आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; यंदा आतापर्यंतची जिल्ह्यातील ७२ वी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक तालुक्यातील दुगाव येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगावमधील लोणवाडे येथील एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सोनूदादा साहेबराव वाघ असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी गावाशेजारील पडीक वाड्यात विष प्राशन करून अापले जीवन संपविले. जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंतची ही ७२वी आत्महत्या ठरली आहे. 


पावसाच्या ओढीमुळे दुष्काळी स्थिती, त्यात पिकांना भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषण करून वर्ष उलटले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याने हात उसनवारीचेही कर्ज वाढले आहे. खासगी सावकारांकडून पैशासाठी तगादाही सुरूच असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी १०४ आत्महत्या झाल्यानंतर यंदा ही संख्या वाढत आहे. वाघ यांनी १६ सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल तलाठ्याने दिल्याचे तहसीलदारांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. मौजे लोणवाडे येथील गट क्रमांक १४६ मध्ये मृताच्या नावे सामायिक क्षेत्र आहे. परंतु, त्यावर कुठल्याही कर्जाचा बोजा नसून हात उसनवारीचे कर्ज असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. चौकशी करून अंतिम अहवालानंतरच शासकीय मदतीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...