आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयाचा लिपिक बसमध्ये रोज काढायचा विद्यार्थिनीची छेड, त्रस्त होऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोळेगाव, अजिंठा - महाविद्यालयातील लिपिकाकडून होत असलेल्या सततच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उंडणगाव (ता.सिल्लोड) येथे सोमवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास घडली. प्रणाली कृष्णा जाधव (१६, रा.उंडणगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून ती पालोद (ता.सिल्लोड) येथील यशवंत विद्यालयात १२ वीत शिकत होती. ती दररोज एसटीने ये-जा करीत होती. याच वेळी सिल्लोड येथील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करीत असलेला सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील संजय घुगरे हा जाणूनबुजून त्याच बसमध्ये जात होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तो प्रणालीची छेड काढत होता. तू माझ्यासोबत लग्न कर,नाही तर मी तुझी महाविद्यालयात गावात बदनामी करीन, असे धमकावल्याने प्रणालीने सोमवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. 
 
निरोप समारंभात धमकी 
सोमवारी मुलीच्या पालोद येथील शाळेत निरोप समारंभ होता. तेथे लिपिक संजय घुगरे आला होता. त्याने कार्यक्रमात तिला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली अन् बदनामी व दररोज होणाऱ्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. 


तणाव...

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा नातेवाईक व मित्रमंडळींनी घेतला होता. अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनि किरण आहेर, पो.ना. अनंत जोशी, मनोहर सपकाळ यांनी समजूत घालत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंत्यविधी करण्याची विनंती केली. शेवटी पाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्यानंतरच सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

 

अजिंठ्यात युवा सेनेचे निवेदन.. 
येथील अजिंठा-शिवना मार्गावर असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थिनी ये-जा करताना काही टवाळखोर त्यांची छेड काढत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन युवा सेनेने सपोनि किरण आहेर यांना दिले. यावर कोणत्याही टवाळखोरांना सोडणार नसून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि किरण आहेर यांनी सांगितले.  
 

 

बातम्या आणखी आहेत...