आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sumatilal Burud Article About Humanity, Divyamarathi

अरबाची बेफिकीर वृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1984 मधील घटना आहे. मी एका रुग्णासोबत ८ महिने टाटा इस्पितळात होतो. सर्व डॉक्टर ओळखीचे झाले होते. ते मला हक्काने काम सांगत. मी पण आनंदाने करत होतो. एकदा तेथील डॉ. गिरी यांनी मला बोलावून घेतले. एक अरबी माणूस तेथे होता. डॉक्टर म्हणाल्या, ‘या माणसाला अरबीशिवाय कोणतीच भाषा येत नाही. या माणसाची बायको सीरियस आहे, तुम्ही याच्यासोबत वरळीला जा; तेथून रक्ताच्या 2 बाटल्या घेऊन या. त्याला मी चल असे खुणावले. तो सोबत चालू लागला. टॅक्सी करून आम्ही वरळीला आलो. टाटा हॉस्पिटलमधून फोन केल्याप्रमाणे रक्ताच्या बाटल्या तयार होत्या. मी बाटल्या हातात घेतल्या. अरबाने नोटा विक्रेत्याकडे दिल्या. तेवढ्यात फोन वाजला, विक्रेता परत आला. त्याने बाटल्या परत घेतल्या. पैसे परत केले आणि पेशंट गेला असे सांगितले. अरबाला वाटले पैसे कमी पडलेत. त्याने आणखी शंभराच्या 50 नोटा दिल्या. त्याला मी व विक्रेत्याने आभाळाकडे बोट दाखवून समजावण्याचा प्रयत्न केला. आमचे बोलणे त्याला कळत नव्हते. तो सारख्या नोटा दाखवत होता. शेवटी टॅक्सीवाल्याने त्याला बळजबरीने गाडीत घातले. टॅक्सी अरबी हॉटेलला नेली. मी आत जाऊन सर्व परिस्थिती मॅनेजरला सांगितली. त्याने बाहेर येऊन अरबाला समजावून सांगितले. अरब गाडीत जाऊन बसला. आम्ही टाटाला आलो. अरबाने टॅक्सीचे भाडे न विचारता 500 रुपये दिले व निघून गेला. ड्राइव्हर खुश झाला. मला वाटले हा अरब कोणाला तरी घ्यायला गेला. मी सरळ डॉ. गिरींकडे जाऊन सर्व सांगितले. त्यांनी डोक्याला हात मारून घेतला. मला काही कळेना, मग त्यांनीच खुलासा केला, ‘आता तो परत येणार नाही.’ आणि तसेच झाले. तो 2 दिवसांत परत आला नाही. शेवटी शव जे. जे. इस्पितळाला बेवारस म्हणून पाठवले. अजूनही प्रसंग आठवला की मलाच वाईट वाटते. त्या अरबाला माणुसकीच नव्हती.