आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या पदाधिकाऱ्याने पक्ष कार्यालयासमाेरच घेतले विष; पदावरून हकालपट्टी केल्याच्या रागातून कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपली बाजू ऐकून न घेताच पदावरून काढल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेचे शहर सहसचिव अभय मांजरमकर (३४) यांनी उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयासमोर रविवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. समर्थनगर येथील साई हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी अभय मांजरमकर यांनी हॉटेल व्हिट्स येथे मद्यपान केले. त्याचे ११५५ रुपयांचे बिल झाले. ते न भरता त्यांनी मनसेचे कार्ड दाखवत हाॅटेलमधील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्यात वादही झाला हाेता. याबाबतची तक्रार व्हिट्स हाॅटेल व्यवस्थापनाने मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली हाेती. त्याची गंभीर दखल घेत पक्षाचे नेते राजू पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी मांजरमकर यांची २९ डिसेंबर राेजी पदावरून हकालपट्टी केली. त्याबाबतचे पत्र त्यांना पाठवले हाेते. या कारवाईमुळे मांजरमकर संतप्त झाले. 

 

रविवारी दुपारी चारच्या सुमारास मांजरमकर यांनी उस्मानपुरा येथील मनसेचे कार्यालय गाठत आपल्यावर कारवाई का करण्यात आली, अशी विचारणा करू लागले. काही क्षणातच त्यांनी पक्ष कार्यालयात बाथरूम साफ करण्यासाठी असलेले फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला. गौतम आमराव यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. २४ तास त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, असे डाॅ. आनंद देशमुख यांनी सांगितले. मांजरमकर यांनी पाऊण लिटर फिनेल प्यायले हाेते, ते काढून टाकल्याचे डाॅक्टर म्हणाले. 

 

चिठ्ठीत लिहिली व्यथा, बदनामीच्या कटाचा आराेप 
अभय मांजरमकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहुन ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यात लिहिले आहे, 'माझी बाजू न ऐकता पक्षाने मला पदावरून काढले. मी १२ वर्षांपासून मनसेत आहे, हा मला बदनाम करण्याचा डाव आहे. राज ठाकरे माझे दैवत असून त्यांनी याची नोंद घ्यावी.' याबाबत सुमीत खांबेकर यांना विचारले असता, हा निर्णय सर्वांसमाेरच घेतल्याचे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...