आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जामुळे वैतागून तावरजखेडात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; मनसेकडून मृत शेतकऱ्यांच्या अस्थी जिल्हा प्रशासनाला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेर- दुष्काळी परिस्थिती, नापिकीला वैतागून व कर्जबाजारीपणामुळे उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी व गुरुवारी घडला असून मृत शेतकऱ्यांच्या अस्थी जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन मनसेच्या वतीने शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. 

 

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील शिवाजी जर्नाधन सगर (५५) यांनी बुधवारी (दि. २) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बोरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर लगेच गुरुवारी चार वाजता श्रीपती गंफू फेरे (४७) यांनी विमलचंद सुरवसे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी श्रीपती फेरे यांनी दुष्काळी परिस्थिती मुळे शेतात एक दाणाही पिकला नसल्यामुळे व पाच मुली असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख केला आहे. शिवाजी सगर यांनी चक्क पँन्टीवर आत्महत्येचे कारण लिहिले आहे. 

 

मनसचे जिल्हा सचिव दादा कांबळे, तावरजखेडाचे उपसरपंच मुरली देशमुख, प्रेमचंद सुरवसे, बबन कोळी, सौरभ देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मृत शेतकऱ्यांच्या अस्थी आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात त्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी सरसकट कर्जमाफी, जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्याची मागणी केली.