दोन युवकांना टवाळखोर / दोन युवकांना टवाळखोर समजून उठाबशाची शिक्षा, युवकाचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी

Dec 28,2018 07:51:00 AM IST

शिरूर- रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन युवकांना सकाळच्या वेळी टवाळखोर समजून सहायक पोलिस निरीक्षकाने कारमध्ये बसवत थेट पोलिस ठाण्यात नेऊन सुरुवातीला मारहाण व त्यानंतर त्यांना शंभर उठाबशाची शिक्षा दिली. दुपारी दोन वाजता दोन्ही तरुणांना सोडून देण्यात आले. मात्र घरी गेलेला दुसरा तरुण काही वेळातच हातात पेट्रोलचे कॅन घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झाला.मला विनाकारण मारहाण का केली अशी पोलिसांना विचारणा करत त्याने अंगावर पेट्रोल आेतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारानंतर तरुणाचे आई-वडील पोलिस ठाण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षकांनी सारवासारव करून घटनेवर पडदा टाकला.

शिरूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश टाक गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिरूरमध्ये कारने साध्या गणवेशावर पेट्रोलिंग करत असताना शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आनंद सुतार ( वय २० ) व स्वप्निल भंडारे (वय १९ वर्षे ) हे दोन युवक उभे असल्याचे त्यांना दिसले. दोन्ही युवक टवाळखोर असावेत असा अंदाज बांधून टाक हे युवकांजवळ जाऊन कोणतीही विचारपूस न करता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर त्यांना थेट पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मारहाणीनंतर दोन्ही युवकांना शंभर उठाबशा काढण्याची शिक्षाही देऊन दुपारी दोन वाजेपर्यंत या युवकांना ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. दुपारी दोन वाजता पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर दोन्ही युवक आपल्या घरी निघून गेले. काही वेळाने यातील आनंद सुतार हा तरुण हातात पेट्रोलने भरलेला ड्रम घेऊन थेट पोलिस ठाण्यात आला. मला विनाकारण मारहाण का केली अशी विचारणा करत टाक यांना शिवीगाळ करून कॅन मधील पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यास पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या अनपेक्षित प्रकाराने उपस्थित पोलिस भांबावून गेले होते.

या प्रकारानंतर आनंद सुतार या युवकाचे आई-वडील, नातेवाईक ठाण्यात जमा झाले. सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून सारवासारव केली. त्यानंतर आई-वडील आणि नातेवाईक त्या युवकास सोबत घेऊन निघून गेले. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने सपोनि महेश टाक यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. या प्रकरणी शिरूर ठाण्यात मात्र नोंद करण्यात आलेली नाही.

यापूर्वी टाक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार
शिरूरचे सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक हे शिरूरला प्रभारी ठाणे प्रमुख म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी वाळूचा एक टिप्पर पकडला होता. फरार आरोपींची अटक पूर्व जामीन घेऊन आलेल्या युवकास टाक यांनी मारहाण करून त्याच प्रकरणात आरोपी करून शिरूर येथील न्यायालयात हजर केले होते. मात्र, संबंधित युवकाने कोर्टाकडे टाक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार केल्यानंतर तक्रार दाखल करून ती घेऊन जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केली आहे.

पोलिसांवर कारवाई व्हावी
- पोलिसांनी मला विनाकारण मारहाण केली आहे. पोलिसांनी मला ठाण्यात घेऊन जाताना किंवा मारहाण करतानाही मला का मारले जात आहे, हे सांगितले नाही. सोडून देतानाही मला पालकाला माझा गुन्हा सांगण्यात आलेला नाही. पोलिसांवर कारवाई व्हावी, असे मला वाटते पण टाक साहेबांनी माफी मागितल्यामुळे जाऊ दे म्हणत आई–वडिलांनी मला घरी आणले.
- आनंद सुतार तरुण, शिरूर

X
COMMENT