आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा येथील घटना : गायकवाडांना उमेदवारी डावलल्यानेे शिवसैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न., बैठकीत प्रा. सावंत गटावर सडकून टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा  - शिवसेनेने विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने उमरगा, लोहारा, तुळजापूर, औसा, उस्मानाबाद, बार्शीसह विविध भागांतील शिवसैनिकांनी उमरगा शहरात शनिवारी बैठक घेऊन शिवसेनेच्या प्रा. तानाजी सावंत गटावर सडकून टीका केली. तसेच याचदरम्यान बाबा भोसले नामक शिवसैनिकाने प्रा. गायकवाड यांना उमेदवारी डावलल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, प्रा. गायकवाड यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक सायंकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 

 


शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली असून खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात प्रा. तानाजी सावंत गटाचा वाटा असल्याचा आरोप करून प्रा. गायकवाड यांच्या गटाने शनिवारी उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला विविध भागातून शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध पदाधिकारी, शिवसैनिकांनी आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर काही वेळातच कट्टर शिवसैनिक शहरातील महादेव गल्ली येथील बाबा भोसले यांनी मंचावरच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या चार कार्यकर्त्यांनी हातात पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न सभागृहात केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले.  

 

 

अनेक शिवसैनिक मुंबईकडे रवाना
विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पक्षश्रेष्ठीने उमेदवारी नाकारल्याची तीव्र नाराजी शिवसैनिकांत दिसून आली. प्रा. गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा या मागणीसाठी गायकवाड समर्थक मुंबईत मातोश्री निवासस्थानावर दस्तक देणार असून यासाठी सायंकाळी अनेक गाड्यांमधून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत काय घडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून सेनेतील गटबाजीचा परिणाम मतदारसंघात कोणाची अडचण करणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, १० शिवसैनिकांनी प्रा. गायकवाड यांना उमेदवारी मिळेपर्यंत अंगावर कपडे न घालण्याचा निश्चय केला आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...