक्तव्य दिले हाेते. त्यानंतर नाईकची देशातूल हकालपट्टी करण्याची मागणी मलेशियातील काही लाेकप्रतिनिधींनी केली हाेती. जम्मू-काश्मीरमधील सद्य:स्थितीबद्दल माेदींनी महाथीर माेहंमद यांना माहिती दिली. कलम ३७० हटलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबराेबर पाकिस्तान काश्मीरसारख्या भारताच्या अंतर्गत मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याच्या प्रयत्नात आहे, याबद्दलही महाथीर यांना अवगत करण्यात आले. दहशतवादावर महाथीर यांनी भारतासाेबत असल्याची ग्वाही दिली. दहशतवाद ही जागतिक समस्या असल्याचे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरबद्दल अवगत केले, अॅबेंची घेतली भेट, प्रशांत-हिंद क्षेत्रात सहकार्य

पंतप्रधान नरेंद्र माेदींनी गुरुवारी त्यांचे समकक्ष शिंजो अॅबे यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी आर्थिक, संरक्षणासह विविध क्षेत्रात सविस्तर चर्चा केली. कूटनीतीच्या पातळीवर भारताला यश आले असून प्रशांत-हिंद क्षेत्रात सहकार्य वाढीवर उभय नेत्यांत सहमती झाली आहे. भारत-जपान यांच्यातील सहकार्य वाढीवर भर देण्यात आला आहे. त्यातून द्विपक्षीय संबंध बळकटीचा हाेणार आहेत.दुसरीकडे चीनचा दक्षिण सागरी क्षेत्रातील आक्रमकपणा रोखण्यासाठी भारताला ही भागीदारी महतत्वाची ठरणार आहे. चीनने या भागातील अनेक बेटांवर ताबा सांगितला आहे. त्याला जपानचा विरोध आहे.

X