आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मी तुमचा सांभाळ करू शकत नाही, मला माफ करा..' म्हणत मृत्यूला कवटाळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पतीच्या निधनानंतर मुलांचे पालन पोषणाची जबाबदारी पार पाडताना एकाकीपणाचा सामना करावा लागल्याने नैराश्य आलेल्या महिलेने गळफास घेत बुधवारी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून तिने मुलांची माफी मागितली. पप्पांशिवाय मी तुमचा सांभाळ करू शकत नाही, मला माफ करा', असा या चिठ्ठीतील मजकूर आहे. बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. रजनी रमेश बिडवे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

 

रजनी यांचे पती रमेश हे शहरातीलच केएसके महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ३ ऑक्टाेबर २०१७ रोजी रमेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर रजनी मुलांचा सांभाळ करत होत्या. मोठा ओमकार हा सध्या शिवाजी विद्यालयात दहावीला तर छोटा कृष्णा अवघा सहा वर्षांचा आहे. सासू सासऱ्यांसह रजनी बीडमध्येच वास्तव्यास हाेत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांची मिळणारी पेन्शन हाच त्यांच्या जगण्याचा आधार होता. पतीच्या निधनापासूनच त्या नैराश्यात होत्या. त्यातच मुलाचे दहावीचे वर्ष असल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना एकाकीपणाचा सामना करावा लागत होता. 

 

सासू सासरे दोन दिवसांपूर्वी बर्दापूर या मूळ गावी एका लग्नासाठी गेले होते. मोठा मुलगा ओमकार हा शाळेत गेलेला होता तर छोटा कृष्णा घरातच खेळत होता. बुधवारी सकाळी घरी कुणीच नसल्याने त्यांनी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत नोंद करण्यात आली.

 

मुलगा शाळेतून आल्यानंतर प्रकार समोर 
दरम्यान, बुधवारी ओमकार हा लवकरच शाळेतून आला होता. पण घर आतून बंद होते. दार वाजवूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने आपल्या मामांना फोन केला. मामांकडे रजनी यांच्या शेजारील परिचितांचा संपर्क क्रमांक असल्याने त्यांना फोन करून घर का उघडत नाही याची माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी घर उघडल्यावर हा प्रकार समोर आला. 

 

वडिलांनंतर आईचेही छत्र हरपले 
रजनी यांनी मंगळवारी रात्री अकरा वाजता भावाला फोन केला होता. फोनवर त्यांचे बोलणेही झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी हा प्रकार घडल्याने रजनी यांच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला. वडिलांपाठोपाठ आता आईचेही छत्र हरवल्याने कृष्णा आणि आेमकार मात्र पोरके झाले आहेत.