आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 % मतदार निरक्षर असल्याने प्रत्येक उमेदवारास मिळाली एक मतपेटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पहिली निवडणूक केवळ एक निवडणूक नव्हती, तर कठीण परीक्षाच हाेती. त्या वेळी संपूर्ण जग भारताकडे पाहत हाेते. १९५१ हे पहिल्या निवडणुकीचे वर्ष उजाडले. तेव्हा  ८५ % लाेकसंख्येने शाळेचे ताेंडही पाहिलेले नव्हते व महिलांची आेळख त्यांच्या नावाने नव्हे, तर पतीच्या नावाने हाेत असे. अशा देशाला पहिले सरकार निवडायचे हाेते. या कठीण कामाची जबाबदारी सुकुमार सेन यांच्यावर आली. ते देशाचे असे प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त हाेते, ज्यांनी जगातील सर्वात माेठ्या लाेकशाहीचा पाया रचला.


पहिल्या निवडणुकीच्या ७ माेठ्या बाबी 
1. संपूर्ण देशाचा डेटाबेस तयार झाला एकूण मतदार १७.६ काेटी एवढे व ते सर्व २१ वर्षांवरील हाेते.  त्या वेळी प्रथमच वय आणि लिंगाच्या आधारे संपूर्ण देशातील मतदारांचा डेटाबेस तयार केला गेला. त्यासाठी देशभरात सुमारे साडेसोळा हजार कारकुनांना  सहा महिन्यांच्या करारावर या कामास लावले गेले हाेते.


2. मतदान कसे करायचे, हे चित्रपटगृहांत सांगितले
प्राथमिक शिक्षणही न घेतलेल्या लाेकांना मतदान कसे करायचे, हे समजावणे खूप कठीण काम हाेते. त्यासाठी देशातील ३ हजारपेक्षा जास्त चित्रपटगृहांत मध्यंतरात मतदान कसे करायचे, हे समजावणारा लघुपट दाखवला जात असे.


3. प्रत्येक उमेदवारास वेगळी मतपेटी
मतदार त्याच्या आवडीचा उमेदवार कसा निवडेल? हा दुसरा माेठा प्रश्न हाेता. त्यासाठी प्रत्येक उमेदवारास वेगळी मतपेटी देण्याचे ठरवले गेले. मतदार त्यावर पक्षचिन्ह पाहून मतपत्रिका टाकेल अशी ही व्यवस्था हाेती.


4. महिलांची आेळख : रामूची आई...
त्या काळी महिलांसाठी पडदा पद्धत हाेती. तसेच त्यांची स्वत:ची काेणतीही आेळख नव्हती. त्यामुळे मतदार यादीत महिलांच्या नावाचा उल्लेख ‘रामूची आई, इम्रानची पत्नी...’ असा केला जाई. या मतदार याद्या पाहून सुकुमार सेन नाराज झाले व त्यांनी अशा प्रकारची २८ लाख नावे हटवली.


5. यासाठी दिले पक्षांना निवडणूक चिन्ह
आपला उमेदवार काेणता, हे निरक्षर मतदारांना कसे कळेल? याची चिंता  सेन यांना हाेती. त्यामुळे येथूनच पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याची कल्पना समाेर आली. सर्व १४ राष्ट्रीय पक्षांना चिन्हे दिली गेली. पहिल्या निवडणुकीत काॅंग्रेसचे चिन्ह ‘बैलजोडी’, तर फॉरवर्ड ब्लॉकचे चिन्ह ‘हात’ हे हाेते. 


6. गोदरेजने बनवल्या हाेत्या १६ लाख मतपेट्या
पहिली निवडणूक ४,५०० जागांसाठी झाली हाेती. त्यात ४८९ लोकसभेच्या व उर्वरित राज्य सरकारांच्या हाेत्या. पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध गोदरेज कंपनीने विक्रोळी प्लँटमध्ये १६ लाख मतपेट्या तयार केल्या हाेत्या. एकाची किंमत ५ रुपये हाेती. रोज १५ हजार पेट्या तयार हाेत.


7. एकापेक्षा जास्त मत न देण्यासाठी..
एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त मत देऊ नये म्हणून पुसली न जाणारी शाई विकसित केली गेली... शाईचे निशाण बाेटावर आठवडाभर राहावे म्हणून. पहिल्या निवडणुकीत अशा शाईच्या ३ लाख ८९ हजार ८१६ बाटल्या वापरल्या गेल्या.

बातम्या आणखी आहेत...