आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ, अवकाळी पावसानंतरही साखर शेतकऱ्यांसाठी गोडच; चांगला दर मिळणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप गुरव 

पुणे - राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव वधारले. भुसार मालाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी अवकाळी पावसाच्या तडाख्यातून बचावलेल्या उसाला चांगला बाजारभाव मिळणार आहे. गतवर्षीच्या दुष्काळामध्ये राज्यातील ऊसक्षेत्र पन्नास टक्क्यांहून अधिक कमी झाले. त्यात अवकाळी पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या साखर कारखान्यांना उसाची कमतरता जाणवणार आहे. परिणामी आगामी महिन्यापासून शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ऊस दरावरून स्पर्धा निर्माण होईल. काही साखर कारखाने ऊसदराची रक्कम तत्काळ अदा करत आहेत. 
आंतरराष्ट्रीय व देशातील बाजारपेठेत साखरेच्या वधारणाऱ्या दरामुळेदेखील ऊसदर वाढण्यास चांगली मदत होईल. परिणामी उसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक दर मिळाल्याने अवकाळीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच बाजारात साखरेला मागणी असल्याने कारखान्याकडून साखर लवकर विकली जाऊन शेतकऱ्यांना लवकर रक्कम मिळण्याची शक्यता आहे.  

सध्या देशांतर्गत साखरेच्या दराने उचल खाल्ली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात किमान दर ३ हजार  ५८१.०५ ते  कमाल ४१६३.३३ रुपये प्रतिक्विंटल आहेत. त्यामुळे आणखी वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर देशात ४०.६९ लाख हेक्टर साखर उत्पादित झाली होती. मात्र, चालू ऊस गळीत हंगामात देशात केवळ १८.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखरेचे हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांहून कमी आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात राज्यातील साखर कारखाने अवकाळी पावसामुळे उशिरा सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त एक टक्का साखर उत्पादित झाली आहे.  त्यामुळे बाजारात साखरेची आवक कमी होऊन साखरेला चांगला भाव मिळून आपसूकच उसाला चांगला दर मिळेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्राझीलसारख्या प्रमुख ऊस उत्पादक देशांनी उसापासून साखरेऐवजी इथेनॉल व तत्सम पदार्थ निर्मितीवर भर दिल्याने भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे साखर निर्यातीतून साखरेला चांगला भाव मिळाल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता येईल.

कच्च्या साखरेचा दर १८०० रुपयांवर होता. आता  २१०० रुपये प्रतिक्विंटल दराने वेगवेगळ्या देशी-विदेशी कारखान्यांकडून कच्च्या साखरेची मागणी होत आहे. एकूण साखर उद्योगातील साखरेच्या अर्थकारणात शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक भाव मिळण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. दुष्काळ व त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस हा साखर उद्योगासाठी इष्टापत्ती ठरला आहे. 
३ डिसेंबर रोजी राज्यातील साखर उत्पादनाचे प्रमाण

  • महाराष्ट्र : ६७ हजार टन (२०१९)- १८.८९ लाख टन (२०१८)
  • कर्नाटक : ५.२१ लाख टन (२०१९)- ८.४० लाख टन
  • गुजरात : १.४१ लाख टन (२०१९) - २.२१ लाख टन

देशातील प्रांतवार साखरेचे दर (३ डिसेंबर २०१९ रोजीचे)
 

  • उत्तर विभाग : ३८.६१ रु प्रतिकिलो (किरकोळ)- ३५८१.०५ प्रतिक्विंटल (ठोक)
  • प. विभाग : ३७.८० रुपये प्रतिकिलाे(किरकोळ)- ३४३२.३ रुपये प्रतिक्विंटल (ठोक)
  • उत्तर-पूर्व : ४६.१७ रु. प्रतिकिलो (किरकोळ) - ४१६३.३३ रुपये प्रतिक्विंटल (ठोक)
  • दक्षिण विभाग : ३९.५४ रु. प्रतिकिलो (किरकोळ) - ३६७३.३३ रू. प्रतिक्विंटल (ठोक)
बातम्या आणखी आहेत...