आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलासक्‍त अटलजी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटलबिहारी वाजपेयी हे केवळ समन्वयवादी राजकारणीच नव्हते, तर त्यांच्यात एक कलासक्त माणूसही दडलेला होता. म्हणूनच त्यांना जितके कवितेबद्दल प्रेम होते, तितके चित्रपटादी कलांबाबतही विलक्षण असे कुतूहल होते. यातूनच त्यांचे उदारमतवादी आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तित्व आकारास आले होते.  त्यांच्या आस्वादक वृत्तीच्या आणि स्नेहाळ सहवासाच्या आठवणी जागवणारा हा विशेष लेख...


अटलबिहारी वाजपेयी हे पक्षीय राजकारणाला पुरून उरणारे सालस, सुसंस्कृत नि सभ्य असे व्यक्तिमत्त्व होते. दोन धर्मांत तेढ निर्माण न होता, सलोखा राहावा हा त्यांचा विचार होता. रामजन्मभूमी प्रकरणी विरोधाची भूमिका घेऊन त्यांनी संघाचीही नाराजी ओढवून घेतली होती. केवळ एवढेच नव्हे, तर निवडणुकीच्या काळातही धर्म व जातीवर आधारित निवडणूक लढवण्याच्या ते पूर्णपणे विरोधात होते. याचे त्यांना राजकीय नुकसानही सोसावे लागले. परंतु त्यांनी कधीही मनाविरुद्ध कार्य केले नाही. तत्त्वात तडजोड केली नाही. एक राजकारणी किती कलासक्त असू शकतो याचे तर अटलजी एक आदर्श उदाहरण होते. स्वतः ते कवी होतेच, चित्रपट, साहित्य याच्याशीही त्यांचे लोभस नाते होते. त्यांच्या रसिकतेच्या गोष्टी आठवायला बसलो की अनेक आठवणी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच डोळ्यासमोरून झरझर पुढे सरकतात.
अटलजींना जसा त्यांना साहित्यात रस होता, तशीच चित्रपटांमध्ये प्रचंड रुची होती. मात्र, अन्य नेत्यांप्रमाणे ते आपल्याला या विषयातले किती ज्ञान आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत नसत. एकदा आमच्या प्रभात चित्र मंडळाने ‘बायसिकल थीव्ज’ चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित केला होता. अटलजी या खेळाला आवर्जून उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर ते प्रचंड प्रभावित झाले होते. ही त्यांची आणि माझी चित्रपटांशी जोडलेली पहिली भेट.

 

त्यानंतर ते जेव्हा जेव्हा मुंबईला येत. आम्ही एकत्र चित्रपट पाहत असून. अटलजी विरोधी पक्षनेते होते. तेव्हा काही कामानिमित्त मुंबईला आले होते. श्याम बेनेगल यांचा ‘सूरज का सातवां घोडा’ चित्रपटाची बरीच चर्चा होती. अटलजींनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (एनएसडी)मध्ये धर्मवीर भारती यांचे ‘सूरज का सातवा घोडा’ हे नाटक पाहिले होते. नाटक पाहिलेले असल्याने चित्रपटात आणखी काय असणार, असे प्रश्नार्थक मुद्रेने त्यांनी मला विचारले, तेव्हा नाटक पाहिले आहे, तर चित्रपट पाहा म्हणजे तुम्हालाच त्यातील फरक कळेल, असे सांगितल्यावर त्यांनी चित्रपट पाहण्यास होकार दिला. एनएफडीसीने चित्रपटाची निर्मिती केली असल्याने मी एनएफडीसीच्या संचालकांना अटलजींची इच्छा सांगितली.  एनएफडीसीमध्ये चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. चित्रपट पाहिल्यानंतर अटलजी फक्त एवढेच म्हणाले, खूपच छान सिनेमा!

 

अटलजी साहित्यावर जितकी भरभरून चर्चा करायचे. त्याच उत्साहाने ते चित्रपटांबाबतही बोलायचे. मग कोणता चित्रपट चांगला आहे, तो का आहे आदी बाबींवर आमची चर्चा व्हायची. एकदा ते मुंबईला आले असताना ‘उंबरठा’ चित्रपटाबद्दल त्यांनी ऐकले होते म्हणून तो पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी जब्बार पटेल यांना फोन केला आणि ब्रॉडवेमध्ये ‘उंबरठा’चा विशेष खेळ आयोजित केला. चित्रपट पाहून झाल्यानंतर स्मिता पाटीलच्या अभिनयाने ते खूपच प्रभावित झाले. मला आठवतंय, त्याक्षणी स्मिता पाटीलच्या अभिनयाची प्रशंसा करताना त्यांच्या मुखातून अक्षरश: शब्दफुले अवतरत होती.

 

साधारणतः १९८७-८८ ची गोष्ट असेल. अटलजी वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीहून मुंबईला आले होते. राजधानीने दादरला उतरल्यानंतर ते सायनला वेदप्रकाश गोयल यांच्याकडे जाण्यासाठी टॅक्सीने निघाले. त्याच वेळेस मुंबईत किंग जॉर्ज हायस्कूल येथे मराठी साहित्य संमेलन भरले होते. विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनाचे फलक जागोजागी लागलेले होते. गोयल यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी गोयलजींना कुतूहलाने साहित्य संमेलनाबद्दल विचारले.  तेव्हा गोयल यांनी मला फोन केला आणि अटलजी साहित्य संमेलनाला येऊ इच्छितात, असे सांगितले. एवढा मोठा नेता आमंत्रण नसताना स्वतःहून साहित्य संमेलनाला येत असल्याने त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रमाची माहिती घेऊन अटलजींनी संध्याकाळी ६.३० वाजता किंग जॉर्ज येथे येतो, असे सांगितले. मी आणि संमेलनाचे सचिव भालेराव अटलजींच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहिलो. अटलजी आले. त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आले. अध्यक्ष विश्राम बेडेकर यांचे संपूर्ण म्हणजे सव्वा तासाचे भाषण त्यांनी कसलाही बडेजाव न दाखवता अगदी लक्षपूर्वक ऐकले. कार्यक्रम संपताना आभार प्रदर्शन करताना दाजी भाटवडेकरांनी अटलजींचे आभार मानले तेव्हा त्यांना काहीसे अवघडल्यासारखे वाटले. आमंत्रण नसतानाही  केवळ साहित्याच्या प्रेमापोटी  संमेलनात उपस्थित राहणाऱ्या अटलजींचे हे रीप खूपच भारावून टाकणारे होते.

 

मी जसे अगोदरच म्हटले की, कवी हृदयाचे असल्याने त्यांना तेढ मान्य नव्हती. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, ग्वाल्हेरची निवडणूक. १९८४ मध्ये ते ग्वाल्हेरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले. त्यांच्या विरोधात माधवराव शिंदे उभे होते. माधवराव ग्वाल्हेरचे राजपुत्र, मराठा. तेव्हा मराठा महासंघाचे नेते त्यांच्याकडे गेले. त्यांचा सत्कार करून आम्ही तुम्हालाच मतदान करणार, असे आश्वासन महासंघाच्या नेत्यांनी त्यांना दिले. ही बाब समजताच ब्राह्मण सहायक संघही अटलजींकडे गेला. संघाने अटलजींना सांगितले, आम्हीही तुमचा सत्कार करतो आणि ब्राह्मण म्हणून तुम्हाला मते देण्याचे सहायक संघाला आवाहन करतो. तुम्हाला निवडणूक फंडही देतो. यावर अटलजी म्हणाले, मी स्वयंसेवक आहे, मी जात-पात मानत नाही. मी जातीवर निवडणूकही लढवणार नाही. तुम्ही माझा सत्कार करा, परंतु आवाहन आणि निवडणूक फंड मात्र मला नको! अटलजी निवडणूक हरले, परंतु त्यांनी तत्त्वनिष्ठा सोडली नाही.
अशाच प्रकारे त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणातही सलोख्याची भूमिका घेतली, परंतु ती कोणाला आवडली नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव वाढू नये, अशी त्यांची भूमिका होती. यासाठी ते आग्रहीही होते. राम जन्मभूमीचा वाद वाढत असताना शिवाजी पार्क येथील सभेत त्यांनी एक प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, अयोध्या ही रामाची जन्मभूमी, तर त्या भूमीवर मशीद असल्याने मुस्लिमांना मशीद हवी आहे. त्यामुळे मशिदीचा ढाचा उचलून १० किमीवर नेऊन ठेवावा, म्हणजे मशीदही पडणार नाही आणि राम जन्मभूमीही जागेवर राहील. दोन्ही धर्मांत सलोखाही राहील. परंतु त्यांच्या या प्रस्तावाकडे कोणी लक्ष दिले नाही. उलट संघातील काही धुरीण अटलजींवर नाराज झाले. परंतु अटलजी आपल्या निर्णयावर ठाम होते.

 

राम जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात असताना अटलजींना अयोध्येत रामाचा जन्म झाला ही हिंदूंची श्रद्धा आहे आणि त्यावर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला होता. काही बाबतीत त्यांचे विचार मूलभूत होते, देशाचे नुकसान होऊ नये, सलोखा कायम राहावा ही त्यामागची त्यांची भावना होती.
असा हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा कलासक्त राजकारणी होता. त्यांच्यासोबत जोडलेल्या अनेक आठवणी आहेत. आज अटलजी आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे हे विचार, या आठवणीच मने समृद्ध करत राहणार आहेत.

 

शब्दांकन : चंद्रकांत शिंदे

बातम्या आणखी आहेत...