मी एक धारावीचा मच्छर...!

सुनील गजाकोश

Apr 28,2019 12:18:00 AM IST

गड्या, आपली धारावी बरी रे बाबा... इथे मुबलक रक्तच रक्त, त्यातही व्हरायटी. सर्व जाती-धर्माचं रक्त. डोसा खाणारा वेंकट, बीफ खाणारा इस्माईल, चिकनवर ताव मारणारा रघुदादा, मासे खाणारी केणी काकू अन् डुक्कर खाणाऱ्या माकडवाल्या कुंचीकोरवेंचं रक्त... काय कमी आहे धारावीत?

मी एक धारावीचा मच्छर... तिथेच जन्मलो, लहानाचा मोठा झालो. तसं सगळं बरं चाललं होतं पण या निवडणुकांमुळे पार परेशान झालोय. आता कालचंच घ्या... धारावीच्या मच्छी मार्केटमध्ये केणी काकूंच्या म्हावऱ्यावर मी घोंगावत होतो तितक्यात काकूंनी फेसबुक लाइव्ह सुरू केलं... "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो'... या आवाजाची कानाला इतकी सवय पडली आहे की मोबाइलच्या स्क्रीनकडे न बघताच मला कळून चुकलं शिवसेनाप्रमुखांचं भाषण सुरू झालंय. मुद्दा त्यांच्या भाषणाचा नाहीये, मात्र आपल्या भाषणात त्यांनी आम्हा मच्छरांचा उल्लेख केल्यामुळेच जरा डोकं चक्रावलंय. "साहेब' म्हणाले, धारावीचेे मच्छर हे कलानगरात येऊन मलाही चावतात, म्हणून आमचं आणि धारावीकरांचं रक्ताचं नातं आहे.
कसं असू शकेल एकच रक्त...


हे काय बोलणं झालं का साहेब...
आई शप्पथ सांगतो की, आमच्या धारावीतल्या एकाही मच्छरला कलानगर, मातोश्री आणि शिवसेनेत "इंटरेस्ट' नाही. धारावीत घोंगावत असताना उगाचच हायवे क्रॉस करून कलानगर- मातोश्रीला जायचे म्हणजे मधल्या खाडीतल्या मच्छरभाई लोकांशी पंगा घ्यावा लागणार. म्हणून आमचे लोक कधीच पलीकडे जात नाही. खाडीतले "नेटिव्ह' मच्छर म्हणतात, तुम्ही साले परप्रांतीय मच्छर आहात. तुम्ही या तर खरं आमच्या साइडला, ठोकूनच काढू. त्यामुळे कशाला उगीच खाडीच्या चिखलात दगड मारायचा?

बरं खाडी पार केली की, कोणे एकेकाळी तिथं ड्राइव्ह-इन थिएटर असायचं. गाडीत बसूनच सिनेमा पाहायचा. तिथे तर श्रीमंत लोकांचे रक्त पिऊन गब्बर झालेली सुखवस्तू मच्छरांची वस्ती होती, ते आम्हालाच काय तर खाडीतल्या गरीब मच्छरांना पण येऊ देत नसत. आता तिथे चकचकीत कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, बीकेसी आलं आहे... त्या मच्छरांची आजची पिढी तर खूपच माजली आहे. कारण अख्खी मुंबईच त्यांनी विकत घेतलीये. मराठी सोडून गुजराती, मारवाडी आणि इंग्रजी भाषा बोलतात... जवळच अंबानी स्कूल आहे, तिथेही या गर्भश्रीमंत मच्छरांचा वावर. सेलिब्रिटींच्या मुलांना चावतात, ते आमच्यातले "ब्लू ब्लड' मच्छर आहेत, त्यांचा तोरा आम्हाला सहन होत नाही. म्हणून आम्ही तिकडेही जात नाही. त्यापुढे तर पूर्ण बंदोबस्तात असलेले कलानगर आहे. आमचा एक मच्छरमित्र जिवाची रिस्क घेऊन कधीकाळी मोठ्या साहेबांना पाहायला गेला होता, पण खिडक्यांना जाळं लावल्याने आत शिरकावच करता येईना. बरं कलानगराचे मच्छर इतके कडवट आणि शिस्तीचे की त्यांच्यापुढे आमचा काय निभाव लागणार? बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना सतत चावल्यामुळे त्यांच्यात शिस्त आली असावी बहुधा... त्यांनी माझ्या मित्राला उडून उडून लाथा मारल्या आणि हकलून लावले. तेव्हापासून धारावीचे मच्छर कलानगरसारख्या सुरक्षित वस्तीत जात नाहीत हे लक्षात ठेवा बरं. गड्या, आपली धारावी बरी रे बाबा... इथे मुबलक रक्तच रक्त, त्यातही व्हरायटी. सर्व जाती-धर्माचं रक्त. डोसा खाणारा वेंकट, बीफ खाणारा इस्माईल, चिकनवर ताव मारणारा रघुदादा, मासे खाणारी केणी काकू, कुंभारवाड्यातील राजस्थानी अन् डुक्कर खाणाऱ्या माकडवाल्या कुंचीकोरवेंचं रक्त... काय कमी आहे धारावीत? इथे कोणताही भेदभाव नाही, कुणाच्याही घराला जाळ्या नाही आणि विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पुढच्या पिढीचीही काळजी नाही. कुठेही अंडी घाला, कुठेच अटकाव नाही..

... तसा आमचा इतिहासही फार मोठा, म्हणजे फिल्मी घराण्याचा... माझे पणजोबा म्हणे एकेकाळी धारावी किंग वरदराजनला चावले होते, असे म्हणतात. आणि ‘नायकन’मध्ये वरदराजनची भूमिका करणाऱ्या कमल हसनला माझ्या आजोबांनी चावलंय.. ‘धारावी’ नावाच्या चित्रपटाचं शूटिंग याच धारावीत सुरू असताना माझ्या बाबांनी ओम पुरी आणि शबाना आझमीलाही चांगलाच हिसका दाखवला होता. मग मी कशाला मागे राहतोय... अगदी परवा मी तर थेट रजनीकांतचाच चावा घेतला. "काला'चं शूटिंग करत होता तो. पण शेवटी तो बोलूनचालून रजनीच. मी त्याला चावायला गेलो तर "रोबो' बनून माझ्याच मागे धावायला लागला. म्हणतो कसा, अरे मी रजनीकांत, तू काय मला चावतोस, तुलाच मारून टाकेन, चल निघ इथून. मी लगेच "थलायवा' म्हणत दोन्ही हात जोडले आणि पायावर डोकं ठेवलं. त्यांनीही मला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून धारावीत माझी "वट' सुरू झाली. "गली बॉय'च्या शूटिंगला पहिला मान मलाच दिला या लोकांनी. रणवीर, आलिया, झोया एकालाही सोडलं नाही. खूप प्रेमळ आहेत ही सगळी मंडळी. त्यांच्यामुळे आमच्या कित्येक बांधवांना सिनेमात रोल मिळाला. इतका सगळा आनंदीआनंद असताना मग कशाला जाऊ आम्ही मरायला कलानगरात. त्यामुळे माझं ऐका, शिवसेनेचे नेते खोटं बोलत आहेत. आमचं कसलंच रक्ताचं नातंबितं नाहीये, मग धारावीकरांचे कसे असणार? असंही कालच्या सभेनंतर डोसेवाला वेंकट आणि बीफवाला इस्माईल दोघेही प्रचंड चिडलेत. "लुंगी हटाओ, पुंगी बचाओ' असा नारा देत वेंकटच्या नातेवाइकांना कसे पिटाळून लावले हे अद्याप तो विसरलेला नाहीये, तर आम्ही का म्हणून पाकिस्तानला जायचं असा सवाल इस्माईल इथे प्रत्येकालाच विचारतोय. पण, आता आम्हा धारावीच्या मच्छरांची अवस्था पुढच्या काळात अधिक बिकट होणार असं दिसतंय. "धारावीतले मच्छर साहेबांना चावतात' हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय. बरं पालिकेत सत्ताही त्यांचीच. त्यामुळे आता आधी फवारणी आणि मग आमचे जेनोसाइट नक्की आहे. खूप घाबरलोय, वाचवा आम्हाला... धारावीच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की, साहेबांचा हा डायलॉग विसरून जा, तसं काहीएक झालेलं नाहीये.
तुमचाच
एक धारावीकर मच्छर.
(लेखकाचा संपर्क - ९७७३७५२५६८)

सुनील गजाकोश
[email protected]

X
COMMENT