आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या बॉक्सिंगपटू मेरी कोमनं ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेत विजय प्राप्त करत
सहावं विश्व अजिंक्यपद पटकावलं आणि एक इतिहास घडवला. तिच्या विजयाचा आनंद अधिक झाला तो मणिपूरच्या बॉक्सिंग खेळाडूंना. याचं मुख्य कारण म्हणजे मेरीसारख्या अनेकांना ज्यानं बॉक्सिंग हा खेळ निवडून करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्या नागोम डिंको सिंगची आठवण यानिमित्ताने मुद्रित माध्यमांमध्ये पुन्हा एकदा निघाली.
नवी दिल्लीत नुकत्याच संपलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेत विजय प्राप्त करत सहावं विश्व अजिंक्यपद पटकावलं आणि एक इतिहास घडवला. तिच्या विजयाचा आनंद साऱ्या देशाला झालाच, पण त्याहीपेक्षा अधिक झाला तो मणिपूरच्या बॉक्सिंग खेळाडूंना. याचं मुख्य कारण म्हणजे मेरीसारख्या अनेकांना ज्यानं बॉक्सिंग हा खेळ निवडून करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्या नागोम डिंको सिंगची आठवण यानिमित्ताने मुद्रित माध्यमांमध्ये पुन्हा एकदा निघाली.
कोण होता हा डिंको सिंग? काय केलं होतं त्यानं बॉक्सिंग क्षेत्राला अभिमान वाटावा असं? डिंको सिंग हा खरं तर भारतीय बॉक्सिंग जगताला मणिपूरनं दिलेला एक अग्रमानांकित खेळाडू. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी या डिंको सिंगनं ५४ किलो वजनी गटाची बॅटमवेट श्रेणीतली आशियाई स्तरावरची स्पर्धा सुवर्णपदक पटकावून जिंकली आणि सोळा वर्षांपासून जागतिक अजिंक्यपद पदकाची प्रतीक्षा करत असलेल्या भारतीय बॉक्सिंग जगताला एक नवा आशेचा किरण दाखवला.
डिंको सिंग हा मणिपूरमधल्या इम्फाळ ईस्ट जिल्ह्यातल्या सेकता या गावातला एक दुर्दैवी तरुण. त्याचा जन्म नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा, एक जानेवारीचा. कमालीचं दारिद्र्य असलेल्या एका कुटुंबात त्याचा जन्म झाला. गरिबी इतकी की त्याचं पालनपोषण करण्याची ऐपतही त्याच्या पालकांना नव्हती. त्यामुळे डिंको वाढला तो एका अनाथालयात. आपण खेळाडू बनावं ही जिद्द त्याच्या मनात निर्माण झाली ती याच अनाथालयात. त्याला जे शारीरिक शिक्षण तिथे मिळालं, त्याच्यात मुष्टियुद्धाची जी आवड निर्माण झाली ती त्या अनाथालयात त्याच्यावर क्रीडासंस्कार केलेल्या क्रीडा शिक्षकांमुळे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियानं स्पेशल एरिया गेम्स स्कीम नावाची एक योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली आणि भारताच्या सुदूर भागात राहणाऱ्या ग्रामीण, आदिवासी, सागरी क्षेत्रातील तरुणांना हेरून त्यांच्या आवडीचा क्रीडाप्रकार जोखून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. स्पोर्ट्स ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना या शोधात हाती गवसलं ते डिंको नावाचं रत्न. मेजर ओ. पी. भाटिया यांच्या कडव्या तालमीत डिंको प्रशिक्षित होत राहिला आणि वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यानं अम्बालात झालेल्या सबज्युनियर नॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये पहिलं अजिंक्यपद पटकावलं.
स्पोर्ट््स ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी मग डिंकोवर जे लक्ष केंद्रित केलं, ते कायमचंच. त्यानं मग थायलंडमध्ये भरलेल्या किंग्ज कप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि थेट विजेतेपदच हिसकावून आणलं. तेव्हा किंग्ज कप या नावानं ओळखली जाणारी ती स्पर्धा आज थायलंड इंटरनॅशनल इन्व्हिटेशनल बॉक्सिंग टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते. ते वर्ष होतं १९९७. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९८ मध्ये बँकॉक या शहरात आशियाई स्पर्धा व्हायच्या होत्या. किंग्ज कपवर नाममुद्रा उमटवणाऱ्या डिंको याची वर्णी त्या स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय चमूत लागणार हे खरं तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होतं, पण झालं भलतंच.
सुवर्णपदकाकडे जाणारा मार्ग नाही तरी इतका साधासरळ नसतोच. बँकॉक आशियाई स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय चमूत डिंकोची वर्णी लागली नाहीच. त्यानं नाराज होणं स्वाभाविक होतं. पण त्याच्या प्रशिक्षकांनी शेवटच्या क्षणी हस्तक्षेप केला आणि डिंकोची बाजू दमदारपणे मांडली. परिणाम झाला आणि डिंको बँकॉकला रवाना झाला. पुढे जे काही घडलं तो इतिहास बनला. तिसऱ्या क्रमांकाचा जागतिक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उझबेकिस्तानच्या तिमूर तुल्याकोव्हला त्यानं पराभूत केलं आणि विश्वचषकावर आपलं नाव नोंदवलं.
बँकॉक आशियाई स्पर्धेनंतर डिंकोला संधी मिळाली ती १९९९ च्या राष्ट्रीय स्पर्धांत खेळून सराव करण्याची. त्या स्पर्धा झाल्यानंतर लगोलग २००० मध्ये सिडनीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा व्हायच्या होत्या. डिंकोचं सारं लक्ष लागलं होतं ते ऑलिम्पिक स्पर्धांकडे. पण नशिबाचा फासा पुन्हा एकदा उलटा पडला आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळता खेळता डिंकोचा चक्क एक हातच फ्रॅक्चर झाला. त्याच्या डॉक्टरांनी जेवढी काळजी घ्यायला हवी होती तेवढी घेतली नाही आणि दुखणं कायमचंच चिकटलं.
ज्या ऑलिम्पिकचं स्वप्न तो पाहत होता त्या ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीतून तो बाहेर फेकला गेला. त्याच्या खेळानं पुन्हा उभारी घेतली नाही ती नाहीच. पण सुदैव इतकंच की बँकॉक आशियाई स्पर्धेनंतर १९९८ मध्ये अर्जुन पुरस्कारानं त्याला गौरवण्यात आलं होतं. भारतीय नौदलात त्याला नोकरी देऊ करण्यात आली होती आणि राहायला घरही मिळालं होतं. २०१३ मध्ये नागोम डिंकोला पद्मश्री किताब देऊ करण्यात आला. या पद्मश्रीनं त्याच्या मनानं पुन्हा एकदा उभारी घेतली आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून तो रुजू झाला.
आपण खेळू शकणार नाही हे त्यानं जाणलं होतं आणि त्यामुळेच भारताला ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देऊ शकणारे किमान दोन तरी बॉक्सिंगपटू २०२० पूर्वी घडवायचेच, असं ठरवून त्यानं कामाला सुरुवातही केली. मेरी कोम, सुरांजय सिंग, सरिता देवी आणि देवेंद्र सिंगसारखे खेळाडू त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले, पण पुन्हा एकदा नशिबानं चकवा दिला. डिंको आजारी पडला आणि त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. त्याची नजर आता लागून राहिली आहे ती २०२४ ला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांकडे.
डिंको पुन्हा नव्यानं चर्चेत आला तो २०१७ मध्ये. या वेळेस चर्चेत येण्यास निमित्त झालं नव्हतं कुठल्याही यशाचं, तर ते झालं होतं त्याच्या नव्या अधिक गंभीर आजाराचं. डिंकोला कर्करोग झाल्याचं निदान झालं, हा कर्करोग होता पित्ताशयाचा. त्याच्यावर उपचार करणाऱ्यांनी पित्ताशयाचा ७० टक्के हिस्साच काढून टाकला. खराब झालेला पित्ताशयाचा हिस्सा काढून टाकला तर त्याची तब्येत सुधारू शकेल, असा दावा डॉक्टर करत होते, पण नशीब वेगळाच फासा टाकत होतं. उपचारांचा खर्च इतका मोठा होता की तो त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना परवडणंच शक्य नव्हतं. पैसे उभे करण्यासाठी त्याला घर विकावं लागलं.
सुदैवानं गौतम गंभीर, सरिता देवी धावून आले, त्यांनी काही रक्कम उभी केली आणि घर वाचवलं. उपचारांचा खर्चही निघाला. डिंकोला जडलेला कर्करोग इतका गंभीर होता की १३ वेळा त्याला केमोथेरपी करून घ्यावी लागली. डिंकोची तब्येत आता सुधारते आहे. तो पुन्हा एकदा स्पोर्ट््स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये रुजू होईल आणि तरुण मुष्टियोद्धे घडवील, अशी शक्यता दिसते आहे. डिंकोची ही संघर्षमय कथा कुणाला प्रेरक वाटली नसती तरच नवल होतं.
तसंच घडलं आणि ‘एअरलिफ्ट’ तसेच ‘शेफ’ या चित्रपटांचा दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यानं डिंकोच्या जीवनावर चरित्रपट काढायचं ठरवलं. शूटिंग सुरूही झालं.
बॉलीवूडमधला ताज्या दमाचा अभिनेता शाहिद कपूर आता डिंकोची भूमिका करतो आहे. येत्या एप्रिल महिन्यात (२०१९) हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी शक्यता दिसते आहे. मेरी कोमप्रमाणेच डिंकोची कथाही प्रेक्षकांना आवडेल आणि गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘साला खडूस’, ‘चक दे’, ‘एम. एस. धोनी’, ‘सचिन, बॉर्न टू रन’ यांसारख्या खेळाडूंवरच्या चरित्रपटांत आणखी एका उत्तम चरित्रपटाची भर पडेल. त्याची वाट पाहिली पाहिजे.
- सुधीर जोगळेकर
ज्येष्ठ पत्रकार
sumajo51@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.