यूएस ओपन / 22 वर्षीय सुमीतने सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकला, सामना गमावला

पराभूत होऊनही सुमीतला मिळणार 42 लाख रुपये 

वृत्तसंस्था

Sep 17,2019 01:59:34 PM IST

न्यूयॉर्क - यूएस ओपनच्या मैदानात उतरलेल्या २२ वर्षीय सुमीत नागलने आपला पहिला सामना खेळला. तोही २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररविरुद्ध. सुमीतने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करत पहिला सेट जिंकला. फेडरर विरुद्ध ग्रँडस्लॅममध्ये पहिला सेट जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. नंतर मात्र फेडरर सरस ठरला आणि २ तास २९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुमीतला हार पत्करावी लागली. सुमीत यूएस ओपन खेळणारा स‌र्वात तरुण भारतीय खेळाडू आहे.


- सुमीतने पहिल्या सेटमध्ये फक्त ९ चुका केल्या, फेडररने १९. शेवटच्या सेटमध्ये सुमीतने १० चुका केल्या.
- सुमीतच्या आई कृष्णा म्हणाल्या - मुलगा आठ वर्षांपासून फेडररचे अनुकरण करत शिकला आहे. आता नदाल त्याचा आदर्श आहे.


या युवा भारतीयाची कारकीर्द खूप चांगली असेल : फेडरर
सुमीतने ज्या पद्धतीने पहिल्या सेटवर नियंत्रण ठेवले, ते सुरेख होते. या भारतीय युवकाची कारकीर्द खूप चांगली राहील. सर्वश्रेष्ठ कामगिरी सोपी नसते. त्याने अत्यंत कमी चुका केल्या. त्याला श्रेय द्यायला हवे.


सैनिक पित्याने मोठे खेळाडू खेळताना पाहत मुलासाठी हे स्वप्न पाहिले होते...
सुमीत हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील जैतपूरचा आहे. कुटुंबात कोणालाही खेळात रस नव्हता. त्याचे वडील सुरेश नागल यांनी काही मोठे खेळाडू पाहून आपल्या मुलाकरता हे स्वप्न पाहिले आणि वयाच्या ८ व्या वर्षी सुमीतचे प्रशिक्षण सुरू केले. कुटुंबाला दिल्लीत आणले. २०१० मध्ये अपोलो टायरच्या टॅलेंट सर्च स्पर्धेत सुमीतची निवड झाली. त्यानंतर महेश भूपतीने त्यांच्या अकादमीत त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मागील ९ वर्षांपासून सुमीतने कॅनडा, स्पेन आणि जर्मनीत प्रशिक्षण घेतले आहे.

X
COMMENT