Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | succes story of farmers from parner

फुलशेतीतून दुष्काळावर मात, हेक्टरी १२ लाखांपर्यंत उत्पन्न

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 11:59 AM IST

दुष्काळी तालुका म्हणून पारनेरची ओळख पुसण्याचा यशस्वी प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला आहे. पारंपरिक पिकांऐवजी फुलांची शेती

 • succes story of farmers from parner

  पारनेर- दुष्काळी तालुका म्हणून पारनेरची ओळख पुसण्याचा यशस्वी प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला आहे. पारंपरिक पिकांऐवजी फुलांची शेती करत समृद्धीचा मळा या शेतकऱ्यांनी फुलवला आहे. कमी पाण्यात होणारी ही फुलशेती तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देणारी ठरत आहे. बहिरोबावाडी येथील बाळू माधव औटी यांना शेवंतीतून हेक्टरी १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.


  तालुक्यातील हंगे, सुपे, चास, कामरगाव या भागात पूर्वीपासूनच फुलशेती होत आहे, पण आता गोरेगाव, किन्ही, बहिरोबावाडी, डिकसळ, हिवरे कोरडा या गावांमधील शेतकरीही मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे वळले आहेत. त्यांनी गावरान राजा शेवंतीसह पेपर सफेद, पूर्वा सफेद , पौर्णिमा सफेद , बेबी डॉल यलो, मेरी गोल्ड, सान्वी यलो या नव्याने विकसित झालेल्या शेवंतीच्या वाणांबरोबरच डाखळ, झेंडू या फुलपिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.


  या फुलांना श्रावणात, गणेशोत्सवात, तसेच नवरात्रोत्सवात मुंबई, कल्याण, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड, औरंगाबाद या शहरांबरोबरच दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी असते. फुलांचे बाजारभाव कधीच स्थिर नसतात. कधी १०० ते २०० किलो, तर कधी २० रूपये किलोनेसुद्धा या फुलांची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते. फुलांना योग्य दर मिळण्यासाठी लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजे पाणी टंचाईच्या काळात करावी लागते. तीन ते चार महिन्यांत शेवंतीचे प्रत्यक्ष उत्पादन निघण्यास सुरुवात होते. पावसाळा सुरू असतानाच उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने अनेकदा कमी-जास्त पावसाचा फटका फुलशेतीस बसतो. परंतु शेतकरी अस्मानी-सुलतानीचा विचार न करता जोखीम पत्करत फुलशेती करतात.


  बहिरोबावाडी येथील बाळू माधव औटी यांनी खासगी बसवर चालकाची नोकरी करत असताना आपल्या एक हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाद्वारे शेवंतीच्या सात प्रकारच्या जातींची लागवड मार्च महिन्यात केली होती. या फुलांचे उत्पादन जुलैत निघण्यास सुरुवात झाली. त्यांची फुले मुंबई, कल्याणच्या बाजारात जात असून ८० ते १२० रूपये किलोपर्यंत दर मिळत आहे. एक हेक्टर फुलशेतीसाठी त्यांना दीड लाख खर्च आला. एक हेक्टरमधून दहा ते पंधरा टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. सरासरी ८० रूपये किलो दर मिळाला, तर दहा-बारा लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल. या फुलशेतीसाठी पत्नी व मुलाची मदत झाली.


  औटी यांच्याप्रमाणेच गावातील अन्य शेतकऱ्यांनीही पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेवंती व अन्य फुलांची लागवड केली असून या दोन्ही गावात निव्वळ फुलशेतीची लागवड तब्बल दहा ते पंधरा हेक्टरवर झाली असून यातून या वर्षी कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ही गावे आता फुलांचे आगार म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत.


  सुप्याला फुलांचे मार्केट हवे
  राज्य शासनाने शेततळ्यांना अनुदान दिले. परंतु कागदाचा खर्च खूप येतो. त्यामुळे ८० टक्के अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. फुलांच्या विक्रीसाठी मोठे मार्केट नगर जिल्ह्यात व जवळ कुठेच नसल्याने शेतकऱ्यांना मुंबई, कल्याण व अन्य मोठ्या शहरांमध्ये फुले पाठवावी लागतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खर्च येतो. कृषी व पणन विभागाने सुप्याला फुलांचे मार्केट सुरू केले, तर शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याबरोबरच विक्रीसाठीचा खर्च कमी येईल व फुलशेतीला चालना मिळेल.

  - अनिल देठे, शेतकरी नेते.


  नियोजन केल्यास चांगले उत्पन्न
  पारंपरिक पध्दतीची शेती परवडत नाही, म्हणून खासगी कंपनीत वाहनचालकाची नोकरी केली. पण तुटपुंज्या पगारामुळे पुन्हा शेतीकडे वळलो. अनियमित पावसामुळे शेततळे केले. फक्त ३ एकर जमीन असल्याने कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळावे व सर्व क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून ठिंबक सिंचन केले. फुलशेतीला प्राधान्य देऊन शेवंतीची लागवड केली. सध्या भाव चांगला मिळत आहे. आधुनिक पध्दतीने नियोजनबद्ध शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.

  - बाळू माधव औटी, फुल उत्पादक शेतकरी.

Trending