विक्री मूल्य वाढल्यामुळे / विक्री मूल्य वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यात 6% वाढ 

Feb 16,2019 09:56:00 AM IST

मुंबई- सरकारच्या वतीने साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यामध्ये सहा टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे. मानांकन संस्था इक्राच्या वतीने एका अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरकारने गुरुवारी साखरेचे किमान विक्री मूल्य २९ हजार रुपये प्रतिटनावरून वाढवून ३१ हजार रुपये प्रतिटन केले होते. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार याचा परिणाम पुढील काळात साखर कंपन्यांच्या शेअरमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

इक्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या निर्णयामुळे साखर कारखान्यांना प्रतिकिलो दोन रुपयांचा फायदा होईल. यामुळे कंपनीच्या नफ्यात सहा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांपासून किमान विक्री मूल्य २९ हजार रुपये प्रतिटनावरच होते. याचा परिणाम झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी जानेवारी २०१९ मध्ये वाढून २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

इक्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष सव्यसाची मजुमदार यांनी सांगितले की, एमएसपी वाढवल्याने साखर कारखान्यांच्या स्थितीत सुधारणा होईलच, पण त्याचबरोबर यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होईल. त्यांची थकबाकी योग्य पद्धतीने देण्यास मदत मिळणार आहे.'

इक्रानुसार २०१८-१९ मध्ये साखरेचे उत्पादन ३.०७ कोटी टन होण्याची अपेक्षा आहे. याआधीच्या अंदाजात ३.१५ कोटी टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात उसाच्या रसाचा वापर इथेनॉल तयार करण्यासाठी होणार आहे. २०१९ मध्ये देशांतर्गत साखरेची विक्री २.५८ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. वास्तविक, तरीदेखील एकूण उत्पादनात देशांतर्गत मागणीपेक्षा ४५ लाख टन जास्त साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

X