आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी पक्षबदल ही तर विखे पाटील घराण्याची ‘परंपरा’च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - नगर जिल्ह्यातील बाळासाहेब विखे पाटील हे तसेच जुने काँग्रेसचे निष्ठावंत पाईक. इंदिरा गांधी यांच्या काळापासून त्यांनी काँग्रेसची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली होती. नव्वदच्या दशकामध्ये तर नगर जिल्ह्यातील सर्वात शक्तिमान नेतृत्व म्हणून त्यांची आेळख निर्माण झाली हाेती. इंदिराजींच्या पश्चात राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा काँग्रेसची नौका डळमळीत झाली होती. नेमकं याच काळात बाळासाहेबांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी पक्षांतर्गत ‘कृतिशील विचार मंच’ (ॲक्शन फोरम) स्थापण्याचा प्रयत्नही केला. या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात  आणि त्यांना पक्षश्रेष्ठींनी बळ द्यावं, अशी विखेंची अपेक्षा. परंतु हा मंच म्हणजे पक्षात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयोग आहे, असा मतप्रवाह काही नेत्यांना वाटू लागला. यातूनच राजीव गांधींची नाराजी विखेंना आेढवून घ्यावी लागली. या घडामाेडीत शरद पवार यांची अहम भूमिका होती. परिणामी विखेंना पक्ष साेडावा लागला. त्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यात ‘जिल्हा विकास आघाडी’ नावाने दबाव गट स्थापन केला. सर्व मतदारसंघांमध्ये शाखा उघडल्या. १९९१ मध्ये नगर लाेकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारीही केली. काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना त्यांच्याविराेधात उतरवले. यात विखे पराभूत झाले, मात्र न्यायालयीन लढाई लढत त्यांनी विजय गडाखांची खासदारकी रद्द करायला भाग पाडले.


१९९८ मध्ये बाळासाहेब विखेंनी शिवसेनेत जाऊन त्यांच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. या काळात राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार हाेते. विखेंपूर्वीच त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखेही शिवसेनेत आले हाेते. युती सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रिपदही हाेते. वाजपेयी सरकार आल्यानंतर बाळासाहेब विखेंनाही केंद्रात अर्थ राज्यमंत्रिपद मिळाले. काँग्रेसकडून तब्बल सहा वेळा खासदार झाल्यानंतरही त्यांना जे पद मिळाले नव्हते ते शिवसेनेने दिले. १९९९ मध्ये पुन्हा बाळासाहेब कोपरगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. २००४ मध्ये विखे पिता- पुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये आले. बाळासाहेब लाेकसभेला कोपरगावमधून ‘पंजा’वर खासदार झाले. मात्र, २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि तेव्हापासून त्यांची लोकसभेची नाळ जी तुटली, ती कायमचीच!  राधाकृष्ण विखे मात्र आघाडी सरकारमध्ये मंत्री हाेते, आज त्यांच्याकडे विराेधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे.


आता नातवाकडून पुनरावृत्ती  
२०१९ च्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीकडून पक्षबदलाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. बाळासाहेबांचे नातू व राधाकृष्ण यांचे पुत्र डॉ. सुजय नगरच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कोणता पक्ष सत्तेत येणार आहे आणि कोणत्या पक्षाकडून आपल्याला सत्तास्थानं मिळू शकतात? याचं आकलन विखे पाटलांसारखं दुसऱ्या कोणाचंच नाही, हेही तितकेच खरे.

बातम्या आणखी आहेत...