आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोली टिकली, तर टिकेल मराठी...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुचिता  घोरपडे,

भाषा म्हणजे आपली बोली. वेगवेगळ्या परिसरामध्ये, प्रांतामध्ये बोलण्याची एक वेगळी शैली, लहेजा, लकब असते. लोकांच्या रोजच्या जगण्यातूनच ही भाषा, ही बोली तयार होते.
या पृथ्वीतलावर पहिल्यांदा काय निर्माण झालं तर तो निसर्ग. मग मानव, प्राणी. यातील प्रत्येक घटकाने एकमेकांशी संवाद साधला. यांच्यामधील संवाद साधण्याचे माध्यम थोड्याफार प्रमाणात वेगळे असले तरी भाषा हे मानवी जीवनाचे संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरले. ही भाषा म्हणजे आपली बोली. वेगवेगळ्या परिसरामध्ये, प्रांतामध्ये बोलण्याची एक वेगळी शैली, लहेजा, लकब असते. लोकांच्या रोजच्या जगण्यातूनच ही भाषा, ही बोली तयार होते.

जग हे परिवर्तनशील आहे. आणि बदलत्या जगाबरोबर बदलत राहणे हे अनिवार्य असते. मग ते भाषिक बदल असोत वा इतर बदल. जन्माला आल्यापासूनच आपल्या भाषेशी आपली घट्ट नाळ जोडली जाते. पण आपण जेव्हा प्रगतीचा आलेख चढत असतो तेव्हा आपल्याही नकळत आपल्या भाषा बदलत जातात. मग ती शैक्षणिक भाषा असो वा व्यावहारिक. 
  
 
आजच्या पिढीबद्दल बोलायचे झाले तर आज आपल्या बोलींवर परकीय भाषेचा प्रभाव दिसून येतो. वेगवेगळ्या भाषा शिकणे, त्या आत्मसात करणे यात चुकीचे असे काहीच नाही. पण हे करत असताना आपल्याला मातृभाषेचा विसर पडता कामा नये. आपल्या शेकडो पिढ्यांनी आपल्यासाठी भाषिक ज्ञानाचा अमूल्य साठा मागे ठेवला आहे. आणि तो जतन करणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. तरच आपली संस्कृती टिकून राहील. आजमितीला केवळ मराठी ग्रामीण बोलीच नाही तर आपली लोकपरंपरा, लोकसाहित्य, लोकगीते सगळेच लोप पावत चालले आहे. खरं तर हे अगदी स्पष्ट दिसत असूनही केला जाणारा डोळेझाकपणा आपल्यासाठी हितकारक नाही.


भाषा हे व्यक्त होण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. पण सध्या हे व्यक्त होणे कमी होऊन एक भाषिक आंधळेपण आलेले आहे. हे आंधळेपण दूर करून या बोलीला, भाषेला डोळस करण्याची वेळ आलेली आहे. या बोली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बोलीभाषेशी असणारा जिव्हाळा टिकून राहावा, त्यातील अवीट गोडवा सगळ्यांना चाखता यावा म्हणून एक प्रयत्न करत आहे लोपलेली शब्दलेणी शोधण्याचा, त्याची माहिती देण्याचा. भौगोलिक अंतरानुसार, प्रांतागणिक, मैलामैलाला भाषेचा बाज, त्याची शैली, हेल सगळंच बदलत असते. बदलत नाही तो भाषेचा गोडवा. मला माहिती असलेली ही बोली, त्यामधील शब्द, म्हणी हे प्रामुख्याने कोल्हापूर आणि लगतच्या मराठी भाषिक सीमाभागात वापरले जातात. 

या भागामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये एक इरसालपणा, रांगडेपणा दिसून येतो. बऱ्याच वेळेला या बोलींवर भौगोलिक वातावरणाचा म्हणजे लगतच्या सीमाभागातील भाषेचा परिणामही दिसून येतो. 

उदाहरण द्यायचे झाले तर अगदी परवाच बाजारात एका मावशीला चुकून जादा आलेले दहा रुपये परत केले तर ती म्हणाली, “सगळी तुमावानी नसत्यात बघा मॅडम. आताच एक कारडखाऊ बाई आलती, वटवट करून भाजी घेतली अन् पैसं न देताच मट्टमाया झाली. आता माझ्यासोबत असणाऱ्या मैत्रिणीला हे ‘कारडखाऊ’, ‘मट्टमाया’ काहीच समजलं नाही. 

मी समजावलं, “अगं लहान खोडकर, मस्तीखोर मुलांना कारटं-पोरटं म्हणतात. कारण त्याच्या अंगात नाना कळा असतात. कारटं हे एक कडू फळही आहे. या अर्थांनी जी बाई खूप कटकट करते, वाद घालते तिला कारड(ट)खाऊ म्हणतात. आणि मट्टमायातील मट्ट म्हणजे गप्प बसणे, शांत बसणे. आणि माया म्हणजे नाहीसे होणे. ती बाई मट्टमाया झाली म्हणजे न बोलता गायब झाली.”

केवळ शब्दांचेच नाही तर शहरात आल्यानंतर कोणी जर एकमेकांना रांडेच्या, सुक्काळीच्या म्हणून शिव्या दिल्या तर फार मोठा गहजब होतो, पण याच शिव्या इकडे सर्रास एकमेकांचा प्रेमपूर्वक उल्लेख करण्यासाठीला वापरल्या जातात. आणि यात त्यांना अजिबात गैर वाटत नाही. 


या सदरात बोलींमधील वेगवेगळे वैशिष्ट्य त्या त्या शब्दांमधून कसे भावपरिणाम दाखवते, त्या लकबींचे माधुर्य कसे वाढवते याची गंमत आपण पाहणार आहोत.