आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारा आबा, अरुण किवी अन् बरंच काही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशाने जशी किवी वाइन बनवली तसंच काही नागालँडच्या अननसापासून, मेघालयाच्या आल्यापासून, हळदीपासून, मणिपूरच्या काळ्या तांदळापासून, पॅशन फ्रूटपासून, सिक्कीमच्या बडी इलायचीपासून आणि आसामच्या चहा व मुगा सिल्कपासून बनू शकतं आणि पूर्वोत्तर भारताच्या अर्थकारणाला गती देऊ शकतं याची खूणगाठ चीनमधल्या एक्स्पोने बांधून दिली आहे. 

 

पूर्वोत्तर भारताच्या विकासाची खूणगाठ पटवणारी जी अनेकानेक पावलं गेल्या पाच वर्षांत पडत आली त्यातलं सर्वाधिक ताजं पाऊल पडलं ते याच महिन्याच्या प्रारंभी चीनमधल्या शांघाय शहरात भरलेल्या चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोच्या निमित्ताने. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आणि शांघाय प्रशासनाने ५ ते १० नोव्हेंबर २०१८ दरम्यान भरवलेला हा एक्स्पो शांघाय शहरातल्या नॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये भरवण्यात आला होता.

 

भारत त्यात सहभागी झाला होताच, परंतु भारताने तिथे मांडलेल्या विविध उत्पादनांमधून सर्वाधिक लक्ष वेधून घेणारं उत्पादन ठरलं ते अरुणाचल प्रदेश सरकारने मांडलेलं किवी वाइनचं.  
किवी हे तसं देश-विदेशात पिकणारं फळ. अरुणाचल प्रदेशातही ते मोठ्या प्रमाणावर पिकतं. लोअर सुबान्सिरी जिल्हा हा किवीच्या उत्पादनात अग्रभागी असणारा. प्रतिवर्षी अरुणाचल प्रदेशात किवीचं उत्पादन होतं ते ९ हजार ४२८ मेट्रिक टन इतकं. त्यातला एकट्या लोअर सुबान्सिरी जिल्ह्याचा वाटा असतो २ हजार ५०० मेट्रिक टनाचा. आजवर या किवी बाजारात विकल्या जायच्या त्या अन्य फळांसारख्याच एक फळ म्हणून.  


पण सी, बी-१ आणि बी-२ व्हिटॅमिन्स तसंच कॅल्शियम, सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्नने ओतप्रोत भरलेल्या या फळावर प्रक्रिया करून त्यापासून एखादा अधिक उत्पन्न मिळवून देणारा आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ वा पेयपदार्थ बनवण्याचा, तो व्यापारी तत्त्वावर बाजारात आणण्याचा आणि त्यापासून विदेशी चलन प्राप्त करण्याचा विचारच फारसा कुणी केलेला नव्हता. लोअर सुबान्सिरी जिल्ह्यातल्या झीरोजवळच्या होंग गावातल्या लांबू सुबू फूड अँड बिव्हरेजेस कंपनीने तो केला आणि एप्रिल २०१८ मध्ये ही वाइन बाजारात आणली. 


या फळातला वर उल्लेख केलेल्या पोषकांव्यतिरिक्तचा सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा भाग होता तो अल्कोहोलचा. त्यातल्या १३ टक्के अल्कोहोलचं काय करता येईल याचा शोध तसा जगभर घेतला जात होताच. न्यूझीलंडमधल्या एका कंपनीने किवीपासून बनवलेली वाइन बाजारात आणलेली होती. परंतु अरुणाचल प्रदेशाने त्याचं मूल्यवर्धन केलं ते सेंद्रिय पद्धतीने किवी पिकवून आणि त्याच पद्धतीने त्यापासून वाइन बनवून.

 
अरुणाचल प्रदेशाचं हवामान किवीच्या उत्पादनाला पोषक, परंतु त्यादृष्टीने त्याचा विचारच कधी कुणी केला नव्हता. भारतात किवी येत असे ती थेट न्यूझीलंडमधून. तागे रिता ताखे ही अरुणाचल प्रदेशातल्या झीरो व्हॅलीत राहणारी कृषी अभियंता. किवी परदेशातून येते आणि श्रीमंत भारतीय अव्वाच्या सव्वा किंमत देऊन ती विकत घेतात ते ती पाहत होती. भारत प्रतिवर्षी आयात करत असे ती चार ते सहा हजार टन किवींची. अरुणाचल प्रदेशात किवी उत्पादित होत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर किवी आयात का करायची आणि भारतीय विदेशी चलन वाया का घालवायचं हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. तिने तिच्या नवऱ्याच्या मदतीने प्रयोग केला, किवीचं फर्मेटेशन करण्याचा आणि त्यापासून वाइन बनवण्याचा.  


तो प्रयोग यशस्वी झाला आणि अरुणाचल प्रदेशाच्या औद्योगिक क्षेत्राचा भाग्योदय होईल अशीच शक्यता निर्माण झाली. अरुणाचल प्रदेशात तशीही विविध गोष्टींपासून घरोघरी वाइन बनवली जातेच. किवी पिकवणारा शेतकरी छोटा, त्याची पोहोच छोटी, स्थानिक बाजारपेठेत ठरावीक कालमर्यादेत किवी नाही विकलं गेली तर ती वायाच जायची. झीरोमधून किवी उचलून देशभरातल्या बाजारपेठांमध्ये आणायची आणि विकायची हे सामान्य उत्पादकाला शक्य न होणारं. तागे रिता ताखेने वाइन बनवली आणि त्या उत्पादकांना दिलासाच दिला. वाया जाणाऱ्या वा विकल्या न गेलेल्या किवींचं काय करायचं या प्रश्नावरचं ते रामबाण उत्तर ठरलं. सेंद्रिय पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या वाइनला तागे रिता ताखेने तंत्रज्ञानाची जोड दिली आणि झीरोमधल्याच फळ-बागायतदार तागे तातुंगबरोबर व्यावसायिक स्तरावर वीस एकरात सेंद्रिय पद्धतीने किवीची लागवड सुरू केली.  


२०१४-१५ मध्ये मी काही मित्रांबरोबर मणिपूरमध्ये गेलो होतो. पर्यटनापेक्षाही काही वेगळं पाहायचा विचार असल्याने तिथल्या एका सनदी अधिकाऱ्याशी आधीपासून संपर्क केला होता. आम्ही ज्या सरकारी पर्यटक निवासात राहिलो होतो त्या पर्यटक निवासाचा, किंबहुना मणिपूर सरकारच्या पर्यटन विभागाचा प्रमुख म्हणून त्याने काही काळ काम केलं असल्याने तो आम्हाला भेटायलाच निवासात आला होता. येताना त्याने एक मोठा खोका भरून किवी आणल्या होत्या. चिकूएवढ्याच आकाराची ती राखाडी रंगाची किवी आम्हाला तरी नवी होती. त्याने किवीची माहिती तर दिलीच होती, परंतु बाजारात रुपयाला एक या भावाने विकलं जाणारं हे फळ परदेशात डॉलरला एक या भावाने विकलं जातं आणि आपण गिऱ्हाईक नसल्याने ही किवी फेकून देतो हे सांगून त्याने आम्हाला किवीची चव दाखवत त्या फळाची होणारी उपेक्षा सांगितली होती.  
नारा आबा हे तागे रिता ताखेचे सासरे.

 

घरगुती पद्धतीने वाइन बनवण्यातला त्यांचा हातखंडा मोठा. न खाल्ल्याने वाया जाणाऱ्या किवींची वाइन तेही घरी बनवत असत, पण या वाइनची चव चाखली असल्याने तिचं व्यावसायिक उत्पादन कुणी केलं तर ते चढत्या भावाने बाजारात खपू शकतं आणि चार पैसे मिळवूनही देऊ शकतं हे तागे रिता ताखेच्या ध्यानात आलं आणि तिनंच ते धाडसी पाऊल टाकलं. पारंपरिक पद्धतीने वाइन बनवणाऱ्या आपल्या सासऱ्यांचच नाव तिने त्या वाइनला दिलं. तागे रिता ताखेने अधिक काळ टिकणाऱ्या वाइनचा पर्याय खुला केला आणि किवीचा भाग्योदयच झाला.

 
लांबू सुंबू फूड अँड बिव्हरेजेस कंपनी ही तिचीच कंपनी. तीच त्या कंपनीची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. शांघायमधील एक्स्पोत तिची वाइन वाखाणली गेली.  
किवीवरील प्रक्रियायुक्त उत्पादनांचं संशोधन सुरू असेपर्यंत भारत, इटली, न्यूझीलंड आणि चिलीमधून प्रतिवर्षी चार ते सहा हजार टन किवी आयात करत असे. आयात फळ मौल्यवान, स्थानिक फळाला कोण विचारतं ही आपली मानसिकता असल्याने भारतात बनणारी जेमतेम तीस टक्केच किवी बाजारात विकली जात असे आणि बाकीची नासल्याने, सडल्याने फेकून द्यावी लागत असे. २०१६ मध्ये सर्वप्रथम ती अरुणाचलाबाहेर विकली जाऊ लागली.

 
पुण्याच्या हिल क्रेस्ट फूड अँड बिव्हरेजेस कंपनीनेही किवी वाइन उत्पादनात, विक्रीत उत्साह दाखवला आणि अरुणाचल प्रदेशाच्या हॉर्टिकल्चरल मार्केटिंग अँड प्रोसेसिंग बोर्डाशी करार करून अरुण किवी या ब्रँडनेमने ती वाइन बाजारात आणली. नाबाम तुकी हे अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री. फळप्रक्रिया उद्योगाच्या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा घेत त्यांनी किवी वाइनला उत्तेजन दिलं आणि किवीच नव्हे तर संत्री, अननस आणि पॅशन फ्रूटपासूनही वाइन बनवण्यासाठी उत्पादक पुढे आल्यास त्यांना सरकारचं साहाय्य मिळू शकेल असं सांगून वाइन उत्पादकांसाठी नवे दरवाजेच खुले केले.  


यातलं पॅशन फ्रूट तर महाराष्ट्रातही बनतं. घराच्या गच्चीवर ते लागू शकतं, त्याच्या फुलाने घराचं वातावरण शुद्ध राहतं आणि मुख्य म्हणजे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब आणि मूत्राशयाच्या विकारांवर ते गुणकारी ठरू शकतं. या फळापासून बनवलेलं सरबतही पैसा कमावून देतं. अरुणाचल प्रदेशाने जशी किवी वाइन बनवली तसंच काही नागालँडच्या अननसापासून, मेघालयाच्या आल्यापासून, हळदीपासून, मणिपूरच्या काळ्या तांदळापासून, पॅशन फ्रूटपासून, सिक्कीमच्या बडी इलायचीपासून आणि आसामच्या चहा व मुगा सिल्कपासून बनू शकतं आणि पूर्वोत्तर भारताच्या अर्थकारणाला गती देऊ शकतं याची खूणगाठ चीनमधल्या एक्स्पोनं बांधून दिली आहे, गरज आहे ती त्यासाठी पावलं टाकणाऱ्या धाडसी उत्पादकांनी आपला मोर्चा पूर्वोत्तर भारताकडे वळवण्याची.

 

सुधीर जोगळेकर
ज्येष्ठ पत्रकार
sumajo51@gmail.com

बातम्या आणखी आहेत...