राजकीय / 'महाराष्ट्रात सत्ताच स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही', सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला इशारा

शिवसेना ऐकत नसल्याने भाजपने उपसले अखेरचे अस्त्र

दिव्य मराठी वेब टीम

Nov 01,2019 05:48:43 PM IST

मुंबई- निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत, यामुळे सत्ता स्थापन व्हायला उशीर होत आहे. यातच आता भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे. "पुढील आठवड्याभरात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते," असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे.


महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झाले तर 24 तारखेला निकाल लागला. यात शिवसेना भाजप महायुतीला जनतेने कौल दिला आहे. पण, सत्तेतल्या वाट्यावरून आता दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडलीये. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हवंय पण, त्यासाठी भाजपची तयारी नाहीये. भाजप सेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची खाती देण्याची भाजपची तयारी आहे. यावरुनच आता सुधीर मुनगंटीवर यांनी "सत्ताच स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही", असे विधान केले आहे. पुढे ते म्हणाले की, "भाजप आणि सेनेनं एकत्र येत विधानसभा निवडणूक लढवली. लोकांनी या दोनही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. त्या जनादेशाचा आदर करायला पाहिजे. जनादेशाचा आदर झाला नाही तर ती लोकांशी प्रतारणा ठरेल. शिवसेनेनं लोकांची भावना समजून घेतली पाहिजे," असे मतही त्यांनी व्यक्त केलं.

X
COMMENT