स्टेटमेंट / ‘महाभारत’ मतदारांना लढायचे आहे, अंतिम शस्त्र तुमच्याच हातात आहे!

बोल, ये थोड़ा वक्त बहुत है

संजय आवटे

संजय आवटे

Oct 09,2019 10:26:41 AM IST

संजय आवटे, राज्य संपादक


महाराष्ट्राच्या राजकारणात असे ‘सीमोल्लंघन’ कधी झाले नसेल, जसे ते या वेळी दिसले! पक्षांच्या सीमारेषा एवढ्या धूसर झाल्या आहेत की, उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात आहे, याचीही खात्री असू नये. राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीत एवढे पक्षांतर यापूर्वी झाले नसेल.


या सीमोल्लंघनानंतर विजयाच्या दिशेने जाण्यासाठी सगळे उमेदवार आता शस्त्रे परजत आहेत. येणारे दोन आठवडे आत्यंतिक धामधुमीचे आणि ‘रात्रीचा दिवस’ करण्याचे असतील.


भाजप आणि शिवसेना एकत्र आले आहेत, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत हे सगळे स्वतंत्रपणे लढले होते. या वेळची निवडणूक दुरंगीच व्हायची, पण वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने या आकृतीला तिसरा कोन मिळाला. भाजप आणि शिवसेनेतील मेगाभरतीनंतर या पक्षांमध्ये बंडखोरी होणे स्वाभाविक होते. तशी ती दिसलीही. मात्र, बरीच बंडखोरी शमवण्यात या दोन्ही पक्षांना यश आल्याचे जाणवले.


महायुतीतील नाराजी लपून राहिलेली नाही. ‘होय, मी तडजोड म्हणूनच युती केली’, असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात सांगत आहेत. तर, ‘माझ्या पक्षाला भाजपने धोका दिला’, असा आक्रोश महादेव जानकरांचा आहे. रामदास आठवलेंचे हळवे कविमनही दुखावले आहे. तरीही, व्यावहारिक पातळीवर भाजपला सोडण्याची त्यांची इच्छा नाही. हे फक्त बाहेरच सुरू आहे, असे नाही. भाजपमध्ये पक्षांतर्गत दुखावलेपण काही कमी नाही.


देवेंद्रांची चलाखी अशी की, शिवसेनेसोबत युती करून स्वबळावर भाजप सत्तेत येईल, अशी व्यूहरचनाही ते आखतात! भाजपमधील विरोधी गटाची कोंडी करून स्वत: अनभिषिक्त सम्राट होऊ इच्छितात.


त्यातूनच भाजपच्या विद्यमान मंत्र्यांची तिकिटे कापली गेली, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित एका रांगेत असावेत, हा योगायोग नाही. मुख्यमंत्र्यांना (कधी काळी का असेना) पण आव्हान देणारे वा त्यांच्या खास गोटात नसलेले मंत्रीच ‘पंक्चर” कसे होतात, हे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राने पाहिले आहे. चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून दिलेली उमेदवारीही या रांगेचा एक भाग असल्याचे अनेकांना वाटते. एकूण काय, ‘मी पुन्हा येणार’, हे मुख्यमंत्र्यांचे तारस्वरातले विधान सध्या सर्वदूर निनादते आहे. पक्षाबाहेरचे आणि आतले सगळे शत्रू संपवत, स्वतःची अभेद्य, अनभिषिक्त अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतला महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस हा आहे.


काल सावरगावच्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात अमित शहांना दिली गेलेली ३७० तोफांची सलामी बोलकी आहे. देवेंद्रांच्या ‘गुड गव्हर्नन्स’च्या मुद्द्याला ही ३७० ची फोडणी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदींसारखा ‘पोस्टरबॉय’ आहे. या सगळ्या वातावरणात दोन हात करण्यापेक्षा दोन्ही हात जोडण्यातच आपले सौख्य सामावले आहे, एवढी राजकीय समज उद्धव ठाकरेंकडे नक्कीच आहे. ती समज पक्षांतर्गत विरोधकांकडेही आलेली अाहे.


‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री’ पंकजा मुंडे काही पावले मागे गेल्या होत्या, हे खरे असले तरी औरंगाबादच्या गेल्या महिन्यातील सभेत नरेंद्र मोदींनी आणि आता काल सावरगावात अमित शहा यांनी त्यांना दिलेले बळही नजरेआड करून चालणार नाही! ‘मतांवर नाही, मनांवर राज्य करायचे आहे’, असे सांगत पंकजा शक्तिप्रदर्शन करतात ते थेट अमित शहांसमोर. “पंकजांना सीएम करा” असा नारा मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत दुमदुमणे हा अपघात नक्कीच नसतो!


इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खिजगणतीतही नाहीत, असे चित्र होते. मात्र, शरद पवारांनी ते एकहाती बदलवून टाकले. ७९ वर्षांचा हा तरुण ज्या तडफेने राज्यात दौरे काढू लागला, त्याने चित्र पालटले. पवारांनी सिक्सर मारला तो ‘ईडी’च्या चेंडूवर. भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ‘ईडी’ला पवारांनी शब्दशः नाक घासायला लावले. ‘ईडी’सारख्या संस्थांकडे गंमत म्हणून आणि बोलावल्याशिवाय जायचे नसते, हे पवारांनाही माहीत होते. पण, स्वतःच ‘ईडी’कडे जाणार, या त्यांच्या घोषणेने राज्यभर वातावरण तयार झाले. तोवर दिशाहीन असणारे कार्यकर्ते आक्रमक झाले. शरद पवारांनी ‘ईडी’च्या मुद्द्यावरून पेटवलेल्या रानावर आपल्या स्टाइलने ‘पाणी’ ओतले ते अजित पवारांनी! आमदारकीचा राजीनामा देऊन ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या असंतोषाचा मुद्दा राष्ट्रवादीला बॅकफूटवर आणणारा, पण पवारांच्या मुत्सद्देगिरीने, पक्षाला सहानुभूती मिळवून देणारा ठरला.


काँग्रेसकडे चेहरा नसला तरी पारंपरिक व्होटबँक आजही खात्रीची आहे. इंटलेक्च्युअल्स आणि परिवर्तनवादी काँग्रेससोबत येऊ पाहताहेत. राष्ट्रवादीकडे ‘केडर’ आहे. त्याचप्रमाणे चेहरा आहे. भाजपमधील बंडखोरी, काही ठिकाणी महायुतीने घातलेले तिकिटांचे घोळ यामुळे आघाडीला त्याचा लाभ उठवता येऊ शकतो. विरोधकच नाहीत, असे चित्र आता नाही, एवढे खरे. सरकारच्या विरोधात नाराजी असतेच. याही सरकारच्या विरोधात आहे. या असंतोषाचे नायक कसे व्हायचे, याचा रोडमॅप मात्र विरोधकांकडे नाही.


वंचित आणि एमआयएम यांच्यातील नि मुख्य म्हणजे वंचितमधील अंतर्गत बंडाळी यामुळे एक मोठी संधी त्यांनी गमावली आहे. सध्या सर्वाधिक पॅशनेट, उत्स्फूर्त जनरेटा आहे तो ‘वंचित’च्या सोबत. त्यांच्याकडे चेहराही आहे. मात्र, पर्याय म्हणून उभे राहण्यात त्यांना यश येते की ‘मतांचे विभाजन” याच परिभाषेत त्यांचे मूल्यमापन होते, ते २४ ऑक्टोबरला समजेल.


निवडणुकीचा हा ज्वर वाढतच जाणार आहे. कोण जिंकेल, कोण हरेल, ते समजेल निकालाच्या दिवशीच. पण, आमचा मुद्दा असा आहे की, या निवडणुकीत सर्वसामान्य माणूस जिंकायला हवा. लोकशाहीचा केंद्रबिंदू नागरिक असतो, तर आमचा केंद्रबिंदू आहे वाचक. विपर्यस्त, एकारलेल्या बातम्या देणे, खोटारड्या बातम्या देणे ही वाचकांशी प्रतारणा आहे, असे आम्ही मानतो. निःपक्ष वृत्तांकन आणि सर्वंकष विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि एखाद्या मैफलीसारखे तुम्ही त्यात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा असते. ‘महाराष्ट्राचे महाभारत’ असा वेगळा मजकूर म्हणूनच तर आम्ही सुरू केला. आणि आश्चर्य म्हणजे, ‘फोटो ओळखा’ अथवा “इलेक्शन क्विझ’ यांसारख्या स्तंभांना एवढा उदंड प्रतिसाद मिळू लागला की, पाच- पाच हजार वाचक आम्हाला उत्तर पाठवू लागले. आता तर आम्ही त्यासोबत सुरू करत आहोत, रोज इलेक्शन जॅकेटही. खात्री आहे, तुम्हाला हे प्रयोग आवडतील.


तुम्ही सोबत राहा. बोलत राहा. केंद्रबिंदू तुम्हीच आहात. आम्ही तर फक्त माध्यम आहोत.
सीमोल्लंघन झाले, आता मतदानाचे शस्त्र हातात घेऊन तुम्हालाच हे ‘महाभारत’ लढायचे आहे!

X
COMMENT