आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांची मुले धुणीभांडी करण्यास वापरून घेत नाही : उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या ‘बालहट्ट’ वक्तव्यावरून टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या पोरांसह मी इतरांच्या पोरांचाही विचार करतो, दुसऱ्यांची मुले फक्त धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेणे हा माझ्या पक्षाचा विचार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. नुकतेच भाजपत आलेले सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर भेट घेतली. या वेळी उद्धव यांनी  हे भाष्य केले. 

  
सुजय विखे पाटील यांना उद्धव यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता युती झाली असून कोणताही दगाफटका होणार नाही.   निवडणुकीची रणनीती तयार असून आणखीही बरेच पत्ते उघडणे बाकी असल्याचे सूचक विधानही उद्धव यांनी या वेळी केले. विखे पाटील यांच्या मुलाचा हट्ट त्यांच्या वडिलांनी पुरवावा, आपण नव्हे, असे खोचक विधान शरद पवार यांनी केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना, आपण स्वत:च्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो, असे खोचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना ही सर्वसामान्यांची असून इतरांच्या मुलांना आम्ही धुणीभांडी करायला लावत नसल्याचेही ते म्हणाले.  


आशीर्वादासाठी उद्धव ठाकरेंना भेटलो : सुजय  
भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुजय हेच अहमदनगरमधून भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, हे निश्चित असल्यामुळेच आपला विजय सुकर करण्यासाठी त्यांना शिवसेनेची साथ आवश्यक आहे. त्यासाठीच त्यांनी ही भेट घेतली. उद्धव यांनी सुजय यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भेटीबाबत सुजय म्हणाले, भाजपमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्रपक्ष असलेली शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहील हा विश्वास आहेच. तरीही मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी राहील, असे आश्वासन सेना पक्षप्रमुखांकडून मिळाल्याचेही सुजय यांनी सांगितले.


आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाही  
आदित्यने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा तूर्तास तरी कोणताही विचार नाही. मात्र, भविष्यात त्याने निवडणूक लढवावी किंवा नाही, हा निर्णय आदित्यनेच शिवसैनिकांशी चर्चा करून घ्यावा, असा सल्ला उद्धव यांनी दिला. 

बातम्या आणखी आहेत...