आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरावे तरी नेत्ररूपी उरावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर या जीवनात काहीतरी चांगले कार्य करावे लागेल. त्यासाठी एक तर इतरांची नि:स्वार्थ सेवा किंवा काहीतरी दान करूनच ते साध्य करावे लागेल. कोणी सोने दान करतात, कोणी पैसा तर कोणी संपत्ती दान करतात आणि प्रतिष्ठा मिळवतात. अशा दानांव्यतिरिक्तही अजून असे दान करता येते, ज्यामुळे दुसऱ्याला नवीन आयुष्य जगता येईल. त्यापैकी एक आहे  नेत्रदान. ते दान प्रतिष्ठेसाठी नाही तर ज्यांची दृष्टी जन्मतः किंवा काही अपघाताने गेली अशा लोकांना दृष्टी मिळवून देण्याचे दान आहे, जे नि:स्वार्थपणे केले जाते.  आज आपल्या देशात एक हजार मुलांमागे नऊ मुले नेत्रहीन आढळतात आणि प्रतिवर्षी तीस लाख लोक मरण पावतात. त्यापैकी एक टक्काही लोक  नेत्रदान करत नाहीत. यातील एक टक्के लोकांनी जर नेत्रदान केले तरी एकही नेत्रहीन रुग्ण आपल्याला दिसणार नाही. आज बरेच लोक नेत्रदान संकल्पपत्र भरून तर देतात, परंतु  नेत्रदान करत नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने नेत्रदान संकल्पपत्र भरल्यानंतर आपल्या नातेवाइकांना किंवा मित्रांना याची कल्पना देणे आवश्यक आहे. जेणेकरून नेत्रदान करण्यासाठी सोपे होईल.  

आता आपण पाहू नेत्रदान करण्यासाठी काय काय करावे लागते.
>  एक वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते.
> नेत्रदान हे मृत्यूनंतर करता येते, जिवंतपणी नाही.
> ज्यांची नजर कमी आहे, ज्यांना चष्मा आहे, ज्यांना मोतीबिंदू आहे, ज्यांची मोतीबिंदू किंवा काचबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल, अशा व्यक्ती पण नेत्रदान करू शकतात.
> अंध व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात, परंतु त्यांचे बुबुळ ( कॉर्निया ) चांगले असणे आवश्यक आहे.
> फक्त ज्या लोकांना रेबीज,हिपेटायटिस,कॅन्सर या रोगाने मृत्यू झाला असेल असे लोक नेत्रदान करू शकत नाहीत.

नेत्रदान करण्याची पद्धत 
> मृत्यूनंतर कमीत कमी सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते आणि त्यानंतर बाहत्तर तासांच्या आत पुढील शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. त्यामुळे नेत्रपेढीस ताबडतोब कळवावे.
> मृत व्यक्तीच्या डोळ्यावर ओला कापूस ठेवावा आणि अँटिबायोटिक ड्रॉप डोळ्यांत टाकावे.
> त्या खोलीतील पंखा बंद करून ठेवावा.
> डॉक्टर डोळ्याचा फक्त वरचा भाग म्हणजे बुबुळ काढतात. त्यामुळे व्यक्तीस विद्रूपपणा येत नाही. डोळे पहिल्यासारखे दिसतात.

अशा पद्धतीने आपण नेत्रदान करू शकतो आणि मृत्यूनंतर आपण नेत्ररूपाने जिवंत राहू शकतो. 
 

बातम्या आणखी आहेत...