आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउर्दू कवितेने मानवी जगण्यातील व्यथासुखांचा भव्य पट वाचकांसमोर उभा केलेला आहे. फक्त अाशिकीने व्याकूळ झालेल्या प्रियकरापुरता किंवा मोक्षप्राप्तीसाठी परमेश्वराकडे डोळे लावून बसलेल्या भक्तासारखा किंवा राजा-महाराजांच्या दरबारातील लोकरंजनापुरता हा पट कधीच मर्यादित नव्हता. बऱ्याचदा तो राजसत्तेला आव्हान देणाराच होता. तो विद्रोही होता. मुक्त नि मोकळाढाकळा होता. सत्यासाठी वास्तवाला भिडणारा आणि फैज म्हणतो, तसा ‘लब आजाद' ठेवणारा होता. अगदी याच परंपरेतील उर्दू कादंबरी विश्वातील लक्षवेधी कादंबरीकार म्हणून रहमान अब्बास यांचा विचार करायला हवा...
कवितेसारखीच उर्दू साहित्यामध्ये कथा-कादंबरीलासुद्धा एक भली मोठी विद्रोही परंपरा लाभलेली आहे. प्रेमचंद, मंटो, कृष्ण चंदर किंवा इस्मत चुगताई अशी किती तरी नावे आहेत, ज्यांच्या टोकदार, धारदार लेखनामुळे भारतीय समाजजीवनात अक्षरश: उलथापालथ घडवून आणली आहे. अशाच रूढीवादी आणि अतार्किक गोष्टींना आव्हान देणाऱ्या उर्दूमधील सशक्त लेखन नामावलीत आपणाला रहमान अब्बास यांच्या कादंबऱ्यांचा विचार करावा लागेल. ‘नख्लिस्तान की तलाश' ही त्यांची पहिलीच कादंबरी. आजूबाजूचा धार्मिक कट्टरतावाद आणि मुंबईची दंगल या पार्श्वभूमीवर त्यांनी या कादंबरीची निर्मिती केलेली आहे.
याच परिवेशातून या कादंबरीचा नायक धर्मांधपणे दहशतवादाच्या नादी लागून, त्याचा भयानक शेवट ओढवून घेतो, अशा प्रकारचं कथानक या कादंबरीत आहे. ती वाताहत आणि पराकोटीचा धार्मिक विद्वेष या कादंबरीच्या केंद्र स्थानावर आढळून येतो. पण, दुर्दैवाने याच कादबरीतील काही उतारे उचलून संस्कृती रक्षकांच्या एका गटानं त्यांच्यावर अश्लिलतेचा ठपका ठेवला. त्यांच्यावर भरलेला खटला तब्बल दहा वर्ष चालला. याचदरम्यान त्यांना जोगेश्वरीतील एका कॉलेजमध्ये प्रस्तुत कादंबरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अटकही करण्यात आली. परिणामी, त्यांना ‘अंजुमन-ए-इस्लाम'मधील शिक्षकाची नोकरीही गमावावी लागली. आणि तरीही हा लेखक दोन शतकांपूर्वी वसाहतवादी भूमिकेतून तयार केलेल्या कायद्याशी लढत राहिला. शेवटी, २०१४ च्या दरम्यान अश्लिलतेच्या आरोपातून त्यांची न्यायालयाने सुटका केली. ते सांगतात की, याच दरम्यान मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला. लेखक असल्याचा आणि स्वतंत्र माणूस असल्याचा अर्थ उमगला.
प्रा. कुलबुर्गी यांची हत्या आणि गोमांस खाल्याच्या संशयावरून दादरी हत्याकांड झाल्यावर याच रहमान यांनी अकादमीचा पुरस्कार वापस केला. ठोस भूमिका घ्यावी म्हणून रहमान अब्बास हे हिंदी-उर्दूतील बऱ्याच लेखकांशी बोलते झाले. ते सांगतात, की आपण फक्त लिहीत असतो, पण हे कधी कधी पुरेसे नसते. त्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत आपल्याला थेट हस्तक्षेप करावा लागतो. ते सांगतात की, तुमचा समाज रूढीवादी असेल, तर लेखक म्हणून त्या रूढीवादाला आव्हान देण्याची जबादारी तुमची असते. आणि याच भूमिकेतून ते पुरस्कार वापसीच्या घटनेत सहभागी झाले. आजमितीस त्यांच्या चार कादंबऱ्या उर्दूमधून प्रकाशित झालेल्या आहेत. ‘खुदा के साये मे आंख मिचौली' या कादंबरीसाठी त्यांची संपूर्ण उर्दू साहित्य जगताने दखल घेतली. त्यासोबतच त्यांची अलीकडे प्रकाशित झालेली ‘रोहज़िन' या कादंबरीने त्यांना भारतीय वाचकांसोबतच जगातल्या वाचकांशीही जोडले. या कादंबरीचे इंग्रजीसहीत जर्मन भाषेतही भाषांतर झालेले आहे.
रोहज़िन या कादंबरीचे कथासूत्र हे ईसार आणि हिना या जोडीच्या प्रेमा-सभोवती फिरत राहते. पण ही या विषयापुरतीच मर्यादित राहत नाही. ती प्रेमासारख्या सर्वोच्च मानवी भावनेपासून सुरू होऊन आजूबाजूच्या परिवेशाला गुंडाळत अफाट होऊन जाते. कोकणातील एका गावातून मुंबईला आलेला नायक त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतो. धार्मिक आणि सामाजिक संकेतातून प्रेमी युगलांची होणारी होरपळ लेखक या कादंबरीतून प्रभावीपणे मांडतो. ही कादंबरी वाचकाला कोकणात घेऊन जाते. तिथे जगणाऱ्या श्रमिकांचे जीवन जवळून दाखवते. हाताला काम मिळवण्यासाठी मुंबईकडे नजर लागून राहिलेले असंख्य आशावादी चेहरे दाखवते. मुंबईसारख्या शहरात आल्यावर होणारी परवड दाखवते. ही कादंबरी मुंबईच्या गल्ली-मोहल्यातून, राबराब राबणाऱ्या आणि दोन घासाच्या तुकड्यांसाठीही मोताद असलेल्या बहुसंख्य श्रमजिवींची कुतरओढ दाखवते. इथे हजारो गोष्टी एकाच वेळी पोटात दडवून जगणाऱ्या मुंबईची गोष्ट लेखक सांगतो आहे. आठ प्रकरणांत लिहिलेल्या या कादंबरीच्या सुरुवातीला ‘बाणी' या उर्दूतील प्रसिद्ध कवीच्या कवितेच्या ओळी आढळून येतात. सदाअत हसन मंटोशी नाते सांगणाऱ्या, या कादंबरीने उर्दू साहित्यातील एक नवे पर्व सुरू आहे, अशी भावना फैज अहमद फैज, इब्ने इंशा यासारख्या एकेकाळच्या श्रेष्ठ शायरांसोबत मुशाफिरी केलेले जेष्ठ साहित्यिक गोपीचंद नारंग यांनी व्यक्त केलेली आहे, यातच सारे आले. रहमान अब्बास यांनी मुंबईची दंगल जवळून पाहिलीय.
त्यातून लोकमानसावर झालेला परिणाम त्यांनी अनुभवलाय. ते सांगतात, मी एक मुसलमान आहे. एक महाराष्ट्रीय मुसलमान. तो ही मुंबईत राहणारा. मी मुंबई पाहू शकतो. मला माझा देश, माझा धर्म आणि आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी माझ्या परिप्रेक्ष्यातूनच पाहायच्या आहेत. त्या माझ्या विवेकावर, अनुभवावर अवलंबून असतील. माझ्या साहित्यातील प्रत्येक नायक त्याच्या तुटपुंज्या नजरेतून या अशा बऱ्याच गोष्टीना सामोरा जात राहतो. पण त्याच्या स्वतःच्या भल्याबुऱ्या अनुभवावर तो आपली गोष्ट सांगतोय.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. रहमान अब्बास त्यांना हवं असलेला परिवेश घडवू पाहताहेत. एक जग निर्माण करू पाहताहेत. आणि लेखक म्हणून आपली स्वतःची अशी गोष्ट सांगणे, हे सारे राजकीयच आहे याची त्यांना पुरती जाणीव आहे. बऱ्याचदा उर्दू ही लष्करी भाषा आहे इथपासून ते ती मुसलमानी भाषा आहे, असे कैक आक्षेप तिच्यावर लादले जातात.
पण मुळात भाषेला असे कप्पेबंद करताच येत नाही. तिला जात-धर्म असण्याची तर सुतराम शक्यता नसते. आणि उर्दू तर ‘हिंदूयी' म्हणत अवघ्या हिंदुस्थानशी नातं जोडतेय. आपल्या महाराष्ट्राशी तर तिचे विशेष नाते आहे. या भाषेची महत्त्वाची जडणघडण ‘रिसाले’च्या माध्यमातून करणारा मुहंमद हुसेनी, याच महाराष्ट्राच्या मातीचा एक अविभाज्य भाग होता. म्हणूनच महाराष्ट्राशी या भाषेचं निश्चितच एक आत्मिक आणि भावनिक नातेबंध राहिलेला आहे. शेवटी, रहमान यांच्या साहित्यातील आढळणारी बरीच पात्रे या व्यवस्थेचा भाग म्हणून जगतानाच तिला बिनधास्तपणे भिडू पाहताहेत. तिच्यावर संशय व्यक्त करताहेत नि त्यातूनच पुढे ते त्या व्यवस्थेचा पर्दाफाशही होताना दिसतोय. रहमान हे धार्मिक कट्टरतेपासून ते मुस्लिम समाजात आढळणाऱ्या जातीय व्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींची सर्जनशील चिकित्सा करताहेत. समाजाची चिरफाड करताहेत. तिला अवघड प्रश्न विचारताहेत. नि ती सुधारण्यासाठी आवश्यक असलेलं, स्वप्नील जग उभारण्याचा रोमँटिसिझमही जपताहेत. प्रेमात अखंड बुडालेली माणसं दाखवताहेत. त्यांच्या कादंबरीत जसे जातीय-धार्मिक किंवा वर्गीय ताणतणाव आहेत तसंच गावगाड्यात किंवा गल्ली-मोहल्यात आढळून येणारा भाईचाराही आहे. त्यामुळे रहमान अब्बास समाज म्हणून आपली वीण अधिक घट्ट करून ठेवत आहेत. हा धार्मिक कट्टरता किंवा रूढी-परंपरेसाठी ‘गैरसोयीच्या प्रश्नांचा रचयिता' एक नवंकोरं जग वाचकांना दाखवू पाहतोय. आणि याचसाठी उर्दूतील आजमितीच्या या महत्वपूर्ण कादंबरीकाराला वाचायलाच हवे आहे...
- सुशीलकुमार शिंदे
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.