आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झट मंगनी पट ब्याह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


करिअरच्या मागे लागून लग्न, मुलंबाळं लवकर नको म्हणणारी तरुण पिढी नेहमीच पाहण्यात येते. मात्र, तुलनेने लहान वयात लग्न आणि जोडीदाराच्याच बरोबरीनं करिअरची झेप घेऊ पाहणारे काही तरुणही असतात. या कथेतले नायक-नायिका तुमच्या पाहण्यात आहेत?


‘आज कुठे आहे दौरा?’ अण्णांनी पेपर वाचताना चष्मा वर करून विचारलं.
‘अहो, आज पहिला गुरुवार आहे ना मार्गशीर्षातला, आज देशपांडेंच्या घरी आहे भजन.’
‘मग काय संध्याकाळी सातपर्यंत?’ अण्णांनी मिश्किलपणे विचारलं.
‘येते हो लवकर,’ असं म्हणून माई पिशवी घेऊन निघाल्या. इतक्यात त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली आणि त्यांनी मोबाइल कानाला लावला.
‘हं बोल प्रशांत, काय म्हणतोस? रिझल्ट लागला, अरे वा छान. काय, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पण निवड झाली, वा छान छान हं. बोल आजोबांशी, शाबास बेटा.’
माईंनी अण्णांना फोन दिला.
‘काय म्हणतोय प्रशांत, तुला नोकरी लागली, अरे वा अभिनंदन. अगं ऐकलंस का, किती लहान वयात प्रशांतला नोकरी लागली. अगदी आपल्या आजोबांवर गेलाय तो,’ अण्णांनी फोन बंद केला.
‘हो हो कळलं. येते हो मी,’ असं म्हणत माई भजनाला निघून गेल्या. माईंना परत यायला सात वाजलेच. अवी आणि अंजूही आॅफिसातनं आलेच तोवर. हसतखेळत जेवणं आटोपली. प्रशांतने दिलेल्या बातमीमुळे सगळे खुषीत होते.


दुसऱ्या दिवशी, रात्री अकराच्या ट्रेनने प्रशांत आला आणि रात्री सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.
‘बाबा, सहा लाखाचं पॅकेज मिळालंय मला. पुढच्या एक तारखेपासून जाॅइन व्हायचं आहे. म्हणजे हा महिना जरा निवांतपणा आहे मला.’
‘अरे, सहा लाखाचं पॅकेज म्हणजे महिना पन्नास हजार मिळणार की काय तुला,’ माईंनी विचारलं.
‘येस ग्रँडमा, तू अगदी बरोबर कॅलक्युलेशन केलंस. माई, अण्णा, तुम्हालाच आधी सांगतो. हा महिना मला सुटी आहे तर लगेच मी लग्न करायचं ठरवलंय.’
‘काय?’ सगळ्यांनी आश्चर्याने एकच प्रश्न विचारला. ‘तुझी कोणी मैत्रीण वगैरे आहे का?’
‘छे छे, मैत्रीण वगैरे नाही, अगदी मुलगी बघून रीतसर लग्न करायचंय.’
‘अरे, आता तर तुला चोविसावं वर्ष लागलंय. मग या वयात तू लग्नाची बेडी अडकवून घेणार आहेस का?’ अंजूने विचारलं.
‘हो आई, करिअरच्या मागे धावताना लग्नाची बेडी पायात नको म्हणून तिशी उलटलेले माझे अनेक मित्र आहेत. पण मी मात्र ठरवलंय, करिअर करायचं, गाडीबंगल्याची स्वप्नं पाहायची, हातात नोकरी आहे. महिना पन्नास हजार पगार आहे. भविष्यात तो वाढेल. माझ्यावर बाकी बहीणभाऊ कोणाचीही जबाबदारी नाही. लग्न केलं की करिअरवर परिणाम होईल असा टिपिकल विचारही माझ्या डोक्यात येत नाही. मग कशासाठी थांबायचं? लग्न करूनही मी या काॅर्पोरेट जगतात पाऊल ठेवताना माझं करिअर व्यवस्थित सांभाळू शकेन.’
‘आपला प्रशांत मोठा झालाय ग आता,’ असं म्हणून माईंनी त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले.
‘चला प्रशांत, आता मात्र मी उद्यापासूनच मोहीम सुरू करते बरं का. आमच्या भजनतल्या जोशीकाकू आहेत ना, त्या नेहमी वेगवेगळी स्थळं सांगत असतात.’आणि दुसऱ्या दिवसापासून माई झपाट्याने कामाला लागल्या. दोनचार दिवसांतच त्यांच्याकडे दहाबारा फोटो येऊन पडले. त्यातल्या तीनचार मुली निवडून प्रशांतचे चहापोह्याचे कार्यक्रमही पार पडले. आणि सर्वांना देशपांडेंची शर्वरी आवडली. ती एमएससी बीएड झाली होती आणि तिच्याच काॅलेजमध्ये ती लेक्चरर होती. महिन्याभरातच प्रशांत आणि शर्वरीचं लग्न पार पडलं.


सामानाची बांधाबांध करून शर्वरी आणि प्रशांत, नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले.
‘शरू, तुला एक विचारू का?’ माई म्हणाल्या. ‘केवळ बाविसाव्या वर्षी नुकतीच तुझ्या करिअरला सुरुवात झालेली असताना आणि स्वातंत्र्य उपभोगण्याचा काळ ऐन भरात आलेला असताना एकदम तू बोहल्यावर उभी राहायला कशी तयार झालीस?’
‘अहो माई, माझ्या मैत्रिणीही म्हणतच होत्या, इतक्या लवकर तू लग्न करते आहेस, तुझ्या करिअरचं काय? पण मी एकंदरीत तुमच्या घरातली माणसं पाहिली आणि माझ्या मनाची खात्री पटली की माझ्या करिअरच्या आड तुम्ही कोणीच येणार नाही. मग वेळीच लग्न करून स्थैर्य मिळावलं तर काय वाईट? लग्न झालंय म्हणून माझ्या करिअरच्या संधी हुकतील असं मला तर वाटत नाही, शिवाय प्रशांत मला आवडलाही होता.’
‘असं आहे होय, बरं बरं चला, निघा आता. सांभाळा एकमेकांना.’
गं माई, तू शरूप्रमाणे मला काही प्रश्न विचारला नाहीस पण मीच तुला सांगतो. तू नेहमी सांगायचीस ना मला की, तुझं खूप लवकर लग्न झालं, मुलं झाली, नातवंडं झाली आणि अगदी पन्नाशीतच तू आणि आजोबा या जबाबदारीतून मुक्त झाला. तू तुझं भजनी मंडळ, महिला मंडळ यात गुंग असतेस आणि आजोबाही त्यांच्या ग्रूपमध्ये बिझी असतात. हे माझ्या मनात कुठेतरी खूप दिवसांपासून रुतलेलं होतं आपणही आजीआजोबांच्या वयात असं अॅक्टिव्ह असायला हवं. आणि त्यासाठी हे चाेविसाव्या वर्षी लग्न अगदी योग्य आहे बघ. माझे कितीतरी मित्र चांगली मुलगी मिळत नाही म्हणून अजून हातात माळ घेऊन उभे आहेत. म्हणून मी ठरवलं, आधी लग्न करायचं. मनासारखा जाेडीदार मिळवायचा आणि मग तिच्या साथीने संसार करून पुढे झेप घ्यायची.’ ‘वा वा, मानलं हं तुला,’ माई म्हणाल्या. ‘तुम्ही दाेघेही एकमेकांना अनुरूप आहात, दोघांचे विचारही जुळतायत. तुमची झट मंगनी पट ब्याह मात्र आम्हाला आवडली बरं का. चला निघा आता, पोहोचल्यावर फोन करा म्हणजे झालं.’
 

बातम्या आणखी आहेत...