आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांपूर्वी पतीने केली आत्महत्या, \'तेरावं\' नाटकातून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणाऱ्या वैशाली येडे यांना मिळाला उद्‍घाटनाचा मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- नयनतारा सहगल यांना दिलेले उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा देण्यामुळे वादात अडकलेल्या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आता एका शेतकरी विधवेच्या हातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मान यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वैशाली येडे या शेतकरी विधवेला मिळाला आहे. 

 

हेही वाचा... तेरवं..मृत्यूवर मात करणाऱ्या जीवनाच्या सावल्या

 
पतीने आत्महत्या केल्यानंतर आयुष्यात आलेल्या हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत वैशाली सध्या सन्मानाने जगत आहेत. विशेष म्हणजे 'तेरवं' या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्नाला तेवत ठेवले आहे. वैशाली येडे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथे अंगणवाडी मदतनीस आहे. सख्खे, चुलत, मावस, मामे, आत्ये मिळून १३ दीर आणि त्यांचे कुटुंबीय मिळून गावात येडे कुटुंबीयांचा एक मोहल्ला आहे. २००९ मध्ये सुधाकर येडे यांच्याशी वैशाली यांचे लग्न झाले. माेठे दीर, सासू आणि अन्य सदस्य एकत्र राहत होते. ९ एकर शेती होती. त्याचे दीर, सासू व सुधाकर येडे असे तीन हिस्से झाले. पण त्याची कागदोपत्री नोंद नाही. दीर स्वत: शेती कसत नव्हते. त्यांनी कौटुंबिक कलहातून येडे दांपत्याला घराबाहेर काढले. दोघांनी गोठ्यात संसार सुरू केला. दुसऱ्या बाळंतपणासाठी वैशाली माहेरी होत्या. कौटुंबिक कलहामुळे सुधाकर येडे यांचे मनस्वास्थ्य ठीक नव्हते. त्यातूनच २० ऑक्टोबर २०११ ला सुधाकर येडे यांनी विष घेऊन आत्महत्या केली. ९ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी घेऊन वैशाली गावातच वेगळ्या राहतात. 
 
त्रास देणाऱ्या कुटुंबीयांशी लढा, इतरांना देतात प्रेरणा 
दीर व सासूने अजूनही वैशाली यांना जमिनीचा हिस्सा दिला नाही. अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळणाऱ्या ३ हजार रुपये महिन्यावर त्यांचा गुजराण सुरू आहे. एकल महिला संघटनेचे त्या काम करतात. मोठ्या दिराची वैशाली यांच्यावर वाईट नजर होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावातील एकाला कट करून त्यांच्या खोलीत पाठवले आणि क्षणात गाव गोळा केला. वैशाली यांना वाईट ठरवून घराबाहेर काढले. गावात बदनामी झाली. या सर्वांशी लढा देत त्यांचे जगणे सुरू आहे. 
 
प्रथमच प्रभारी अध्यक्षांकडे नेतृत्व 
संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच 'प्रभारी अध्यक्ष' महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. गुरुवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रारंभी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय झाला. ती औचपारिकता पार पडल्यानंतर सर्व सभासदांनी उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे महामंडळाच्या घटनेनुसार प्रभारी अध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे व्यासपीठावर देवधर प्रभारी अध्यक्ष म्हणून महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. 
 
विदर्भाची संधी हुकली 
संमेलनाच्या आदल्या दिवशी होणारी महामंडळाची बैठक महत्त्वपूर्ण असतेे. यंदाच्या संमेलनात आयत्या वेळी जोशींच्या राजीनाम्यामुळे वेगळाच पेच निर्माण झाला.बैठकीत विदर्भ साहित्य संघाने कुठल्याच प्रतिनिधीचे नाव पुढे न केल्याने देवधरांची निवड झाली. महामंडळाचे फिरत कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे असताना, प्रथमच हैदराबादच्या संलग्न संस्थेकडे थेट अध्यक्षपद सोपवण्याचा योगही या निमित्ताने आला. मात्र विदर्भाची संधी हुकल्याची चर्चा रंगली होती.
बातम्या आणखी आहेत...