आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमनुरीत मियावाकी पद्धतीने दहा गुंठ्यात १४०० झाडांचा प्रयोग यशस्वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात मियावाकी पद्धतीने  उभारलेली वनराई. - Divya Marathi
कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात मियावाकी पद्धतीने उभारलेली वनराई.
  • उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात घनदाट वननिर्मितीमुळे तापमानातही जाणवते घट

हिंगोली - कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी तालुकास्तरीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांची मोट बांधत मियावाकी पद्धतीने घनदाट वनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. केवळ १० गुंठे जमिनीमध्ये उंच वाढणारी १४०० झाडे लावली असून या झाडांची उंची सहा फुटांपेक्षा अधिक झाली आहे. 



हिंगोली जिल्ह्यात वृक्षलागवड योजना यशस्वीपणे राबवण्यात आली. या योजनेमध्ये सर्व विभागांनी सहभाग घेत त्यांना देण्यात आलेले २८ लाख वृक्षलागवडीचे उदिष्टपूर्ण केले आहे. विशेष म्हणजे केवळ उद्दिष्टपूर्ती न करता त्याचे संगोपनही सुरु झाले आहे. दरम्यान, शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांच्या घराच्या परिसरामध्ये घनदाट वन तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालये व इतर शासकीय यंत्रणांना पत्र पाठवून झाडे लावण्याबाबत कळवले होते. त्यानुसार कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात घनदाट वन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 



जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी तालुकास्तरीय कार्यालयांची मोट बांधली. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घनदाट वनासाठी जागा तयार केली. त्यानंतर या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी टाक, सामाजिक वनीकरण विभागाचे देशमुख यांनी १० गुंठ्यांत १४०० झाडे उपलब्ध करून दिली. या झाडांसाठी तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी ठिबक करून दिले तर पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोटीकर यांनी झाडांसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. तलाठी संघटना व तहसील कर्मचाऱ्यांनी झाडाला पाणी देण्याची जबाबदारी घेतली आहे. 



यंत्रणांच्या सहभागामुळे अवघ्या काही दिवसांतच दहा गुंठ्यामध्ये हिरवळ फुलली आहे. तर आता ही झाडे सहा फुटांपेक्षा  उंच वाढली आहेत. या प्रयोगातून झालेल्या घनदाट वनाच्या परिसरातील वातावरण उल्हाददायक वाटू लागले आहे. तर या परिसरातील तापमानातही घट दिसू लागली आहे. 



काय आहे मियावाकी पद्धत

जपानी वनस्पतीशास्त्र तज्ञ तथा पर्यावरण तज्ञ डी. अकिरा मियावाकी यांनी वृक्षाराेपणाच्या एका अनाेख्या पद्धतीवर संशाेधन केले. या तांत्रिक पद्धतीमध्ये झाडांची राेपे एकमेकांपासून खूप कमी अंतरावर लावली जातात. यामुळे झाडे जवळ-जवळच वाढतात. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पाेहाेचत नाहीत. परिणामी झाडांच्या अाजूबाजूला रानटी गवतही उगवत नाही. शिवाय जमिनीतील अाेल कायम राहते. जवळजवळ राेपे लावल्याने राेपांच्या वरील भागावरच सूर्यकिरणे पडून झाडे इतर दिशांएेवजी वरील दिशेनेच उंच वाढू लागलात. त्यामुळे घनदाट वन निर्मिती हाेते. 



मियावाकी पद्धतीने कमी जागेत वननिर्मिती शक्य

मियावाकी पद्धती मोठ्या शहरांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शहरी भागात जमीन क्षेत्र कमी असल्याने या ठिकाणी घनदाट झाडी निर्माण करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. यामुळे शहरात ऑक्सिजन हब निर्माण होऊन पर्यावरणाचाही समतोल राखला जाऊ शकतो. तापमानातही घट येते. मराठवाड्यात मुळातच जंगल कमी असल्याने किमान शहरात तरी अशा प्रकारच्या प्रयाेगांची गरज अाहे. 
-जे. एम. भडके, माजी पर्यावरण संवर्धन अधिकारी, मनपा, अाैरंगाबाद.





बातम्या आणखी आहेत...