आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागच्या दुष्काळाचा ऊस उत्पादकांना आता ३१६ कोटी रुपयांचा फटका

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आैरंगाबाद जिल्ह्यातील साखर उत्पादन अन् उताराही घटला, पट्टा पडला

करमाड- मागच्या वर्षी पडलेल्या दुष्काळाचा यावर्षीच्या ऊस उत्पादनावर परिणाम झाला असून साखर उत्पादनही अंदाजे सत्तर टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ३१६ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कारण मागच्या वर्षी म्हणजे २०१८-१९ च्या गळीत हंगामात जिल्ह्यात १७ लाख ९९  हजार ५१७ टन उसाचे गाळप करण्यात आले होते. या वर्षीच्या म्हणजे २०१९-२०च्या गाळप हंगामात केवळ ५ लाख ३४ हजार ७२४ टन गाळप झाले आहे, जे की मागच्या वर्षापेक्षा १२ लाख ६४ हजार ७६३ टनांनी कमी आहे.२०१७-१८ यावर्षी राज्यासह जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे २०१८-१९ यावर्षीच्या गाळपासाठी अतिरिक्त ऊस उत्पादन होण्याची भीती साखर कारखानदारांना लागून होती. परंतु, विहामांडवा (पैठण) येथील शरद सहकारी आणि खुलताबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखान्याने ऊस गाळप केले. त्यामुळे २०१८-१९ च्या गाळप हंगामात वरील दोन साखर कारखान्यांसह छत्रपती संभाजी राजे (औरंगाबाद), मुक्तेश्वर शुगर (गंगापूर), बारामती अॅग्रो (कन्नड), संत एकनाथ (पैठण), या सहा कारखान्यांनी १७ लाख ९९ हजार ५१७ टन उसाचे गाळप करून १९ लाख ३४ हजार ३९६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. उताराही सरासरी १०.७५ टक्के मिळाला.

शेतातील ऊस चारा छावण्यात तेव्हा गेला..

२०१७-१८ मध्ये चांगल्या पावसामुळे उसाची लागवड वाढली.   २०१८-१९ मध्ये उसाचे चांगले गाळप झाले. याच वर्षी पावसाने अवकृपा केली.  पाण्याअभावी उसाच्या फडात नांगर घातला. यामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली. २०१९-२० यावर्षीही पावसाने अवकृपाच केली. सप्टेंबर नंतर परतीच्या पावसाने धरणे भरली असली तरी खरीप व रब्बी पिकांना परतीच्या पावसाचा फायदा झाला नाही. त्यामुळे शेतातील ऊस जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यात गेला. उसाअभावी जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप करणार की नाही अशी शंका होती.

पुढच्या वर्षी चांगला उतारा अपेक्षित

यावर्षी साखर कारखान्यांनी उसाला सरासरी २५०० रुपये भाव दिला.  यावर्षी ऊस उत्पादकांना २०१८ - २० च्या दुष्काळामुळे ३१६ कोटी १९ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. मागच्या वर्षी १४२ दिवस  गाळप  होते. यावर्षी एक महिना उशिराने कारखाने चालु होऊनही ते फक्त ८२ - ८३ दिवसच चालले. २२ फेब्रुवारीपूर्वीच  उसाचे गाळप संपून साखर कारखान्याचा पट्टा पडला आहे.  

साखर उताराही मागच्या वर्षीपेक्षा एक टक्क्याने कमी
 
कारखान्याचे नाव          ऊस गळीत      साखर उत्पादन

छत्रपती संभाजीराजे          1,26,653    1,25,025

मुक्तेश्वर शुगर                1,28,848    1,27,325

बारामती अॅग्रो                2,52,342    2,54,870

संत एकनाथ                       26,881    20,100

एकूण                             5,34,724    5,27,320

वर्ष २०१८-१९                  17,99,517    19,34,396

घृष्णेश्वर व शरद सहकारी यांनी गाळप सुरू केले खरे परंतु त्यांना प्रत्येक दिवशी गाळप करण्याएवढाही ऊस मिळाला नाही. तर, छत्रपती संभाजीराजे, मुक्तेश्वर शुगर बारामती अॅग्रो आणि संत एकनाथ या चार कारखान्यांनी अंदाजे ८२ दिवसांत ५ लाख ३४ हजार ७२४ टन उसाचे गाळप करून ५ लाख २७ हजार ३२० क्विंटल साखर पाेत्याचे उत्पादन केले.  उताराही मागच्या वर्षीपेक्षा एक टक्क्याने कमी  सरासरी ९.८८ टक्के मिळाला. जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ३४ हजार ७२४ टन उसाचे उत्पादन झाले आहे. मागच्या वर्षी १७ लाख ९९ हजार ५१७ टन उसाचे उत्पादन झाले होते. म्हणजेच दोन्ही वर्षातील तफावत पाहता यावर्षी जिल्ह्यात  १२ लाख ६४ हजार ७९३ टन उसाचे उत्पादन कमी झालेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...