आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला देवाघरी जात असल्याचे पित्याने सांगितले, पण तिला ते आत्महत्या करणार हे कळलेच नाही

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कर्जमाफी यादीत नाव न आल्याने वरूड बु. च्या शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

जालना- माझ्यावरील कर्जाचा वाढता डोंगर मला जगण्यास असमर्थ करीत आहे, कर्जबाजारीपणामुळे जगण्याचा कंटाळा आला, तुमच्या गरजा, आईचे स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. यामुळे मी पूर्णपणे खचलो आहे, आता आईला जीव लाव मी देवा घरी चाललो, असे शाळेत जाणाऱ्या लेकीला सांगितले. तर आई, पत्नीला मी नंतर शेतात येतो असे सांगून मुलगी शाळेत गेल्यानंतर घराचा आतून दरवाजा बंद करून कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना  बुधवारी दुपारी १२ वाजता भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येेथे घडली. गजानन पुंजाराम वाघ (३६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

वरूड बु. येथील गजानन पुंजाराम वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. ते पंधरा वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतीतून कुठलेच उत्पन्न हाती लागले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज, परिवाराचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसा करायचे या विंवचनेत ते असायचे.  अडीच एकर शेतात  खरिपात कपाशी, तर रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली होती.  मात्र ते चिंतातुर होते. बुधवारी सकाळी आई व पत्नीला  तुम्ही शेतात जा मी आज उशिरा येईल, असे सांगितले. तर  आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला जवळ घेऊन बाळा मी खचलो, आईला जीव लाव. मी देवा घरी चाललो असे सांगितले. परंतु,  मुलीला याचा जास्त काही भास झाला नाही. ती शाळेत गेली. परंतु,   तीन तासांनंतर गजानन  यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून  गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. दुपारी मुलगी शाळेतून आल्यावर बाहेरून आवाज देत होती. परंतु, घरातून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे तिने बाजूला राहत असलेल्या आजीकडे गेली.  

आवाज देऊनही कोणी दार उघडत नसल्यामुळे आजी व मुलगी घराजवळ आले.  त्यांनी घराचा कडीकोंडा तोडला असता, घरात गजानन यांचा लटकलेला मृतदेह दिसला. मृतदेह पाहताच एकच आरडाओरड सुरू झाली. आजी, नातीचा रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ गोळा झाले. घटनेची ग्रामस्थांनी तत्काळ भोकरदन पोलिसांना माहिती दिली.  पोलिस आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. 

बातम्या आणखी आहेत...