आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने मोबाइल घेण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या; दोन मोबाइल असतानाही तिसऱ्यासाठी हट्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- स्वत:जवळ दोन महागडे मोबाइल असूनदेखील आणखी एक मोबाइल खरेदी करून देण्यासाठी तरुणाने आईसोबत भांडण केले. आईने मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात थेट धावत्या रेल्वेसमोर झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री ११ वाजता जळगावातील शिव कॉलनी पुलाखाली घडली. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ओळख पटल्यानंतर त्याची आई व कुटुंबीयांनी रुग्णालयातच आक्रोश केला. सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर, २३, रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुमेध हा भालेराव दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. 

 

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या सुमेधजवळ दोन मोबाइल होते. तरीदेखील त्याने सोमवारी रात्री आईजवळ आणखी एक मोबाइल घेऊन देण्याचा हट्ट केला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तो रागातच दुचाकीने घराबाहेर पडला. रात्री ११ वाजता दुचाकी शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळांसमोर उभी करून त्याने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने उपस्टेशन प्रबंधक अरुण देशमुख यांना कळवली होती. देशमुख यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी विनोद शिंदे, विनोद जाधव हे दोघे घटनास्थळी गेले. त्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सुमेधची दुचाकी रेल्वे रुळांशेजारी असलेल्या रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आली. या दुचाकीच्या क्रमांकावरून शिंदे यांनी माहिती मिळवली. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमेधचा मित्र रूपेश प्रवीण राणे (रा. नंदनवन कॉलनी) याच्यासह मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली. या वेळी सुमेधच्या अाईने प्रचंड आक्रोश केला. त्याचे वडील मुंबईत राहतात. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी कुटुंबीयांसह नातेवाइकांनी आक्रोश केला. सुमेधच्या मित्रांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत. 

 

सुमेधकडे महागडा मोबाइल होता. या मोबाइलमध्ये अत्याधुनिक प्रकारची लॉक सिस्टिम अाहे. त्यामुळे मध्यरात्री त्याचा मोबाइल हाती लागूनदेखील पोलिसांना काही उपयोग झाला नाही. अखेर त्याच्या दुचाकीच्या क्रमांकावरून नाव निष्पन्न करण्यात आले. पोलिसांनी दुचाकी तपासली असता त्यात दारूच्या दोन बाटल्या आढळल्या. 

 

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 
अभियांत्रिकीचे शिक्षण अपूर्ण सोडून सुमेध हा मुंबईत व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात होता. लग्न करण्याच्या उद्देशाने गेल्या महिन्यात दोन स्थळे आली होती. यंदा त्याचे लग्न करण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते, असे नातेवाईकांनी सांगितले. 


एका मोबाइलला इअरफोन लावलेला 

आत्महत्येच्या वेळी सुमेधच्या एका मोबाइलला इअरफोन लावलेला होता. त्याचा मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला होता. अंगात कपडेदेखील नव्हते, तर मृतदेहापासून सुमारे ३० फूट अंतरावर मोबाइल आढळून आला. या मोबाइलला इअरफोन लावलेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...