आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासोडी, आढा अन् खासगावात विहिरींना ६ फुटांपर्यंत पाणी, उन्हाळी पिके बहरली ; श्रमदानातून झालेल्या कामांमुळे शिवार पाणीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जाफराबाद तालुक्यात मागील वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी ३५ गावांमध्ये तुफान आल्यागत जलसंधारणाची कामे झाली. यात अग्रस्थानी राहिलेल्या पासोडी गावाला दहा लाखांचे बक्षीस मिळाले, तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या पासोडी, आढा व खासगावाला अनुक्रमे पाच, पाच व तीन लाखांची पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून नुकतीच मिळाली आहे. दरम्यान, श्रमदानातून झालेल्या कामांमुळे शिवार पाणीदार झाले असून खरीप, रब्बीसह उन्हाळी पिकेही शेतकरी घेत आहेत. पाणी फाउंडेशन व मुख्यमंत्र्यांकडून गौरव झाल्यामुळे ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढला असून पाणी व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. पाणी उपलब्धतेमुळे मागील वर्षी रब्बीत १५० हेक्टरची वाढ झाली, प्रत्यक्ष ५०० हेक्टरवर होते, तर उन्हाळी पिकांमध्ये शेतकरी चारा पिके घेत आहेत. याठिकाणी २ हजार पशुधन असून आज रोजी २ हजार लिटर दूध संकलन होते. ज्याठिकाणी पाणी फाउंडेशनचे काम झाले तेथील विहिरींना ६ फुटांपर्यंत पाणी आहे.


पाणी फाउंडेशनकडून लोकसहभागातून कामे करण्यात येत आहेत. मागील वर्षी जाफराबाद तालुक्यातील पासोडी गावाने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता. या गावात बांधबंदिस्ती, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, इनलेट-आऊटलेट शेततळे, आनगड दगडी बांध, जलशोषक चर, नाला खोलीकरण आदी पाणलोटाचे कामे झाली, तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या आढा गावातही एकजुटीने श्रमदान केल्याने जलसंधारणाची कामे झाली. मागील वर्षी पाऊस कमी पडला. मात्र पावसाचा प्रत्येक थेंब मुरला. यामुळे पाणी पातळीतही वाढ झाली. आज मे महिन्याच्या मध्यातही विहिरींना  मुबलक पाणी आहे. चालू वर्षातही हे गाव स्पर्धेत आहे. आढा गावात जास्तीत-जास्त ५० फूट खोल विहिरी असून यात सध्या २० फुटांपर्यंत पाणी आहे. दरम्यान, २८७ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. 


खासगाव झाले आदर्शगाव : खासगाव हे तिसरे आलेले खासगाव आदर्श गाव म्हणून वाटचाल करीत आहे. सकारात्मक व सामूहिक निर्णयामुळे लोकसंख्येने मोठे असलेले गावसुध्दा एकत्र येऊन उत्कृष्ट काम करू शकते, हे गावाने दाखवून दिले आहे. या गाव शिवारात आता फळबागांची लागवड केली असून नावीन्यपूर्ण फळपिकेही शेतकरी घेत आहेत.

 

६१ गावांना दिले प्रशिक्षण
यावर्षीही ६१ गावांना प्रशिक्षण दिले असून सुरुवातीला ५० गावांनी कामे सुरू केली. सद्य:स्थितीत ११ गावांमध्ये झपाट्याने कामे सुरू आहेत.
- बी. एस. सय्यद, तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन

 

गावाचा राज्यात गौरव
शिवारात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे गाव पाणीदार झाले आहे.  डोक्यावरचा हंडा उतरला, याचेही समाधान आहे. गावाचे नाव राज्यपातळीवर पोहोचले. - नंदा ताटू, सरपंच, पासोडी

 

पाणी मिळाले हेच बक्षीस
स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला असला तरी पाणी हेच आमच्यासाठी खरे बक्षीस आहे. पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र गावात सुरू करता आले, ही अभिमानाची गोष्ट आहे. - लिंबाजी कन्नर, उपसरपंच,आढा 

 

जलयुक्त शिवारच्या खात्यातून पुरस्कार निधी
जलयुक्त शिवार अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशावरून पासोडी, आढा व खासगावला पुरस्काराची अनुक्रमे पाच, पाच व तीन लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी

 

पावसाचा प्रत्येक थेंब मातीत जिरला
पाण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली ही महत्त्वाची बाब आहे. लहान-थोर, युवक, महिला, पुरुष सर्वांनीच सहभागी होऊन कामे केली. मागील वर्षात कमी पाऊस झाला, परंतु पडलेला प्रत्येक थेंब मातीत जिरला याचा आनंद आहे. 
 - संतोष लोखंडे, सरपंच, खासगाव