आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरचे श्रेष्ठ दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आपण पहातो या जगामध्ये कोणी सोने दान करतात, कोणी पैसा, तर कोणी संपत्ती दान करून प्रतिष्ठा मिळवतात. काही लोकांना वाटते आपण मानव जन्माला आलोय तर असे काही कार्य करावे जेणेकरून पुढील जन्म चांगला मिळेल. असे कार्य गरीब, सर्वसामान्य लोक करू शकत नाहीत, परंतु इच्छा तर असते. त्यासाठी एकच असे दान आहे जे जिवंतपणी संकल्प करायचा आणि मृत्यूनंतर दान करायचे. ज्यासाठी पैसा, संपत्ती, सोनेनाणे याची गरज पडत नाही आणि जिवंतपणी आणि मृत्यूनंतर पण नावलौकिक होतो. ते म्हणजे ‘नेत्रदान’.


नेत्रदान कोणीही करू शकतं. यासाठी काही खर्च तर लागत नाही परंतु जीवनभर आनंद मिळतो. आता नवीन शोधानुसार माणसाच्या एक डोळ्याचा फायदा चार लोकांना होतो आणि दोन डोळ्यांचा फायदा आठ लोकांना. म्हणजे एका माणसाच्या दोन डोळ्यांपासून आठ लोकांना दृष्टी मिळू शकते. यासारखे पुण्य कोठेही पैसे देऊनही मिळणार नाही. आज आपल्या देशात एक हजार मुलांमागे नऊ मुले नेत्रहीन आढळतात आणि प्रतिवर्षी तीस लाख लोक मरण पावतात. त्यापैकी एक टक्का लोकांनी जरी नेत्रदान केले तर एकही नेत्रहीन रुग्ण मिळणार नाही. 


आज खूप शिक्षण घेतलेली मंडळी असतानादेखील नेत्रदान करत नाहीत कारण बऱ्याच गैरसमजुती आपण ऐकतो. त्यामध्ये एक - परमेश्वराने आपल्याला पूर्ण अंगाने जन्म दिला तर पूर्ण अंगाने ईश्वराकडे जायला पाहिजे. दोन - मृत्यूनंतर  डोळे काढले तर पुढच्या जन्मी आपल्याला अंध जन्मावे लागेल. या सर्व अंधश्रद्धा आहेत. पुनर्जन्मावर विश्वास ठेवला तर मागचा एक तरी जन्म आपणास आठवला पाहिजे होता. आणि प्रत्येक धर्मग्रंथाची शिकवण आहे की, चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. मग आपणांस ईश्वरी शक्तीवर भरोसा ठेवायला पाहिजे आणि सर्वांनी नेत्रदान करायला पाहिजे. आज बरीच मंडळी नेत्रदान संकल्प पत्र भरून तर देतात, परंतु त्यापैकी बरेच लोक नेत्रदान करत नाहीत. असे न करता प्रत्येकाने नेत्रदान संकल्प पत्र भरल्यानंतर आपल्या नातेवाइकांना याची कल्पना देणे आवश्यक आहे. नेत्रदान करण्यासाठी काय काय करावे लागते ते पाहू.


- एक वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते.
- नेत्रदान हे मृत्यूनंतर करता येते, जिवंतपणी नाही.
- ज्यांची दृष्टी कमी आहे, ज्यांना चष्मा आहे, ज्यांना मोतीबिंदू आहे, ज्यांचे मोतीबिंदू किंवा काचबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल अशा व्यक्ती पण नेत्रदान करू शकतात.
- अंध व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात, परंतु त्यांचे बुबुळ (कॉर्निया) चांगले असणे आवश्यक आहे.
- फक्त ज्या लोकांचा रेबिज, हिपेटायटिस, कॅॕन्सर या रोगाने मृत्यू झाला असेल अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.


नेत्रदान करण्याची पद्धत :-
- मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते. त्यामुळे नेत्रपेढीस ताबडतोब कळवावे.
- मृत व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवावा आणि अँटिबायोटिक ड्रॉप डोळ्यांत टाकावेत.
- खोलीतील पंखा बंद करून ठेवावा.
- डॉक्टर डोळ्याचा वरचा भाग/बुबुळ काढतात, त्यामुळे व्यक्तीस विद्रुपपणा येत नाही, डोळे पहिल्यासारखे दिसतात. चला तर मग चांगल्या कामासाठी उशीर कशाला नेत्रदान करू आणि मृत्यूनंतर नेत्ररूपी जिवंत राहू.
(नेत्रचिकित्सा अधिकारी, जिल्हा रुग्णालय, बीड)

- सुनील हरिदास, बीड
sunilharidas2@gmail.com

बातम्या आणखी आहेत...