आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोल्ड ब्लडेड’ अजित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तरच्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या अजित वाडेकरांची कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची आणि ३७ कसोटी सामन्यांची. तिसऱ्या क्रमांकावर डावखुरी फलंदाजी करणाऱ्या वाडेकरांची सरासरी ३१ ही तशी सामान्यच. पण बहुतेक वेळा आकड्यांमधून खरे मूल्यमापन होत नसते. वाडेकरांच्या धावा कोणत्या परिस्थितीतल्या, संघाचे मनोबल उंचावण्यात, भारताला विजयी करण्यात त्यांचे योगदान काय, हे निर्जीव आकडे सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ १९७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातला पहिलाच कसोटी सामना सबिना पार्कच्या तेजतर्रार खेळपट्टीवर खेळला गेला. आग ओकणाऱ्या वेस्ट इंडीजच्या तोफखान्यापुढे पहिल्या काही षटकातच वाडेकरांचा हात शेकून निघाला. ग्लोव्हजमधल्या त्या रक्ताळलेल्या हाताच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या नाहीत. नेतृत्वाने पळपुटेपणा करायचा नसतो. आघाडीवर राहून सामना करायचा असतो, हाच धडा कर्णधार म्हणून वाडेकरांनी सहकाऱ्यांना दिला होता. परिणाम काय झाला? परदेशातली पहिलीच मालिका खेळणाऱ्या नवख्या सुनील गावसकरने पुढच्या चार सामन्यांत तब्बल ७७४ धावांची रास रचली. पुढे इंग्लंडमध्ये हेच घडले. इंग्लंडच्या बोचऱ्या वाऱ्यात, कुडकुडत्या थंडीत सर्वोत्तम इंग्लिश गोलंदाजांना वाडेकरांनी ठरवून अंगावर घेतले आणि पहिल्याच सामन्यात ८५ धावा फटकावल्या. भारताच्या एकूण धावा त्या वेळी फक्त १२५ होत्या. ‘करिअर अॅव्हरेज’मधून महत्त्व न समजणाऱ्या अनेक मौल्यवान खेळ्या वाडेकरांनी खेळल्या.

 

सन १९३२ मध्ये भारताला कसोटी क्रिकेट संघाचा दर्जा मिळाला. परदेशातल्या पहिल्या मालिका विजयाची चव चाखायला मिळाली ती त्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी. हा क्षण अजित वाडेकरांच्या नेतृत्वाने दाखवला. खरे म्हणजे पहिली काही दशके भारतीय क्रिकेटवर राजा-रजवाड्यांचेच वर्चस्व राहिले. १९७१ च्या ऐतिहासिक वेस्ट इंडीज दौऱ्यातही नवाब मन्सूर अली खान पताैडीच्या नेतृत्वाखाली भारत खेळणार हे जवळपास ठरले. विजय मर्चंट या जाणत्या आणि खडूस मुंबईकराने अचानकपणे अजित वाडेकरांना कर्णधार म्हणून पसंती दिली. एवढेच नव्हे, तर सुनील गावसकर या तरुणावर त्यांनी विश्वास टाकला. उताराला कारकीर्द लागलेल्या दिलीप सरदेसाईंना मर्चंट यांनीच घेतले. मर्चंट यांचे तिन्ही निर्णय ऐतिहासिक ठरले. याच तिघांच्या बहारदार कामगिरीने भारत जिंकला. वेस्ट इंडीजमधला मालिका विजय नशिबाने मिळाला नसल्याचे वाडेकरांनी सिद्ध केले. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने इंग्रजांना इंग्लंडमध्ये जाऊन धूळ चारली. त्यानंतर चवताळलेला इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यात आला. पण भारतातही वाडेकरांच्या संघाने इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. वाडेकरांच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी मालिका विजयाची ‘हॅट््ट्रिक’ नोंदवली. अशा ‘हॅट्ट्रिक’ची पुनरावृत्ती त्यानंतर एकाही भारतीय कर्णधाराला अजून साधता आलेली नाही.


भारतीय क्रिकेटने अनुभवलेल्या पहिल्या सुवर्णकाळाची उभारणी वाडेकरांनी केली. सुनील गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, एस. वेंकटराघवन, बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना यांनी पुढे जाऊन जग गाजवले, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते वाडेकर. दुःख, आनंद, वेदना, निराशा अशा कोणत्याच भावना वाडेकरांच्या चेहऱ्यावर कधी उमटत नसत. जिंकण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या डोळ्यांमधून व्यक्त व्हायची नाही, पण मैदानात उतरल्यावर ते जीवतोड प्रयत्न करायचे. पताैडीला डावलून अजित वाडेकरांना कर्णधार करण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला, असा प्रश्न विजय मर्चंट यांना विचारला गेला तेव्हा मर्चंट म्हणाले होते, “मुंबईच्या संघात असल्यापासून मी अजितला पाहतोय. तो ‘कोल्ड ब्लडेड’ असल्याचे माझ्या लक्षात आले.” कर्णधार म्हणून वाडेकर यशस्वी होतेच. पण व्यवस्थापक म्हणून भारतीय क्रिकेट संघाबरोबरची त्यांची दुसरी ‘इनिंग’सुद्धा तितकीच यशस्वी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा डोंगर उभारणाऱ्या सचिन तेंडुलकरला न्युझीलंड दौऱ्यापासून ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय वाडेकरांचा होता. नव्वदीच्या दशकात अनेक रोमहर्षक विजय मिळवलेला भारतीय संघ वाडेकरांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. मोहंमद अझरुद्दीन, विनोद कांबळी, जवागल श्रीनाथ, अजय जडेजा, अनिल कुंबळे अशा अनेकांना वाडेकरांनी वळण दिले. ‘वर्ल्ड क्लास’ खेळाडू घडतात त्यामागे अनेक पिढ्यांचे कर्तृत्व असते. विराट कोहली एकदम आकाशातून पडत नसतो. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सुनील गावसकर, विजय मर्चंट, सी. के. नायडू अशी दीर्घ परंपरा त्यामागे असते. महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, मोहंमद अझरुद्दीन, कपिल देव या विजयाची नवी शिखरे दाखवलेल्या यशस्वी कर्णधारांच्या मागे अजित वाडेकरांनी रोवलेली दिमाखदार मुहूर्तमेढ आहे; जिचे मोल भारतीय क्रिकेट कधीच विसरू शकणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...