आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखानदार म्हणतात साखर उद्योगाला मदत हवी तर इथेनाॅल बनवा, कारखाने सावरा गडकरींचा सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - साखर उद्योग संकटात असून कारखान्यांना सरकारने मदत द्यावी, ही कारखानदारांची मागणी फेटाळून लावत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना इथेनॉलचे उत्पादन करून कारखाने सावरण्याचा सल्ला दिला आहे. राज्य सहकारी बँकेने शतकमहोत्सवी वर्षानिमित्त “साखर परिषद २०-२०’चे पुण्यात आयोजन केले होते. या परिषदेस मुख्यमंत्री फडणवीस,  नितीन गडकरी, शरद पवार आदी उपस्थित होते. 


गडकरी म्हणाले, कारखान्यांनी पूरक उत्पादनावर अधिक भर द्यावा. देशाला ५-७ वर्षांत २ लाख लिटर इथेनाॅलची गरज भासेल. त्यामुळे कारखान्याचे इथेनाॅल थेट पेट्रोलियम कंपन्या खरेदी करतील. सतत मदतीची अपेक्षा न करता साखरेव्यतिरिक्त उपउत्पादनांवर भर द्यावा.  इथेनाॅलचा वाहनांच्या इंधनासाठी उपयोग करून आपण भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर हे जिल्हे डिझेलमुक्त करणार आहोत, असेही ते म्हणाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, १४ दिवसांत उसाची किंमत अदा करण्यासाठी कारखाने वर्षभर व्याज भरतात. तोडणी मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. त्यातून कारखान्याची फसवणूक होते. त्यासाठी केंद्र सरकारने यांत्रिक तोडणीसाठी मदत करावी. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी आहे.
 

 

उत्पादन-मागणी ताळमेळ न बसल्याने अडचण
अनावश्यक कर्मचारी संख्येवर नियंत्रण ठेवूनही कारखान्याचा खर्च कमी करता येईल. उत्पादन जास्त व मागणी कमीचा ताळमेळ न बसल्याने साखर धंदा अडचणीत आला. युरोपात बिटापासून साखर निर्मिती होते. उसाच्या तुलनेत बिटाला पाणी ५५ टक्के कमी लागते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा  चांगला पर्याय आहे. 
- शरद पवार, माजी कृषिमंत्री 

 

सरकारच्या धोरणाला सहकार्य नाही
जगात साखरेचे भाव पडल्याने समस्या आहेत. त्यासाठी काळाची पावले ओळखून उसापासून इथेनाॅलकडे वळले पाहिजे.  १०० टक्के ठिबकवर ऊसपीक घेण्याच्या सरकारच्या धोरणाला साखर कारखान्यांनी सहकार्य केले नाही. परंतु, आता संपूर्ण ठिबक सिंचन न केल्यास परवाने अडवण्याची भूमिका आम्ही घेऊ शकतो. 
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...