आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतून कंत्राटदाराने पळवलेल्या ऊसतोड कामगाराचा मृत्यू; आजारी कामगाराला गुलामासारखे कामाला जुंपले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटी रुग्णालयात डायलिसिस विभागात टीबीच्या आजारावर उपचार घेणाऱ्या ऊसतोड कामगाराला कंत्राटदाराने गुंडांमार्फत पळवून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. कोल्हापूरच्या मुरबूड येथील संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यासाठी त्याच्याकडून काम करून घेतल्यानंतर दहा दिवसांत गेल्या १३ डिसेंबरला या कामगाराचा मृत्यू झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून कंत्राटदाराने मृतदेह औरंगाबादला न नेता उसाच्या शेतात पाचट गोळा करून अंत्यविधी उरकायला त्याच्या नातेवाइकांना भाग पाडले. इतक्यावरच या कामगाराची अवहेलना थांबली नाही तर मृतदेहाचे न जळालेले अवशेष दुसऱ्या दिवशी जाळून नष्ट करण्यात आले. 


हृदय पिळवटून टाकणारी ही घटना औरंगाबादमधील मिलिंदनगर भागातील बाळू धुराजी शिरसाट (२१) याच्याबाबतीत घडली. कंत्राटदार किरण धर्मराज गायकवाड (रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड ) याच्याकडे बाळू ऊसतोड कामगार म्हणून काम करत होता. गायकवाड याने बाळूला १ लाख २० हजार रुपये आणि बाळूची बहीण कल्पना व भावजी मनोज सोनवणे यांना ७० हजार रुपये २५ ऑक्टोबर रोजी अनामत दिलेले होते. परंतु या कालावधीत बाळूला टीबीचे निदान झाल्याने त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. असे असतानाही गायकवाड याने गुंडांकरवी बाळू व त्याच्या कुटुंबीयांना बळजबरीने कोल्हापूरला ऊसतोडीच्या कामाला नेले. यानंतर बाळूचा कोल्हापुरात मृत्यू झाला. 

 

अंत्यविधीसाठी जंगलात जाऊन आणली लाकडे 
बाळूच्या मृत्यूनंतर त्याच्यावर औरंगाबादेत अंत्यसंस्कार करावेत, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र, पैसे घेऊन तुम्ही पळून जाल असा दम देत उसाच्या शेतातच अंत्यसंस्कार करावेत, असा दबाव कंत्राटदाराने कुटुंबीयांवर आणला. अंत्यसंस्कारासाठीही त्याने केवळ ५०० रुपये दिल्याने बाळूच्या आई व बहिणीने जंगलात जाऊन लाकडे गोळा करून उसाच्या पाचटावरच बाळूला अग्नी दिला. 

 

बाळूचा भाऊ दीपकला कोंडतात मंदिरात 
बाळूच्या मृत्यूनंतर त्याची आई आजारी पडल्याने त्याची आई व बहीण भावाला कंत्राटदाराकडे सोडून उपचारासाठी औरंगाबादला गेल्या. यादरम्यान कंत्राटदाराने बाळूचा भाऊ दीपक याला ऊसतोडीच्या नावावर डांबून ठेवले असून, रात्री त्याला गावातील महादेव मंदिरात झोपवले जाते. कंत्राटदाराच्या ताब्यातून माझी सुटका करा, अशी विनवणी बाळूने फोनवर त्याच्या आईकडे केली. 

 

रुग्णाला उपचारादरम्यान हलवणे धोक्याचे 
रुग्णांवर जर टीबीचे उपचार सुरू असतील तर त्याला असे मधेच हलवणे धोकादायक आहे. टीबीचा आजार पोटात पसरल्याने बाळूचा मृत्यू झाला असावा. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख औषधीशास्त्र, घाटी. 


कंत्राटदाराला थेट सवाल; गायकवाड म्हणतात, मी योग्यच केले 
- तुम्ही बाळू या आजारी तरुणाला घाटीतून का घेऊन गेलात? - मी नाही, माझ्या माणसांनी नेले. 
- आपणास आजारी व्यक्तीला रुग्णालयातून बळजबरीने पळवून नेण्याचा अधिकार आहे का ? - का नाही? मी त्या आजारी तरुणाच्या नावेदेखील पैसे दिलेले आहेत. 
- औषधोपचार नसल्याने तरुणाचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या आईने केला आहे? - माझ्यावर आरोप करण्यापूर्वी कुठे चुकलो, त्याच्या आईने विचार करावा. 
- या मृत्यूला जबाबदार कोण ? - त्याच्या कुटुंबातील लोक जबाबदार आहेत. मुलगा आजारी होता तर त्याच्या नावाने अॅडव्हान्स का घेतला? 
- ...पण रुग्णाला पळवून नेणे कितपत योग्य आहे? - आमच्याकडून लाखो रुपये घेऊन कामावर न येणे कितपत योग्य आहे ? 
- किरण गायकवाड, कंत्राटदार, संताजी साखर कारखाना, मुरबूड, कोल्हापूर. 

 

आईला घरात घुसून मारहाण 
८ दिवसांपूर्वी कंत्राटदाराचा मेहुणा दादाराव वाघमारे (रा. मिलिंदनगर, औरंगाबाद) याने बाळूच्या आई मंगलाबाई यांना 'कामावर चल नाही तर पैसे परत कर,' अशी धमकी देत मारहाणही केली. यानंतर धास्तावलेल्या मंगलाबाईंनी वाघमारे याच्याविरोधात उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...