अकोला / माेदींकडून ‘मन की बात’मध्ये काैतुक; त्या हॉटेलमालकावर आत्महत्येची वेळ; नोटबंदीत ग्राहकांना दिले होते उधारीवर जेवण

आता आमची ‘मन की बात’ कोण ऐकणार? : कुटुंबीयांचा सवाल 
 

दिव्य मराठी

Aug 07,2019 09:40:00 AM IST

अकोला - “मोदी सायबांनी रेडूच्या कार्यक्रमातून माह्या लेक अन् त्याच्या हाटेलचं कौतुक केलं. आता सरकारच्या कारभारानं कर्त्या लेकावर आत्महत्या करायची पाळी आली. दोन वर्षं झाले तरी जागेच्या वाढीव मोबदल्याचे पैसे भेटले नाई. हा कोणता न्याय आहे? लेकाच्या जिवाचं बरंवाईट झालं तर काय करावं ?’ हा प्रश्न आहे मधुकर राऊत यांच्या मातोश्री अनसूयाबाई राऊत यांचा. पाणावलेल्या डोळ्यांनी अनसूयाबाई घरची बिकट परिस्थिती मांडत होत्या.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने सोमवारी (दि. ५) अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकीच एक शेळद गावातील मुरलीधर प्रल्हादराव राऊत (४२). मुरलीधर राऊत यांचे पारस फाट्यावर मराठा हॉटेल असलेली सहा गुंठे जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणात गेली. त्यांना ९४ हजार रुपये प्रतिगुंठ्याप्रमाणे मोबदला मिळाला. इतर शेतकऱ्यांना साडेसहा, आठ लाख रुपये प्रतिगुंठा दराने रक्कम मिळाली. वाढीव मोबदल्यासाठी राऊत प्रशासनाचे सतत उंबरठे झिजवत होते.


पंतप्रधान मोदींकडून मराठा हॉटेलचे कौतुक
नोटबंदीच्या काळात महामार्गावर असलेल्या मुरलीधर राऊत यांच्या मराठा हॉटेलने प्रवाशांना उधारीवर जेवण देण्याची सोय केली होती. या उपक्रमाची दखल घेत नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात राऊत यांचे कौतुक करत आभार मानले होते. त्यामुळे गावातच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचे कौतुकही झाले होते.

मूल्यांकन न करता हॉटेल ताेडले
वाढीव मोबदल्यासाठी मी लढत आहे. सहा गुंठे जागेचा कमी मोबदला मिळत असल्याने प्रशासनाला पुनर्मूल्यांकनाची मागणी केली होती. मात्र मूल्यांकन न करता हॉटेल तोडून टाकण्यात आले.
-मुरलीधर राऊत, जमीनमालक

X