आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- उन्हाळ कांद्याची साठवणूक क्षमता संपली असल्याने बहुतांश कांद्यांना आता कोंब येत आहेत. दक्षिण भारतातही कांदा आवक कमी असून तेथून जो कांदा येत आहे तो सुद्धा खराब प्रतीचाच असल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याचे भाव क्विंटलमागे ४०० रुपयांनी वाढून किमान १२०० ते तर कमाल १,४५० रुपयांपर्यंत गेले होते. 


पावसाने यंदा अवकृपा केल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून अनेक तालुक्यांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे पीकांना पाणी देणे दुरापास्त झाले आहे. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लाल कांदादेखील बाजारात आणला होता. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापारीवर्गामध्ये होती. मात्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणामध्ये पावसामुळे कांदा खराब झाला असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा हा जुना झाल्याने त्याला कोंब निघू लागले आहेत. तरीही गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये चांगला प्रतीचा कांदा १२०० ते १४५० प्रति क्विंटल दराने विक्री झाला. 


दर वाढण्याची शक्यता 
समाधानकारक पाऊस झाला नसल्याने महाराष्ट्रात कांद्याची आवक ही कमी प्रमाणात रहाणार आहे. तसेच दक्षिणेतील कांदाही कमी प्रमाणात आणि खराब प्रतीचा असल्याने उन्हाळ कांद्याचे दर वाढण्याची शक्यता राहील. 
- विकास सिंग, कांदा निर्यातदार 


आवक वाढल्यानंतर दर कमी होतील 
सध्या लाल आणि उन्हाळ कांदा दोन्हीची आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. मात्र, ज्या दिवशी आवक वाढेल त्या दिवशी दरदेखील कमी होतील. 
- इम्तियाज पटेल, कांदा व्यापारी 
 

बातम्या आणखी आहेत...