आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरनिश्चितीपर्यंत उसाचे कांडेही कारखान्याला जाऊ देणार नाही; खासदार राजू शेट्टी यांची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- जयसिंगपूर येथे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या शेतकरी परिषदेत गळिताला येणाऱ्या उसाचा भाव निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत आम्ही भाव निश्चित करत नाही, तोपर्यंत शेतकरी आपल्या उसाचे एक कांडेही साखर कारखान्याला जाऊ देणार नाहीत, असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ऊस व दूध परिषदेत मांडला. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावत त्याला संमती देत ठरावाची अंमलबजावणी नगर जिल्ह्यातही करण्याचा निर्णय घेतला. साखरसम्राटांना ऊस उत्पादक शेतकरी हादरवून सोडतील, असा इशारा देताना उसाला आशियात नंबर एकचा भाव देणारा नगर जिल्हा हे आम्ही कधी ऐकायचे, असा सवालही शेट्टी यांनी केला. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस व दूध परिषद इंदोरीफाटा येथे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार शेट्टींसह प्रांताध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रांतिक युवाध्यक्ष हंसराज वडघुले, महिला अध्यक्ष रसिका ढगे, प्रकाश बालवडकर, अमरसिंह कदम, संतोष रोहम व्यासपीठावर उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असताना साखरसम्राटांची आर्थिक स्थिती मात्र झपाट्याने बदलत आहे. यामागचे गणित समजून घेण्याची वेळ आली आहे. कारखान्याच्या माध्यमातून हे लोक करोडाे रुपये कसे काढतात हे मला चांगलेच माहीत झाले असून, त्याच्याच आधारे माजलेले हे रेडे कोल्हापूर जिल्ह्यात मी वठणीवर आणले आहेत. नगर जिल्ह्यातही आता साखरसम्राट वठणीवर आणायचे असून उतारा कसा कमी होतो याचा पोलखोल करण्याची आपली तयारी आहे. यासाठी सगळ्या कारखान्यात माझी सात माणसे मी सांगेल त्या ठिकाणी व विभागात नेमण्याची परवानगी द्या. साखर कशी लंपास केली जाते हे मी दाखवून देतो, असे आव्हानच शेट्टी यांनी दिले. 


आम्ही केलेल्या आंदोलनाला यश येऊन सरकारने लिटरमागे दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान अद्याप दूध संस्थांना मिळालेले नसून येत्या एक तारखेपासून दुधाचे दर कमी होण्याची शक्यता दूध संस्था चालकांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास राज्यात एकही मंत्र्याला फिरू देणार नाही, दिसेल त्या ठिकाणी बदडून काढू. त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातून झाली पाहिजे. मंत्र्याला बदडून काढणाऱ्याचा सत्कार करण्यासाठी मी येईन, असे ते म्हणाले. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव व स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी या मागण्या आपण सोडल्या नसून पुढील काळात यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 


सावंत यांनी विखे, थोरात, गडाख, घुले आदींच्या घराणेशाहीवर जोरदार टीकास्र सोडले. निवडणुकीत आघाडी करताना यांच्या घरातील एकालाही उमेदवारी देऊ नये, अशी अट टाका असे ते म्हणाले. हे कारखानदार गरज नसताना नवीन कामे काढतात. तो पैसा निवडणुकीसाठी वापरतात. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना २५० ते ३०० कोटी तोट्यात आहे. इतर कारखान्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. याविरोधात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संघटितपणे लढा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी वडघुले, डॉ. पोकळे, ढगे, कासार यांचीही भाषणे झाली. 


खासदार शेट्टी यांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. परिषदेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत नेहे, सुभाष येवले, प्रकाश मालुंजकर, डॉ. रवींद्र सावंत, आर. डी. नवले, दगडू देशमुख, सतीश नवले, भरत नवले, लक्ष्मण नवले उपस्थित होते. संतोष रोहम यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विनोद हांडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शर्मिला येवले यांनी आभार मानले. 


नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांवर टीकास्त्र 
खासदार शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाबरोबरच नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, साखरसम्राटांनी कारखान्याच्या पैशांतून शिक्षण संस्था उभ्या केल्या. या संस्थांसाठी टनामागे पैशांची कपात केली. सत्तेत असल्याने शासनाच्या जागा मिळवल्या, पण आज काय स्थिती आहे? या शिक्षण संस्थांमधून हे लोक हजारो कोटींचे मालक झाले. मात्र, त्या संस्था सभासदांच्या मालकीच्या न राहता खासगी मालमत्ता झाल्या आहेत. ज्यांच्याकडे भरमसाट पैसा, त्यांनाच नोकऱ्या व प्रवेश दिले जातात. 

 

बातम्या आणखी आहेत...