आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन शिक्षण देणा-या शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकांच्या आयुष्याला ज्ञानासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा, वक्तशीरपणा, जबाबदारी यांसारख्या गुणांची शिकवण देण्याचे कार्य शाळांमधून होते. शाळा ग्रामीण भागातील असो की शहरातील. फरक असतो तो फक्त उपलब्ध साहित्याचा व सोयीसुविधांचा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही वेगवेगळे गुण ठासून भरलेले असतात. गरज असते ती या गुणांना जास्तीत जास्त संधी देण्याची. आजपर्यंत अशा संधी मुलांना उपलब्ध करून देण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. या अडचणींवर मात करत आहे आपल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम गोष्टी प्रदान करण्याचे काम ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज ग्रामीण भागातील शिक्षक वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहेत. वेगवेगळ्या उपक्रमशील शाळांना भेटी देऊन तशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबवत आहेत. अध्यापनात ज्ञानरचनावाद व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आहेत. प्रसारमाध्यमांचा वापर वाढल्यामुळे वेगवेगळ्या शाळांमधून केले जाणारे प्रयोग राज्यभर माहीत होत आहेत. त्याच पद्धतीचे प्रयोग किंवा त्यामध्ये आणखी सुधारणा घडवून ते वेगवेगळ्या शाळांमध्ये राबविले जात आहेत. बऱ्याच शिक्षकांनी लोकसहभागातून तर काहींनी पदरमोड करून आपल्या शाळांमध्ये ईलर्निंगसारख्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची मदत अभ्यासामध्ये होत आहे. परिणामी गेल्या काही वर्षात इंग्रजी माध्यमातून पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे परतणारे विद्यार्थी वाढले आहेत. आज जिल्हा परिषद शाळा या खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देणाऱ्या शाळा म्हणून पुन्हा एकदा उदयाला येत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बातम्या आणखी आहेत...